ll शिकणे आनंदाचे ll थ्री इन वन वही

 

 

नाशिकमधला पेठरोड परिसर. शहराच्या मध्य वस्तीतला पण अविकसित, शहरी झोपडपट्टीचा हा परिसर. बहुतांश वर्ग हातमजुरी करणारा, बाजार समितीत मजूर म्हणून काम करणारा. त्यांची मुलं इथल्याच उन्नती विद्यालयात शिकतात. शाळेत साधारण ३०० मुलं. प्राथमिकचे मुख्याध्यापक नंदलाल धांडे आणि प्राचार्य नीलकंठ नेर यांच्यासाठी ती पोटच्या मुलांसारखीच.

कोरोना, लॉकडाऊनमुळे मजुरांच्या हातचं काम गेलं. धांडे सरांनी इतर शिक्षक आणि काही दानशुरांच्या मदतीनं त्यांना जीवनावश्यक वस्तू दिल्या.
नव्या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय आला. पण बहुतांश पालकांकडे अत्याधुनिक मोबाईल नाही, नेटपॅक नाही. पालकांची घरी राहायची वेळ आणि मुलांची अभ्यासाची वेळ जुळणं कठीण. ऑनलाईन शिक्षणासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबी पालकांना समजणं कठीण. अशा अडचणीमुळे पाठवलेले विडिओ मुलं पाहत नव्हती.
मुलांचा अभ्यास तर झाला पाहिजे. यातून शाळेनं मार्ग काढला थ्री इन वहीचा. मुलांना मराठी, गणित आणि इंग्रजीसाठी एकत्रित वही आणि साहित्य देण्याचं ठरलं. त्यासाठी ‘शिक्षणासाठी एक हात’ उपक्रम. त्यासाठी समाजमाध्यमांची मदत. उपक्रमात शिक्षकांनी स्वखर्चातून, सामाजिक मदतीतून साहित्य खरेदी केलं.
विद्यार्थ्यांनी काय अभ्यास करायचा ते शिक्षक वहीच्या पानावर लिहितात. तो कधीपर्यंत पूर्ण करायचा याची तारीखही. शिक्षक विद्यार्थ्याशी त्या तारखेला संपर्क साधतात आणि अभ्यास तपासतात. यामुळे मुलं नियमित अभ्यास करतात.
धांडे सर सांगतात, ” विद्यार्थ्यांना दिलेल्या अभ्यासाचं नियोजन शिक्षकांनी आपल्याकडे ठेवलं आहे . वही पंधरा-वीस दिवसात जमा करायची पुन्हा त्याला पुढचा अभ्यास द्याायचा.चा नवीन वही ,पेन्सिल, खोडरबर द्यायचा. पूर्वीचा अभ्यास केलेली वही शिक्षक तपासणार पुढच्या वेळी चुका सांगणार अशा प्रकारे एकंदरीत आमचा उपक्रम चालू आहे. या प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना थ्री इन वही, पेन्सिल ,खोडरबर ,रंगपेटी, शार्पनर चित्रकला वही ,सुलेखन वही तर माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना शाळेनं वह्या दिल्या आहेत.”

– प्राची उन्मेष,नाशिक

Leave a Reply