बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातलं नारखेड. अगदी साधं, विकासापासून वंचित असं हे गाव. पण इथली जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा आयएसओ मानांकित आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी इथं व्यवस्था आहे. कोरोना आला आणि शाळा बंद झाल्या. विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय हे प्रेमचंद राठोड गुरूजींच्या मनाला टोचू लागलं. त्यांनी पुढाकार घेऊन दोन यूट्यूब चॅनेल आणि किलबिल नावाचा ब्लॉग तयार केला. गुरुजी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ त्यांच्या नाहीतर राज्यातील बाकी विद्यार्थ्यांना देखील शिकवित आहेत.
प्रेमचंद राठोड हे नारखेड येथील जिल्हा परिषद शाळेवरील एक उपक्रमशील शिक्षक आहेत. २०१९मध्ये शासनाने त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल राज्य शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. त्यांना सामाजिक संस्थेकडून अनेक राज्य पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे.
सध्या वर्ग बंद असल्याने गुरुजींना बराच वेळ मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन गुरुजींनी या दरम्यान आपण वर्गातीलच नव्हे तर राज्यातील विद्यार्थ्यांपर्यत कसे पोहचू, आपले स्वाध्याय कसे पोहचविता येईल याचा विचार केला. त्यासाठी आधी त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थांचे फोन नंबर मिळविले, गावात जास्तीत जास्त पालकांकडे एन्ड्राईड मोबाईल असल्याची
त्यांनी माहिती मिळविली. त्या पालकांशी चर्चा केली. सर्व विषयाच्या अगदी पहिल्या घटकापासून व्हिडीओ व त्यावरील स्वाध्याय, सराव चाचणीसह कंटेंट तयार केला. हा स्वाध्याय अभ्यासक्रमानुसार घटकानुसार आहे.
दररोज हे व्हिडीओ त्यांच्या पर्यत कसे पोहचतील यासाठी मार्ग शोधून काढला. एस.पी एज्युकेशन, गोर एज्युकेशन व किलबिल नामक ब्लॉग वरून वळता केला. सुमारे 750 विविध शैक्षणिक व्हिडीओ या ब्लॉगवर वर उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे राज्यभरातील विविध
पालक, विद्यार्थांचे 200 पेक्षा अधिक व्हॉटसअॅप ग्रुपमधून हे व्हिडीओ विद्यार्थापर्यत पोचावेत यासाठी ते प्रयत्नशील असतात.
राठोड गुरुजी म्हणतात, सृजनशीलता हा प्रत्येकाला लाभलेला गुण असतो, या गुणाचा लाभ कसा घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी तंत्रस्नेही शिक्षक असल्याने हे अगदी सहज साध्य झालं. त्यामुळेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणं सोपं झालं. ज्या गरीब विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध होऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांचे चार गट तयार केले आहेत. ही मुले गटानुसार एकत्रित येऊन अभ्यास करीत असल्याचं त्यांनी सांगितलं.
– दिनेश मुडे, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा