‘समाधानाचे क्षण’ असं म्हटल्याबरोबर हे हातून झालेल्या चांगल्या कामाविषयी आहे, एकंदर जगण्याविषयी नाही, असंच वाटतं. म्हणजे, एक मनुष्यप्राणी म्हणून आपली एक जबाबदारी असते. पृथ्वीवर जगणाऱ्या इतर प्राणीमात्रांची सजग जाणीव ठेवून ती पार पाडायची असते. त्याबरोबर आपण एक नागरीक असतो. एक नागरीक म्हणून आपल्याला भरपूर फायदे मिळत असतात. त्यांच्या प्रमाणात आपण उलट काही या देशाला, समाजाला, समाजातल्या दुर्बल वर्गाला दिलं तरच नागरिकत्वाची जबाबदारी पार पाडली जाते. तसंच आपण कुटुंबात जगतो. मित्रांच्या, नातेवाइकांच्या, शेजारपाजारच्या वर्तुळात जगताना आपल्याला सुरक्षित वाटतं. याची परतफेड करायची असते. ते मनापासून होवो न होवो; पण कर्तव्यभावना तरी पूर्ण करायची असते.
मला तरी या सगळ्या जबाबदाऱ्यांची बोचरी जाणीव सदा असते. त्या मी किती पार पाडतो, ही गोष्ट वेगळी. पण जगण्याच्या स्वार्थी, बेफिकीर व्यवहारांमध्ये हातून ज्या चुका, जे गुन्हे होत जातात; त्यांची भरपाई करण्याची संधी आपल्याला अजून आहे, असं वाटणं थांबलेलं नाही. तशी भरपाई खरोखर हातून झाली, तर मरतानाचा क्षण निश्चित समाधानाचा असेल. चार नव्हे, चाळीसांपेक्षा मोठा असेल.
पण तो हिशेब मेल्यानंतर चित्रगुप्ताला द्यायचा आहे! आत्ता, या क्षणी जे ‘समाधानाचे चार क्षण’ मोजायचे आहेत, ते यांच्यापेक्षा वेगळे अपेक्षित आहेत!
तरी एक गोष्ट सांगायला हवी. जगण्याची मोठी उमेद समोर असतानाच्या वयात असे क्षण मोजताना हातून घडलेलं एखादं कृत्यच सांगावंसं वाटेल. दीर्घकाळ होत राहिलेली, ‘क्षणिक’ नसलेली क्रिया त्यात मोजली जाणार नाही. पण मी लौकिकार्थाने तरुण नाही. माझ्यासाठी ‘क्षण’ या कालखंडाची व्याख्या थोडी ताणलेली आहे. समाधान देणारं कृत्य करतानाचा आणि त्यामधून मिळणाऱ्या समाधानाचा, असे दोन्ही क्षण माझ्यापुरते मी वेगळ्या रीतीने मोजणार आहे. तसं केलं तरच माझ्या समाधानाला न्याय मिळेल. आणखी एक. दुसऱ्याला आनंद देणे हे जसं समाधान वाटण्याचं मोठं कारण आहे; तसंच स्वत:च्या इच्छांची, क्षमतांची पूर्तता करणे, हेसुद्धा आहे!
उदाहरणार्थ, माझी भटकंती. नवीन प्रदेश, वेगळे लोक, अनोळखी भवताल असलं काहीतरी अनुभवण्यातल्या आनंदाचा शोध मला तसा उशीरा लागला. जन्मापासून मुंबईत आयुष्य घालवलेलं आणि गाव नसल्यामुळे निसर्गात मोकळेपणाने मनसोक्त बागडण्याचाही अनुभव नाही. वीस वर्षांचा होऊन गेल्यावर मला मित्रांमुळे जंगलात, डोंगरात फिरण्यात; तसं करताना पावसात भिजण्यात, उन्हाने तापण्यात आणि थंडीत कुडकुडण्यात प्रचंड सुख आहे, याचा शोध लागला. या शोधाबरोबर यासाठी लागणारी शारीरिक क्षमता आपल्यात आहे, याचाही शोध लागला. तेव्हापासून मी फिरू लागलो. डोंगरदऱ्या हिंडलो. गावातल्या देवळात, जंगलातल्या मोकळ्या जागेत, कुणाच्या झोपडीत झोपलो. यथावकाश हिमालयात गेलो. अजून जातो. हिमालयात जो एकदा गेला, त्याला हिमालयाचा छंद लागला. बर्फशिखरांचं दर्शन, बर्फ तुडवत चालणे, तिथल्या भव्यतेमुळे नम्र वाटणे, तिथल्या मऊ शांततेमुळे आध्यात्मिक वाटणे, हे सगळं तर अपार सुखकारक. शरिराला होणाऱ्या कष्टांपेक्षा कित्येक पटींनी जास्त आश्वासक.
नोकरीने मला पाच वर्षं घरापासून दूर रहाण्यास भाग पाडलं. वेगळे लोक, वेगळी संस्कृती, वेगळा भूगोल यांचा अनुभव घेतला. हा आपला देश किती विशाल आहे हे कळलं. आपण आणि आपल्या भोवतीचं चिंचोळं जग यांच्यावरून कुठल्याही संदर्भात देशाचा अर्थ लावणे हा केवढा मोठा मूर्खपणा आहे, याचा डोक्यात प्रकाश पडला. मी परदेशी गेलो. कुठल्याही पर्यटन कंपनीच्या आखीव रेखीव प्रवासयोजनेबरोबर नाही; एक ग्रूप करून आपले आपण हवं तसं फिरण्याचं सुख घेतलं. यातून सुसंस्कृतता याचा व्यावहारिक अर्थ उमगला. इतिहास आणि भूगोल यांच्यातलं अद्वैत कळलं.
याचं मला समाधान आहे! माझ्या भटकंतीमुळे आज बसल्या जागी विचार करताना मला थोडा रुंद परीघ जाणवतो. त्या प्रमाणात मी कमी संकुचित रहातो, याचं समाधान आहे. याला समाधानाचा क्षण म्हणावं का? मी म्हणणार आहे.
– हेमंत कर्णिक