ll समाधानाचे क्षण ll दोनः समाधान काम केल्याचं होतं, बक्षिसाचं नव्हतं!

मला इंग्रजी भाषा कळते आणि मराठी भाषा येते, हे ध्यानात घेऊन निखिल वागळेने माझ्यावर एक काम सोपवलं. पी साईनाथ या पत्रकाराने लिहिलेल्या ‘एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट’ या इंग्रजी पुस्तकाचं भराठीत भाषांतर करण्याचं. वाजवीपेक्षा जास्त वेळ घेऊन मी हे काम पूर्ण केलं. पुस्तक पूर्ण करण्याचा क्षण माझ्यासाठी खरोखर समाधानाचा होता. याला आता वीस वर्षं झाली पण अजूनही स्वत:ची ओळख ‘या पुस्तकाचं मराठी भाषांतर करणारा,’ अशी सांगावीशी वाटते.
पी साईनाथचं पुस्तक म्हणजे भारतातले गरीब लोक कसे जगतात, याचा एकाच वेळी सहृदय आणि चिकित्सक अभ्यास आहे. साईनाथने अगोदर सरकारी आकडेवारीच्या सहाय्याने भारतातले सर्वात गरीब जिल्हे निवडले. त्या जिल्ह्यांमधले विशेष गरीब शोधले. मग तो तिथे गेला. लोकांना भेटला. त्यांच्याशी बोलला. आणि त्यांच्या जगण्यावर त्याने अडुसष्ट वृत्तकथा लिहिल्या. त्यांचे त्याने भाग पाडले आणि एकेका भागावर अभ्यासपूर्ण निबंध लिहिला. त्याच्या वृत्तकथा माणसांबद्दल, माणुसकीबद्दल आहेत; निबंध शास्त्रशुद्ध अभ्यासाचे नमुने आहेत.

गरिबीकडे आपण ‘घटना’ म्हणून बघतो. कुणाची आत्महत्या, कुणी विकलेलं मूल, कुणी कुणी कसे शेकडो मैल चालत गेले, अशा घटना. त्या आपल्याला चटका लावतात आणि कर्तव्यबुद्धी जागी करून काहीतरी मदत करायला उद्युक्त करतात. साईनाथ गरिबीकडे घटना म्हणून नाही, प्रक्रिया म्हणून बघतो. सतत चालू असलेली प्रक्रिया. तुमचा आमचा सहभाग असलेली प्रक्रिया. याची जाणीव झाली की नुसती मदत करण्याची प्रेरणा होत नाही; आपल्या आणि या व्यवस्थेच्या वर्तनात काही बदल होऊ शकतो का, हेसुद्धा तपासावंसं वाटतं. थोडक्यात, भारतातील गरिबीबद्दल काहीही बोलायचं असेल, तर साईनाथचं हे पुस्तक वाचलेलं असलं पाहिजे.
असलं महत्त्वाचं पुस्तक मराठीत आणण्याचं काम केल्याचं समाधान खूप मोठं आहे. मराठी भाषांतराला निखिलने इतकं चपखल नाव दिलं – दुष्काळ आवडे सर्वांना – की त्यात मूळ इंग्रजी नावाचा सगळा आशय आला होता आणि ते सहज सोपं असल्यामुळे लोकांच्या जिभेवर रुळलं. वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी एखाद्या म्हणीप्रमाणे त्याचा वापर होताना दिसतो.
याला एक पुस्ती जोडायला हवी. माझ्या भाषांतराला महाराष्ट्र फाउंडेशनचं अवॉर्ड मिळालं. तेव्हा माझं खूप म्हणजे खूपच अभिनंदन झालं. एका ठिकाणी सत्कारही झाला. पण तसं कौतुक होत असतानाचा क्षण मला समाधानाचा वाटला नाही! साईनाथची सोपी, ओघवती शैली मराठीत आणताना, भाषा आक्रस्ताळी होऊ न देता त्यातली दाहकता मराठीत आणताना मला खूप बरं वाटत होतं. इंग्रजी वाचताना आपल्याला जे झालं, त्याचा प्रत्यय मराठी वाचकाला आला पाहिजे, असं सतत मनात होतं. भाषांतर मनासारखं व्हावं, यासाठी शब्द आणि वाक्प्रचार आणि वाक्यरचना यांकडे मी लक्ष देत होतो. या सगळ्यात मन गुंतवण्यात समाधान होतं. बक्षिसाने माझ्या कामाला मान्यता दिली, हे खरं, त्याचा आनंद झाला, हेसुद्धा खरं; पण समाधान काम केल्याचं होतं, बक्षिसाचं नव्हतं!

– हेमंत कर्णिक

Leave a Reply