ll समाधानाचे क्षण ll लेखनाच्या दुनियेत,दिग्गज्जांच्या सहवासात!

खरं तर मी काही लिखाणाकडे वळेन, पुस्तकं वगैरे लिहिन असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण 2015 मध्ये माझं लिखाण सुरू झालं, ते सुद्धा असंच अपघाताने. लोकसत्तेत संपादक गिरीश कुबेरांनी जनरिक मेडिसीनबद्दल एक अग्रलेख लिहिला होता, त्यावर आक्षेप नोंदविणारे एक पत्र मी इमेलने ‘लोकसत्ता’ ला पाठवून दिलं. हे पत्र प्रसिद्ध वगैरे होणार नाहीच, असं मला वाटत होतं.
पण झालं उलटंच मला गिरिश कुबेरांचा थेट कॉलच आला. त्यांनी मी कोण आहे, काय शिकले, काय करते याची चौकशी तर केलीच आणि मग सगळ्या चर्चेवरून नंतर सुचवलं, “तुम्ही खरं तर ‘बौद्धिक संपदा’ या कायद्यावर लोकसत्तेसाठी लिहायला हवं.” मी त्यांची सूचना अगदी झटकूनच टाकली की, “असल्या किचकट विषयावर कुठं लिहिणार? आणि मराठीत ते वाचणार तरी कोण?” त्यावर गिरीशजी म्हणाले, “मुळात लोकांना हे आवडेल का, कळेल का असं अंडरएस्टिमेट करू नये. वाचकांना अनेक विषयांत रस असतो. तुम्ही उत्तम लिहाल आणि लोक वाचतील. शिवाय हा विषय मराठीत आत्तापर्यंत आला नसेल तर मराठीला समृद्ध करण्याच्या दृष्टीने सुद्धा, तुम्ही या विषयावर लिहिणं ही संधी मानायला हवी, तुम्ही लिहाच” असा आग्रह त्यांनी मला केला.


आणि मग 2015 मध्ये ‘कथा अकलेच्या कायद्याची’ हे माझं लोकसत्तेतलं पहिलं सदर सुरू झालं, ते वाचकांना इतकं आवडलं की पुढं ‘राजहंस’ प्रकाशनाने त्याचं पुस्तक काढलं. यानंतरचं ‘सिप्ला’ कंपनीवरचं ‘अशीही एक झुंज’ हे पुस्तक माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. कारण मला ‘सिप्ला’ आणि तत्सम भारतीय फार्मा कंपन्यांच्या डोंगराएवढ्या कामाबद्दल पूर्वीपासूनच लिहायचं होतं. या विचाराची जाणीव झालेली तुरिन विद्यापीठात शिकताना. तिथं एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिथल्या वर्गमित्रांसोबत एक चित्रपट पाहिला होता- ‘फायर इन द ब्लड’ या नावाचा. हा चित्रपट होता एड्सने त्रासलेल्या आणि केवळ औषधं परवडत नाहीत म्हणून तळमळून जीव सोडणाऱ्या गरीब आफ्रिकन लोकांबाबत, आणि त्या लोकांच्या मदतीला धावून गेलेल्या भारतीय ‘सिप्ला’ या कंपनीबाबत.
हा चित्रपट पाहिल्याच्या क्षणापासून मी एक निश्चय केला, की हे उदात्त मानवतेचं भारतीय कंपनीने केलेलं काम, जगासमोर यायलाच हवं. अमेरिकन कंपन्या जी औषधं 15 हजार डॉलर्स प्रतिवर्ष या दराने प्रचंड नफा कमवून विकत होत्या, तिथं सिप्लाने केवळ 350 डॉलर्स प्रति वर्ष किंमतीत, आफ्रिकेला औषध कसं पुरवलं, याची ही इंटरेस्टिंग कहाणी. या विषयावरचं मिळेल ते साहित्य मी वाचत गेले. हे सगळं सर्वसामान्यांना कळेल अश्या भाषेत मला सांगायचं होतं. अश्यातच ‘सिप्ला’त काम करणाऱ्या एका मित्राकडून मला ‘सिप्ला’ चे सर्वेसर्वा डॉ. युसुफ हमीद यांचा इमेल आयडी मिळाला. त्यांच्याकडून आणखी काही माहिती मिळवता येईल का, त्यांना भेटता येईल का, असा विचार करून त्यांना एक इमेल मी पाठवून दिला. डॉ. युसुफ हमीद यांच्यासारखा ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध माणूस मला काही दाद देईल असं वाटत नव्हतं. पण नवल घडलं, आणि आपण लवकरच भेटू, असं त्यांचं उत्तर मला आलं.
शेवटी डॉ. युसुफ हमीद यांच्या भेटीचा दिवस उजाडला. ‘सिप्ला’ सारख्या अवाढव्य फार्मा कंपनीचा मालक, त्या काळी केंब्रिजमध्ये शिकलेला विद्वान, आफ्रिकेच्या कितीतरी पिढ्यांना जीवदान देणारा दाता मला भेटायला तयार झाला होता. मला त्यांच्याशी नीट बोलायला जमेल का, या जाणीवेनं थोडंसं अस्वस्थ होत होतं. पण त्यांनी हलक्याफुलक्या पद्धतीने संवाद साधत आधी माझं टेन्शन आणि दडपण दूर केलं. मग मला हे पुस्तक का लिहावंसं वाटतंय, फार्मसी आणि पेटंट क्षेत्रात माझं कितपत ज्ञान आहे, याची चाचपणी केली आणि माझ्या जेन्युईन कुतुहुलाची खात्री वाटल्यावर, मग ज्ञानाचं भांडारच माझ्यासमोर खुलं केलं.
माझ्या कित्येक प्रश्नांना त्यांनी नं कंटाळता सविस्तर उत्तरं दिली, एड्सविरोधी लढाईतली औषधं बनविण्याच्या काळात ते जणू काही पुन्हा एकदा जाऊन आले. या पुस्तकाच्या संशोधनासाठी मी ज्यांच्याशी बोलायलाच हवं अश्या कित्येकांची नावं ते मला सांगत होते, त्यांचे इमेल आयडी अथवा फोन नंबर पुरविण्याचे आणि इतरही लागेल ते संदर्भ साहित्य पुरविण्याचे आश्वासन डॉ. हमीद यांनी दिलं. डॉ. हमीद यांची भेट मी आयुष्यभर विसरू शकणार नाही, इतकी माझ्यासाठी खास आहे. त्यांनी खरोखरच मला खोकंभरून पुस्तकं, वृत्तपत्रीय लेखांची कात्रणं, सीडीज पुरविल्या. अनेकांचे नंबर्स दिले. त्यातून मग युगांडातल्या जॉइंट क्लिनिकल रिसर्च सेंटरचे पीटर मुजिनी, ‘सिप्ला’ आणि डॉ. हमीद यांचे कौतुकास्पद कार्य जगासमोर आणणारे ‘न्यूयॉर्क टाईम्स’चे पत्रकार डोनाल्ड मॅकलिन सारख्या पन्नासेक जणांशी माझा इमेल, व्हिडिओ कॉल्समधून दीर्घ संवाद सुरू झाला. आणि त्यानंतर 2021 मध्ये सर्वांच्या समोर आले, भारतीयांची मान आणखी ताठ उंच करणारे पुस्तक ‘अशीही एक झुंज!’
खरंतर हे पुस्तक आधी प्रकाशित होणार होतं, पण कोरोनाच्या महासाथीच्या प्रकोपाने आणि ‘राजहंस’च्या दिलीप माजगावकरांच्या आग्रहाने आधी ‘कोरोनाच्या कृष्णछायेत’ हे पुस्तक प्रकाशित झालं. वाचकांच्या प्रतिक्रियेपैकी लक्षात राहणारी एक प्रतिक्रिया अशी की, ‘अशीही एक झुंज’ हे पुस्तक वाचून ‘सिप्ला’ मध्ये गोव्यात काम करणाऱ्या एका मजुराचा मला फोन आला होता. तो एड्सच्या औषधांच्या प्लांटवर काम करणारा मजूर आहे. तो हे पुस्तक वाचून भारावून गेला होता आणि म्हणाला, “इतकं चांगलं, माणुसकीचं काम करणाऱ्या कंपनीसाठी मी काम करतोय, हे मला आजपर्यंत माहितच नव्हतं. तुमच्या पुस्तकानं ती जाणीव करून दिली, आता स्वत:चाही अभिमान वाटायला लागलाय.” हे बोलताना त्याचा गळा दाटून आला होता.
आणखी एक लक्षात राहण्याजोगी प्रतिक्रिया खुद्द डॉ. युसूफ हमीद यांची. ‘अशीही एक झुंज’ पुस्तकासाठीचं माझं मनोगत मी फेसबुकवर माझ्या वॉलवर लिहिलं होतं, ते इतकं व्हायरल झालं, की ते कुणीतरी डॉ. हमीद यांच्यापर्यंत पोहोचवलं. त्यांना मराठी वाचता येत नाही, म्हणून त्यांनी ते इंग्रजीत भाषांतरित करून घेतलं आणि वाचलं. ते वाचल्यावर डॉ. हमीद यांचा मला फोन आला, ते म्हणाले, “माझं आणि ‘सिप्ला’चं काम आत्तापर्यंत आपल्या फार्मसी क्षेत्रातील लोकांनाच माहिती होतं, पण ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय फक्त तुला आहे, मृदुला. धन्यवाद. ”

– डॉ. मृदुला देशमुख-बेळे

Leave a Reply