हव्याहव्याश्या वाटणाऱ्या फेलोशिपचा नाद मी सोडून दिला असताना अचानक तीच फेलोशिप मला मिळणार असल्याचा आलेला फोन, माझ्यासाठी सुखद धक्का होता. मी तिचे आभार मानत हसतहसत फेलोशिप स्वीकारली, आणि डिस्टन्स लर्निंगचा उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करून मी तुरिनला रवाना झाले.
आधी तुरिन विद्यापीठात आणि मग जीनिव्हाला शिकणे, हा माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातला खरोखरच माईलस्टोन होता. आजवरचं माझं सगळं शिक्षण, करिअर आणि वैयक्तिक आयुष्य नाशिकमध्येच पार पडलं होतं. आठवड्याच्या वर नाशिक सोडून इतर कुठल्या शहरात मी राहिले नव्हते. माझं माहेर- सासर दोन्ही नाशकातच, त्यामुळे एलएलएमसाठी आपला देशच सोडून जाणं हा आयुष्य अगदी 180 अंशात फिरवणारा अमेझिंग अनुभव होता माझ्यासाठी. यात सुरूवातीला कुटुंबापासून- मुलीपासून, नवऱ्यापासून पहिल्यांदाच सहा महिन्यांसाठी इतकं दूर राहिल्याने थोडी भावनिक घालमेलही झाली. पण या दिवसांनी मला खूप शिकवलं.
म्हणजे खरं तर माझ्या आयुष्याचे अगदी ‘तुरिनला जाण्यापूर्वीची मृदुला’ आणि ‘तुरिनहून परतलल्यानंतरची मृदुला’ असे दोन हिस्से करता येतील. तिकडे गेल्यावरही माझ्या मनात वेगवेगळे फोबिया होते, न्यूनगंड होता. उदा. नाशिकच्या कॉलेजमध्ये मी विद्यार्थ्यांना चांगलं शिकवते, हे माहीत होतं. पण हे माझंच कॉलेज, मी इथंच शिकले म्हणून कदाचित मुलांना माझं अध्यापन आवडत असेल असं वाटायचं. पण इथं माझ्या वर्गात 40 देशांमधून आलेले, 40 वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात एक्सपर्ट असणारे विद्यार्थी होते, तेव्हा सुरूवातीला मला वाटलेलं, इथं जमणार आहे का आपल्याला चांगलं परफॉर्म करायला? पण जेव्हा या कोर्समधल्या इंटर्नल परीक्षेतही मी पहिली आले, तेव्हा जाणवलं की ‘येस, हममें भी कुछ बात है!’ पण ही जाणीव व्हायला मला साधारण वयाची चाळीशी गाठावी लागली. त्याआधी मी स्वत:च्या क्षमता फारश्या ओळखल्याच नव्हत्या, हे माझ्या लक्षात आलं.
तिथं सगळी कामं स्वत:ची स्वत: करावी लागायची, शिवाय भरपूर अभ्यास. तिथं आम्हांला शिकवायला येणारे प्रोफेसर्सही आपापल्या विषयातली ‘बापमाणसं’ होती. तिकडं पेटंटबद्दल शिकवायला, वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे लोक यायचे. अमेरिकन प्रोफेसर आले की ते शिकवायचे, पेटंट का गरजेचं आहे ? कारण संशोधकांना अमुक औषध बनवताना किती मेहनत घ्यावी लागते, केवढा त्रास होतो, शिवाय जगातील अनेकांना ते औषध उपयोगी पडतं तर त्याचा मोबदला म्हणून घेतलं पेटंट, तर त्यात चूक ते काय? त्या वेळी ते पटूनही जायचं.
मात्र तिथंच आम्हांला अर्जेंटिनाचे प्रोफेसर कार्लोस कोरिआ शिकवायला यायचे. औषधांची पेटंटस् या क्षेत्रातलं, प्रो. कोरिआ हे मोठ्ठं नाव. पेटंटचा मानवी हक्काचा जो अँगल कार्लोस सरांनी आम्हांला शिकवला तो मी विसरू शकत नाही. औषधांवर खूप पेटंटस दिली तर काय होतं, त्यामुळं गरीब लोक कसे त्या औषधांपासून वंचित राहतात, प्रसंगी जीव गमावतात. प्रत्येक देशाचा ‘पेटंट’ या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्ण वेगळा असू शकतो. कारण वेळप्रसंगी असंही होऊ शकतं, की औषधाची किंमत सात हजार डॉलर्स आहे आणि आफ्रिकेतील एका व्यक्तीला त्याचा जीव वाचवण्यासाठी ते औषध हवंय, ज्याची वार्षिक कमाईच कशीबशी चार हजार डॉलर्स आहे. मग त्यानं काय करायचं? ते पेटंट असलेलं औषध परवडत नाही म्हणून मरायचं का? कार्लोस सरांनी ही आयुष्यभराची शिकवण आणि या व्यवहारांकडे पाहायचा मानवीय दृष्टिकोन दिला.
इतकंच नाही तर सरांना जेव्हा कळलं की मी भारतातून आलेय आणि फार्मास्युटिकल सायन्स शिकवतेय, तेव्हा ते मला सगळ्या वर्गासमोर म्हणाले, “भारताबद्दल मला नितांत आदर आहे. कारण माझा देश असलेला अर्जेंटिना असो किंवा इतर कुठला गरीब देश, तिथल्या गरिबातल्या गरीब माणसाला सुद्धा परवडणारं औषध कसं पुरवावं, हे आम्ही भारताकडून शिकतोय. आमची धोरणं आम्ही तुमच्याकडून शिकतोय, We are walking on your footprints.” त्यावेळी मला अभिमान तर वाटलाच, पण थोडी खंतही वाटली, की आपल्या भारताची ही सकारात्मक बाजू बऱ्याच लोकांना माहितीच नाहीए, म्हणून पुढे लिखाणातूनही शक्य तिथं मी हे पुढं आणायचं ठरवलं.
त्यानंतर दोनदा जपानला जाण्याचाही योग आला. एकदा शिकण्यासाठी, एकदा कामाचा अनुभव म्हणून अशी दोन्ही वेळा साधारण महिनाभर तिथं राहिले. जपानच्या शिस्तशीर कार्यसंस्कृतीबद्दलचा आदर वाढलाच, पण दोन तीन नकारात्मक नोंदीही मनाने केल्या. एकतर या देशात महिलांना पुरेसं स्वातंत्र्य नाही, त्यांना फार मानाने वागवलं जात नाही, शोभेच्या बाहुल्या म्हणूनच वागवलं जातं, हे फार जाणवलं. कामाच्या ठिकाणी महिलांना फार अधिकाराची पदं नसतात, दररोज अतिशय नीटनेटकं राहून, उंच टाचांच्या (स्टिलेटोज) सँडल्स घालूनच, त्यांना ऑफिसला यावं लागतं. यामुळे कित्येक स्त्रियांच्या पायांना जखमा झालेल्यासुद्धा मी पाहिल्या आणि मीच कळवळले. दुसरं म्हणजे जपानी माणसं अत्यंत रिझर्व्ह असतात, ते सहज मोकळे होत नाहीत, त्यांना त्यांच्या खाजगी वर्तुळात दुसऱ्या कुणाला सहज प्रवेश द्यायला आवडत नाही. ते सार्वजनिक ठिकाणी फार सौजन्याने वागतात, पण त्यातही एक कृत्रिमता मला जाणवली.
अर्थात कुठल्या देशाला, त्यांच्या संस्कृतीला नावं ठेवायची नाहीयेत, प्रत्येकाचा आपला इतिहास- परंपरा असतात. या सगळ्या प्रवासांनी मला खूप काही शिकवलं, हे मात्र नक्की. तुरिनच्या वास्तव्यात परदेशातली, वेगवेगळ्या संस्कृतीतून शिकायला आलेली अनेक माणसं माझी खूप चांगली मित्रमंडळी बनली.
तिथून परत आल्यावर, आज परदेशातल्या अनेक फार्मा कंपन्यांसाठी मी ‘आयपीआर सल्लागार’ म्हणून काम करते, त्यासाठीही ते नेटवर्क उपयुक्त ठरलं. हे सुद्धा असं काही करेन, किंवा करता येऊ शकतं, हे मला कोर्स करण्यापूर्वी माहिती नव्हतं, पण गोष्टी घडत गेल्या आणि मी शिकत गेले.
– डॉ. मृदुला देशमुख-बेळे