महिला डॉक्टरांची झाडांची भिशी!

“शहरातील महिला डॉक्टरांचा आमचा एक ग्रुप आहे. आम्ही नियमितपणे भेटत असतो, विविध कार्यक्रम घेत असतो. सुमारे पाच वर्षांपूर्वीच अशाच आमच्या एका भेटीत वृक्षारोपणाचा उपक्रम घेण्याची चर्चा झाली आणि यातूनच मग झाडांची भिशी ही संकल्पना पुढे आली. मागच्या पाच वर्षांच्या काळात आमच्या ग्रुपने दहा हजारांपेक्षा अधिक झाडे विविध ठिकाणी केवळ लावलीच नाहीत तर त्यांचे संगोपनही केले आहे.” बीड शहरातील डॉ. सुनीता बारकुल सांगत होत्या.

बीड शहरातील महिला डॉक्टरांनी एकत्र येत झाडांची भिशी हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमातून शहराजवळील मोकळे डोंगर, शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलं आहे. ग्रुपकडून त्याचे संगोपनही केले जात असल्याने आज ही झाडे डौलदार झाली आहेत. अर्थातच त्यामुळे शहरातीलही अनेक रस्ते हिरवे दिसत आहेत.

या उपक्रमाबाबत डॉ.सुनीता बारकुल म्हणाल्या, “दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगच संकट आहे. शहरातही सिमेंटची जंगलं उभी राहत आहेत. प्रदूषण वाढते आहे. विकासाच्या नावाखाली मागील काही वर्षांत प्रचंड वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे, स्वच्छ ताजी हवाही हल्ली मिळत नाही. याचे आरोग्यावरही परिणाम होतात. म्हणून वृक्षारोपण व संगोपनासाठी आम्ही पुढाकार घेऊन ही भिशी सुरु केली आणि त्यात सातत्यही ठेवलं आहे.”

डॉ.जयश्री घुगे म्हणाल्या, “अशीच झाडे नष्ट होत राहिली तर एक दिवस कृत्रिम ऑक्सिजन लावून फिरण्याची वेळ माणसांवर येईल. असं घडायला नको, आपणच काहीतरी सुरुवात करावी म्हणून आम्ही पुढाकार घेत ही चळवळ सुरु केली. सुरुवातीला आम्ही केवळ १५ ते २० जणी होतो. हळूहळू संख्या वाढत गेली आता ४० महिला डॉक्टर आमच्या ग्रुपमध्ये आहेत.”
झाडांसाठीची जागेची निवड, वृक्षारोपण, संगोपन, त्यासाठीचा खर्च याचा ताळमेळ कसा बसवला याबाबत डॉ. बारकुल म्हणतात, “आम्ही पाचशे रुपये महिना म्हणजेच ६ हजार रुपये प्रति वर्ष अशी फी जमा करतो. जून महिन्यात वृक्षारोपणासाठीची जागा निश्चित केल्या जातात. चांगल्या प्रतिची झाडे घेऊन रोपण केले जाते. एका टँकरवाल्याशी करार करुन वर्षभर झाडांना पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था दिली जाते. शिवाय, आम्ही नियमित वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतो.”
या ग्रुपने शहरापासून जवळ असलेल्या रामगड येथे सुमारे साडेतीन हजार वृक्ष लावले होते. आज हा परिसर हिरवागार झाला आहे. तर, नायगाव अभयारण्य, मांजरसुंबा परिसर आणि बीड शहरातील आदर्शनगर, नाट्यगृह रोड, केएसके कॉलेज रोड अशा सर्वच महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावल्याने हरित बीड झाले आहे. मध्यंतरी रस्ते, नाल्यांच्या कामात काही झाडे प्रशासनाकडून तोडली गेली अशा वेळी या महिला डॉक्टरांनी प्रशासनाला पुन्हा वृक्षारोपण करण्यासही भाग पाडले होते.
“यंदा आम्ही शाळांना झाडे देण्याचे नियोजन केले आहे. ज्या शाळांकडे पाणी आहे, संरक्षक भिंत आहे अशा शाळांना वृक्षभेट देऊन शाळांना हरित करण्याचे काम केले जाणार आहे. या माध्यमातून मुलांशीही संवाद साधून त्यांनाही पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचा मानस आहे,” असे डॉ. सुनीता बारकुल म्हणाल्या.

नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

– अमोल मुळे, बीड

Leave a Reply