महिला पोलीसांचे ते पाच दिवस हलके करूया
“मला पोलीस दलात 24 वर्ष झाली. सुरवातीला 3-4 वर्ष माझ्याकडे गाडी नव्हती. समन्स, वॉरंटच्या ड्युट्या लागायच्या. तेव्हा कागदपत्र घेऊन पायी जावं लागायचं. येता जाता कुठं पब्लिक टॉयलेट असलं तर वापरायला मिळायचं. नाहीतर सरळ कोर्टात जायचं. तिथं पोहचेपर्यंत असंच ओलं होत राहावं लागायचं. 2010 मध्ये माझी नेमणूक सदर भागात होती. नागपूरमधला हा व्हि.आय.पी. भाग. शनिवार-रविवार तिथं नेहमी सरकारी निवासस्थानांजवळ बंदोबस्त लागायचा. जिमखान्याकडे राजकीय नेते यायचे. तेव्हा 12-12 तास ड्युटी असायची. एकदा बंदोबस्तादरम्यान पाळी सुरूच होती. रक्तस्राव जास्त होता आणि पॅड बदलता येत नव्हतं. युनिफॉर्मला डाग लागला. सोबतच्या महिला सहकाऱ्यांनी मला कव्हर केलं. बंदोबस्त संपल्यानंतरच तिथून निघता आलं”. कविता त्यांना पाळी दरम्यान आलेले अनुभव सांगत होत्या. पण नोकरीच्या सुरवातीला असलेला हा त्रास आता बऱ्यापैकी कमी झाल्याचंही त्या सांगतात. आता जनरल ड्युटी असेल तर, आठ तासांची ड्युटी सकाळी 10 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10 अशी विभागून असते. हल्ली बऱ्याचशा पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलिसांकरता रेस्ट रूम आणि वॉशरूमची सोय असते. सॅनिटरी पॅड व्हेडिंग मशीन आणि इनसिलेटर असतं. त्यामुळं खूप दिलासा मिळतो. मुलीही पॅंटच्या आत दोन-दोन स्लॅक्स घालतात. पण सततच्या ओढाताणीमुळे कवितांच्या गर्भाशयात तीन गाठी झाल्या. पुढील धोका लक्षात घेऊन तातडीनं शस्त्रक्रिया करून त्यांचं गर्भाशय काढावं लागलं.
कवितांच्या शेजारच्या जिल्ह्यातल्या म्हणजेच चंद्रपूरच्या मालती यांच्याशी आम्ही बोललो. मालती यांनी थेट सांगितलं की, “बाहेर ड्युटीवर असताना पाळीचा त्रास होत असेल तर सगळेच पुरूष वरिष्ठ अधिकारी समजून घेत नाहीत. समजून घेणारा अधिकारी नसेल तर आम्हांला सामान्य नागरीकांची मदत घ्यावी लागते”. आपल्याला माहिती आहेच, पाळीच्या दिवसांमध्ये बऱ्याच महिलांना कंबर-पाठदुखीचा त्रास, पायात गोळे येणे, ओटीपोटात दुखणे हा त्रास होतो. महिला पोलीसही याला अपवाद नाही. बंदोबस्ताकरता एका जागी बराच वेळ उभं राहवं लागतं. कधी कधी 12 तासही सलग उभं राहावं लागतं. पाळीच्या काळात बंदोबस्ताची ड्युटी लागली की खूप वेळ उभं राहता येत नाही. पण बसायची सोय नसल्याने सतत उभं राहवंच लागतं. बल्लारपूरमध्ये सगळ्याच धर्माचे सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. या सगळ्या उत्सवात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. त्यामुळे या सर्व ठिकाणी महिला पोलीस मोठ्या संख्येनं बंदोबस्ताकरता असतात. मालती सांगतात, आमच्या बॅगेत आणि गाडीच्या डिकीमध्ये नेहमीच सॅनिटरी पॅड असतंच. पण कधी कधी अति रक्तस्राव होतो आणि युनिफॉर्मला डाग लागतो. लोकं कितीही सुशिक्षित असली तरी युनिफॉर्मला लागलेल्या डागाकडे बघण्याची त्यांची नजर विचित्र असते. डाग लागला याचं आम्हांला काही वाटत नाही. पण लोकांच्या नजरेमुळं आम्हांला लाजिरवाणं व्हायला होतं. अडचणीच्या काळात रेस्टरुमला आराम करत असू तर काही पुरूष सहकाऱ्यांचे टोमणेही ऐकावे लागतात. मालती गेली 12 वर्ष पोलीस दलात आहेत.
ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सीमा सांगतात, “पावसाळ्यात पाळीच्या दिवसांमध्ये बाहेर काम करताना खूप अडचण येते. पाणी साचलंय, पाऊस सतत सुरू असेल तर काम करताना त्रास होतो. त्यात इतर सिव्हिल ड्रेसमध्ये कुर्ता वगैरे असेल तर महिलांना युनिफॉर्मला लागलेला डाग लपवता तरी येतो. आम्हांला तर तेही शक्य होत नाही. ड्युटीच्या ठिकाणाजवळ पोलीस स्टेशन असेल तर तिथली वॉशरूम वापरता येते. पण पोलीस स्टेशन/चौकी नसली की सार्वजनिक टॉयलेट वापरावे लागतात. पण त्यांची अवस्था फारशी चांगली नसल्याने तिथंही अडचण होते.” सध्या त्या कंट्रोलरूमला काम करतात. पण ऑफिसमध्ये काम करत आहेत म्हणून त्यांना हवं तेव्हा वॉशरुममध्ये जाऊन पॅड बदलता येतं का? तर त्याचंही उत्तर नाही असंच आहे. कारण हातातलं काम महत्त्वाचं असल्यानं ते पटकन सोडून जाता येत नाही. प्रत्येक वेळी समोरचा समजून घेईलच असं नसतं.
कविता, मालती आणि सीमा या तिघींनीही सांगितलं की, कामाच्या प्रेशर आणि स्ट्रेसमुळं बऱ्याच जणींना पाळी 5 ते 10 दिवस लवकर येण्याचं प्रमाणही खूप आहे. बंदोबस्त कधी कधी आपल्या पोलीस स्टेशनपासून 35-40 किमी दूर अंतरावरही असतो. त्या जागी वॉशरुमची सोय उपलब्ध असेलच असं नाही. अशा वेळी सिनियर आणि इतर महिला सहकाऱ्यांना आपल्या परिस्थितीची कल्पना देतात. संवेदनशील सिनियरकडून सहकार्य मिळतं. बाहेर बंदोबस्ताच्या ठिकाणी महिला पोलीस जवळपास वॉशरूम कुठे आहे हे पाहून ठेवतात. कधीकधी याकरता स्थानिक नागरिकांचीही मदत होते. पण अचानक कुठे काही घडतं तर अशावेळी जरा कठीण होतं.
यवतमाळमधील लोहारा पोलीस ठाणे 2 जानेवारी 2022 पासून संपूर्ण महिला पोलीस ठाणे आहे. इथं 57 महिला पोलीस कार्यरत आहेत. हे पोलीस ठाणे व्यस्तही बरंच आहे. सर्वच महिला असल्याने इथं चार-चार तासांची मिळून जनरल ड्युटी करता येत नाही. त्यामुळं गुन्हे, तपास, बंदोबस्त सर्वच महिला पोलीस हाताळतात. या सर्वांमध्ये महिला एकमेकींना सांभाळून घेतात. त्यामुळं पाळीच्या दिवसातही त्यांना फार त्रास जाणवत नाही.
या सर्व महिला पोलिसांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आणि कामाचा अभिमानही ठासून आहे. त्यामुळं या प्रत्येकीनं हेच म्हटलं की, “आमचं कामच अशाप्रकारचं आहे, जिथं प्रत्येक वेळी सुविधांची अपेक्षा तरी कशी करणार?”
आपल्या कडचे विविध धर्मांचे सण, उत्सव, राजकीय सभा, महोत्सव यांच्या भाऊगर्दीत महिला पोलिसांच्या वाटेला जनरल ड्युट्या कितीशा येत असतील? त्यामुळे बऱ्याचदा कोणता तरी बंदोबस्त असतोच असतो. सर्व पुरूष अधिकारी व सहकाऱ्यांनी आणि विशेषतः शासनकर्त्यांनी संवेदनशीलतेनं महिला पोलिसांची ‘अडचण’ समजून घेतली तर महिला पोलीसांचे ते पाच दिवस थोडे हलके होतील.
(सूचना- या लेखातली महिला पोलिसांची नावे बदलण्यात आली आहेत.)
– साधना तिप्पनाकजे

Leave a Reply