पढेंगे लिखेंगे तो बनेंगे नवाब, खेलेंगे कुंदेंगे तो बनेंगे कामयाब!

पढेंगे लिखेंगे तो बनेंगे नवाब, खेलेंगे कुंदेंगे तो बनेंगे खराब! अशी हिंदीमध्ये एक प्रचलित म्हण आहे. यावर बऱ्याच पालकांचा कळत नकळत विश्वास असतो. त्यामुळेच खेळात मुलांचा वेळ वाया जातो असं मानणारे पालक आपल्या आसपास पाहायला मिळतात. मग ‘खेळ’ ही व्यक्तिमत्व  विकास आणि स्त्री सक्षमीकरणाची पहिली पायरी मानणे म्हणजे ‘मृगजळामागे धावणे’च नाही का? हा समज खोडून काढला तो माया पवार या शिक्षिकेने. कसा? वाचा तर मग.

सातारा जिल्ह्यातलं गाव. कारी. इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतल्या शिक्षिका माया पवार. माया पवार यांचे वडील प्राथमिक शिक्षक आणि आई अंगणवाडी शिक्षिका. मुलगा हवा या प्रतिक्षेत झालेली चौथी मुलगी म्हणजे माया. मुलगा व्हावा म्हणून घरात उपवास, व्रत-वैकल्य सुरू असताना मायाचा जन्म झाला. त्यामुळे घरात सगळेच नाराज. माया मोठी होत गेली तसं तिच्या जन्माबद्दलची घरातल्यांची नाराजी तिच्या लक्षात येऊ लागली. त्या कोवळ्या वयातही माया या प्रश्नाचे उत्तर शोधू लागली. आणि इथूनच त्यांची शोध बुद्धी विकसित व्हायला लागली. माया इयत्ता पाचवीत असताना तिने शाळेत मल्लखांबचे प्रात्यक्षिक बघितलं. आणि ती या खेळाकडे आकर्षित झाली. मल्लखांब खेळताना धाडस, निर्णय घेण्यास वाव आहे असं मायाच्या लक्षात आलं आणि प्रशिक्षक सुजित शेडगे यांच्याकडे तिने मल्लखांब शिकण्यास सुरूवात केली.  पुढे शिक्षण घेत असताना त्यांनी विभाग, तालुका, जिल्ह्या स्तरावर मल्लखांब, भालाफेक, व्हॉलीबॉल, खेळात यश प्राप्त केले. शिवाय त्यांना सलग पाचवेळा राष्ट्रीय पातळीवर खेळल्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून १९९६ मध्ये मायाला शिव छत्रपती पुरस्कार मिळाला. आणि मायाच्या जन्माच्या वेळी उदास झालेल्या लोकांनी सुध्दा तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. मुलगी म्हणून जन्माला आल्यावर जे स्वागत, कौतुक झालं नाही ते मल्लखांब खेळाडू म्हणून मिळवता आलं,  हे मायाला कळून चुकलं. म्हणून माया म्हणतात, “खेळ हे मुलींचा स्वाभिमान, आत्मविश्वास, धाडस, निर्णय व शारीरिक क्षमता, अंतस्थ अवयवांची वाढ, शरीराची आंतर्बाह्य ताकद वाढवतात म्हणून खेळातून मुलींचे सक्षमीकरण आणि व्यक्तिमत्तव विकास होतो.” दृष्टिकोन, शारीरिक व मानसिक विकास या सगळ्यावरच खेळाचा उत्तम परिणाम होतो, हेही मायाच्या लक्षात आलं होतं. म्हणूनच ही सावित्रीची लेक, शिक्षणाबरोबरच खेळातूनही स्त्री सक्षमीकरण होऊ शकते हे  मुलींनाच नाही तर पालक आणि समाजाला दाखवून द्यायचं, या प्रेरणेने शिक्षकी पेशात आली. मायाच्या नावावर फक्त खेळाडू म्हणूनच नाही तर आदर्श शिक्षक, क्रीडा पुरस्कार, आदर्श गुरु शिष्य, कर्तबगार स्त्री, आणि अग्रगण्य महिला असे अनेक पुरस्कार आहेत.

1999 मध्ये माया पवार कारी गावात प्राथमिक शिक्षिका म्हणून रूजू झाल्या. कारी हे गाव साताऱ्यापासून सज्जनगडच्या दिशेला १६ किलोमीटरवर आहे. या गावाला जाणारा निम्मा रस्ता दगड गोट्यानी भरलेला आहे. या रस्त्यावरून दुचाकी चेंडू प्रमाणे टप्पे खाते तर चार चाकी खवळलेल्या समुद्रातील लाटांवरून चाललेल्या बोट प्रवासाचा अनुभव देते. या गावाची लोकसंख्या सुमारे २००० (महिला १०४० आणि पुरुष ९६०) मुख्य व्यवसाय शेती आणि मुख्य पीक तांदूळ. बहुतेक लोकांनी केवळ प्राथमिक शिक्षणचं घेतलं आहे. मुलींसाठी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणं म्हणजे एक मोठे दिव्य पार पडण्यासारखे आहे. इथं शालेय शिक्षणाबरोबर खेळाचेही प्रशिक्षण नियमितपणे दिलं जात होतं. त्यात माया यांनी मल्लखांब शिकविण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आणि यंत्रणा बाकी शिक्षकांच्या सहकार्याने बनवली. आणि मुलांबरोबर मुलींचंही मल्लखांब प्रशिक्षण सुरू झालं.

मल्लखांब मुलींचा खेळ नाही, खेळताना हाफ पॅन्ट घालावी लागते, हे मुलींना शोभत नाही, त्यांना अपंगत्त्व येईल, मग त्यांची लग्न कशी होणार, मुली ऐकण्याबाहेर जातील अशी अनेक प्रकारची भीती पालकांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी मुलींचं मल्लखांब शिकणं थांबलं. मग माया यांनी पालकांना भेटायला सुरूवात केली. त्यांना समजावलं, “चिखलाने माखलेल्या शेतात आपण भात लावणी करतो तेव्हा साडी गुडग्याच्या वरपर्यंत खोचून घेतो. त्यात आपल्याला काही वावगे वाटत नाही. मग मुलींनी मल्लखांब खेळताना हाफ पॅन्ट घातली तर त्यात काय चुकीचं आहे?” उलट या खेळातून मुली सक्षम होतील. यातूनच त्यांचा व तुमचा भविष्यातील शारीरिक व मानसिक ताण-तणाव कमी होईल असं त्यांनी पालकांना पटवून दिलं. मुलींनी मल्लखांब शिकायला पुन्हा सुरूवात केली. म्हणजेच पालकांना मायाचं म्हणणं पटलं होतं.

माया यांनी मुलं आणि मुली दोघांनाही मल्लखांबांचं प्रशिक्षण दिलं. मुलींनी त्याला भरघोस प्रतिसाद दिला. आजपर्यंत त्यांनी समर्थ मल्लखांब संघ, कारी या संस्थेतून 1200 मुलामुलींना मल्लखांबाचे प्रशिक्षण दिलं आहे. विशेष म्हणजे संस्थेचा सर्व कारभार, उपक्रम मुलीच बघतात. या 1200 विद्यार्थ्यांपैकी 500 विद्यार्थ्यांची तालुका, 250 जिल्हा, 35 राज्य, 17 राष्ट्रीय पातळीवर आणि एकाची आंतराष्ट्रीय पातळीवर निवड झाली. त्या सांगतात, या विद्यार्थ्यांपैकी राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मुली पोहोचल्या आहेत. आतापर्यंत 50 पेक्षा जास्त सुवर्णपदकं मुलींनी राष्ट्रीय स्तरावर मिळविली आहेत याचा आभिमान वाटतो. मात्र त्याच संख्येने मुलं नाहीत याचा खेदही वाटतो. यात आपण कुठे कमी पडतो आहोत हे चाचपण्याची गरज वाटते.

माया यांच्या मल्लखांब खेळणाऱ्या मुलींची झुंड शैक्षणिक क्षेत्रातही चांगली कामगिरी करत आहे हे तेव्हाचे शिक्षण विस्तारअधिकारी प्रतिभा भराडे यांनी बघितलं. त्यांनी शिक्षक, पालक आणि प्रशासनाच्या मदतीने कुमठे बीटच्या 40 शाळांतील हजारो विद्यार्थ्यापर्यंत मल्लखांब पोहोचवला. आता पालकांनीही मुलींचं शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील यश पाहून मुलींच्या आहार आणि प्रशिक्षणावर खर्च करण्यास सुरुवात केली आहे. मल्लखांब प्रशिक्षण केंद्रातील एक मुलगी आता पीएसआय झाली आहे. तर गावातील प्रियांका मोरे आणि तेजस्विनी मोरे या दोघींनी आंतरराष्ट्रीय मल्लखांब पंच म्हणून काम केलं. या मुलींचा गौरव जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आणि आमदार यांनी गावात येऊन केला. यामुळे गावातील आणि परिसरातील लोकांचा खेळाकडे आणि मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

माया सांगतात, “मुलींचे खेळातून सक्षमीकरण याबद्दल म्हणतात मुलींनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकावे, वैचारिक दृष्ट्या स्वतंत्र व्हावं, समाजाला काहीतरी स्वइच्छेने दयावे आणि त्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न तिने स्वतः करावे.” प्रीती मोरे, प्रियांका मोरे, वर्षा मोरे या कारीतल्या मल्लखांब विद्यार्थिनींची नावे त्या अभिमानाने घेतात. प्रीती आणि प्रियांका या गावात आणि मुंबईत मल्लखांबाचे प्रशिक्षण देत आहेत. तर वर्षा मोरे ही साताऱ्यात स्वत्रंतपणे महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवीत आहे.

भारतात झालेल्या पहिल्या मल्लखांब विश्व् चषक स्पर्धेत १५ देशांनी सहभाग घेतला होता, भारताचे प्रतिनिधित्व ६ मुलींनी केलं. त्यात २ मुलींपैकी एक मुंबईची आणि दुसरी प्रतीक्षा मोरे कारीसारख्या दुर्गम भागातून परंपरागत पद्धतीने मल्लखांबचे प्रशिक्षण घेऊन आलेली होती, हे सांगताना त्यांचा स्वर अभिमानाने भारलेला असतो.

आता माया यांनी पुढील पाच वर्षासाठी दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थिनीसाठी मल्लखांब प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली आहे. माया पुढे म्हणतात, की त्यांना शरीरशास्त्राचाही अभ्यास करायचा आहे. मल्लखांबविषयी आणि स्त्रियांसाठी ‘स्वतःचे स्वतंत्र म्हणजे काय’ यावर लिखाण करायचं आहे.

माया सांगतात, “की सरकारने इतर शालेय स्पर्धांप्रमाणेच क्रीडा स्पर्धासुध्दा प्राधन्याने घ्याव्यात. राज्यस्तरावरील स्पर्धांचे समाधानकारक संख्येने आयोजन झाले पाहिजे, क्रीडा शिक्षकांची उपलब्धता, क्रीडा शिक्षणाचे मूल्यमापन काटेकोरपणे व्हावे, बक्षिसांची यंत्रणा उत्तम आणि निरंतर असावी.

पढेंगे लिखेंगे तो बनेंगे नवाब, खेलेंगे कुंदेंगे तो बनेंगे खराब!हे विधान मायाने तिच्या मल्लखांब खेळणाऱ्या मुलींच्या झुंडीसोबत मिळून पढेंगे लिखेंगे तो बनेंगे नवाब, खेलेंगे कुंदेंगे तो बनेंगे कामयाब!असं  रूपांतरित केले आहे.

  • मीनाकुमारी यादव

Leave a Reply