इथे भरतो माणसांचा बाजार…
नाशिक – दोन वेळच्या जेवणाची भ्रांत.. कामाच्या शोधात गावातील मुख्य बाजार पेठेतील जागा पकडत कुटूंब कबिल्यासह उभं राहयंच.. काम मिळालं तर ठीक. नाही तर काम मिळेपर्यंत तिथंच थांबायचं.. कारण या ठिकाणाहून मिळणाऱ्या रोजी रोटीवरच पावसाळ्याचे गणित अवलंबून. कामाची शाश्वती नसली तरी २५ हजाराहून अधिक रोजगार मजुराच्या बाजारात रोज नव्या उमेदीने उभे राहतात. नाशिकच्या गिरणारे परिसरात भरणाऱ्या मजूर बाजाराची ही गोष्ट.
नाशिक पासून साधारणतः दहा किलोमीटरवर असलेल्या गिरणारे गावात मजुरांचा बाजार भरतो. गिरणारे गावाजवळ असलेल्या त्र्यंबकेश्वर, हरसुल, पेठ, सुरगाणा परिसरासह गुजरात सीमारेषेवरील गावातूनही मजूर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात. सर्वाधिक पावसाचा हा परिसर. आणि शेती हा इथला पोटा पाण्याचा मुख्य व्यवसाय. पण पावसाचं पाणी संपलं की शेतीची कामं थांबतात. मग सुरू राहते वर्षभरासाठी दाणा पाणी जमवण्याची धडपड. घरातील लहान तसंच वयस्कर मंडळी सोडली तर सगळीच पाण्याच्या, नोकरीच्या शोधात निघतात. कधी रोजंदारीवर, दोन ते तीन महिन्याच्या बोलीवर तर कधी कधी वर्षाच्या करारावर काम शोधत राहतात. गिरणारे येथील मजूर बाजार काम मिळण्याचे एकमेव ठिकाण.
हा बाजार वर्षभर सुरू असला तरी इथं मुलभूत सोयी सुविधांची वानवा आहे. खेडोपाड्यातून येणाऱ्या मजुरांना उन्हातान्हात, पावसात उभं राहावं लागतं. त्यांच्यासाठी कुठलीही शेड नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आणि नैसर्गिक विधींसाठी शौचालय नाही. मजुरी मिळवण्यासाठी पूर्ण कुटुंबच्या कुटुंब इथं येतं. त्यावेळी त्यांच्या जवळ असलेल्या शिदोरीवरच त्यांची जेवणाची व्यवस्था होते. घरून निघतांना कोरडा शिधा, लाकुडफाटा असतो. काम मिळेपर्यंत या शिदोरीवरच त्यांना अवलंबून रहावं लागतं. या ठिकाणी स्थलांतरीत मजुरांचे प्रमाण अधिक. ३० वर्षांपेक्षा जास्त काळापासून हा मजुरांचा बाजार सुरू आहे. या बाजारात येणाऱ्या मजुरांचे ठेकेदार ठरलेले असतात. ते स्वत:ही काम शोधण्यासाठी बाजारात फिरत राहतात.
मजुरांना काम मिळतं ते बरेचदा द्राक्ष बागा, कांदा शेती, टोमॅटो यांची शेती करणारे करणाऱ्या शेतकऱ्यांकडून. त्यासाठी दिंडोरी, निफाड, मातोरी, नाशिक, पिंपळगाव बसवंत भागातून ते शेतकरीही मजुरांच्या शोधार या बाजारात येतात. मजुरांची ने-आण करण्यासाठी इथूनच कामानुसार व्यवस्था केली जाते. मजूर रोजंदारीवर असतील तर सकाळपासून सायंकाळपर्यंतची मजुरी ठरवली जाते. त्यांची ने-आण आणि जेवणाची तजवीज केली जाते. महिलांना 250 ते 300 तर पुरूषांसाठी ४०० ते ५०० रुपये मजुरी ठरते.
आठवड्याभराचे काम असल्यास सकाळ, संध्याकाळ दोन सत्रात काम करत असल्यास दुप्पट मजुरी दिली जाते. शेतीचं काम नाही मिळालं तर बांधकामाच्या ठिकाणी हे मजूर जातात. हे मजूरही मूळचे शेतकरी त्यामुळे ते शक्यतो शेतीच्या कामाला प्राधान्य देतात.
या मजूर बाजारात कामं मिळत असली तरी हे असंघटीत कामगार असल्यामुळे त्यांना सुरक्षितता नाही. विमा नाही आणि आरोग्य सुविधाही नाही. कामाच्या ठिकाणी अपघात घडला तर कसलीच हमी नाही. तरीही पोटासाठी कामं सुरूच राहतात. काही वेळा ठराविक रक्कम आगाऊ घेत हे मजूर शेतकऱ्यांच्या घरी कामाला जातात तेव्हा वेठबिगार म्हणूनच त्यांना वागणूक मिळते. मजुराला, त्याच्या बायकोला सणावारालाही घरी जाऊ दिले जात नाही. कामाच्या वेळे व्यतिरिक्तही अखंडपणे त्यांना कामाला जुंपलं जातं. या विरोधात जिल्हातील दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
काम मिळेल याची शाश्वती नाही, काम मिळालं तरी सुरक्षितता नाही. असं असतानाही हे मजूर या बाजारात येत असतात. अशावेळी त्यांना तेथील वाहनचालकांचा मदतीचा हात पुढे येतो. गावातून गिरणारे येथे येण्यासाठी ३० ते ५० रुपये भाडे असते. काम नसल्यावर पुन्हा घरी परतण्यासाठी भाडं कुठून आणायचं हा प्रश्न असतो. तिथंच थांबायचं तर जेवणाचं काय? तेव्हा इथले काळ्या-पिवळया रिक्षावाल्यांची मदत मिळते. ते मजुरांना पहिल्या जागी सोडतात. भाड्यासाठी थांबतात. काम मिळालं की पैसे द्या असं सांगतात. या विषयी बोलतांना वाहनचालक गणेश महाले सांगतात, हे मजूर घरातील माणसांना सोडून कामाच्या शोधात बाहेर पडलेले असतात. काम मिळेल याची खात्री नसते. मजुरांच्या बाजारात राहायची व्यवस्था नाही. अशा वेळी माणुसकी म्हणून त्यांच्याकडून भाडं घेत नाही. ज्या वेळी काम मिळेल तेव्हा द्या असे सांगतो. काहीजण जण अर्ध्या भाड्यात घेऊन जातात.
जिल्हात मजूर बाजारात २० हजारांहून अधिक मजूर दिवसाकाठी ये-जा करत असतात. केंद्र सरकारच्या ई-श्रम सारख्या योजना त्यांच्या पर्यंत पोहचलेल्या नाहीत. असंघटीत कामगार आदिवासी असले तरी आदिवासी विकास भवन, आदिवासींसाठी असलेली समिती यांच्यासाठी आवाज उठवत नाही.
– प्राची उन्मेष, नाशिक

Leave a Reply