गेल्या आठवड्यात सगळीकडे होळी- धुलिवंदन आनंदात साजरं झालं. वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धती, परंपरा. मंगळूर पालमपटमध्येही शुक्रवारी रंग-पाणी न खेळता धुलिवंदन झालं. मंगरूळ पालमपट, परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातलं ४१२ हेक्टरवरचं साधारण २०० कुटुंबाचं गाव.
धुलिवंदनाच्या दिवशी भल्या पहाटे गावकऱ्यांनी उठून गावाची विशेष स्वच्छता केली. शेणाचे सडे टाकून रांगोळ्या काढल्या. पाणीबचतीचा संदेश देणारी जलदिंडी गावकऱ्यांनी काढली. भजन-कीर्तन झालं. ग्रामविकास, पर्यावरण, गावातली एकी यावर चर्चा झाली.
”गेली ९ वर्ष आम्ही अशाच प्रकारे रंगपंचमी साजरी करतो. गावातल्या प्रत्येक जाती-धर्माचा माणूस यात आपणहून सहभागी होतो. वेगवेगळे धार्मिक-सामाजिक कार्यक्रम, युवा पिढीला उपयोगी होईल असे मार्गदर्शनपर कार्यक्रम, व्याख्यानं करतो. यानिमित्ताने शिक्षण, व्यसनमुक्तीचं महत्त्व मुलांना समजतं.” ग्रामस्थ सांगतात.
९ वर्षांपूर्वी दुष्काळामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागलं होतं. अशा स्थितीत पाण्याची नासाडी करणं योग्य नाही, असं गावातल्या ज्येष्ठ मंडळींना वाटलं. शिवाय सणाच्या निमित्तानं होणारं मद्यपान, गैरप्रकार यापासून आपल्या तरुण पिढीला दूर ठेवलं पाहिजे आणि त्यांना चांगला मार्ग निवडता आला पाहिजे, असं ज्येष्ठांना वाटलं. तेव्हापासून अशा पद्धतीने सण साजरा करायचं गावातल्या लोकांनी ठरवलं. आज या उपक्रमाचा योग्य उपयोग झाल्याचं समाधान गावकऱ्यांमध्ये आहे. गावातले रस्ते कायम स्वच्छ असतात.
”कार्यक्रमाचं नियोजन तरुण मंडळीच करतात. उत्सवासाठी सगळे मिळून काम करतात.” समाधान नीलवर्ण सांगतात.
”दरवर्षी आम्ही अशाच पद्धतीनं धुलिवंदन साजरं करणार आहोत,” गावातले तरुण सुकेश नीलवर्ण सांगतात. ”पाण्याचं महत्त्व सांगणाऱ्या या उत्सवाची परंपरा पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.”