ताप येण्याची कारणे आणि निदान
व्हायरल इन्फेक्शन
व्हायरस हे बॅक्टरीया पेक्षाही सूक्ष्म असतात. ते साध्या मायक्रोस्कोप मधून दिसत नाहीत. ते फक्त दुसऱ्या सजीव पेशीतच वाढत असल्याने त्यांचे कल्चर करता येत नाही. त्यामुळे अप्रत्यक्ष पद्धतीने अँटिबॉडीजची टेस्ट करून ह्याचे निदान होते. प्रत्येक व्हायरसची वाढण्याची पेशी ठरलेली असते. त्याला जवळच्या मार्गाने तो शरीरात प्रवेश करतो. मात्र काही काळाने प्रत्येक व्हायरस रक्तात जातोच आणि त्यानंतर कोणत्याही अवयवात जाऊ शकतो. पण तोपर्यंत शरीरात अँटिबॉडीज तयार होतात आणि त्या व्हायरसचा नाश करतात. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन्स साधारण एका आठवड्यात बरी होतात.
वायरल इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिक देऊ नये. म्हणून ताप वायरल नाही ना ह्याची आधी खात्री करणे आवश्यक असते.
वेगवेगळे व्हायरस पुढीलप्रमाणे आहेत –
गोवर, कांजिण्या, गालगुंड हे सुद्धा व्हायरसपासून होतात. पण हे लहान मुलांमध्ये होतात आणि त्यांच्या बाह्य लक्षणांवरून त्यांचे निदान होते. मात्र गरोदरपणात हे रोग झाल्यास अपत्याला जन्मजात व्यंग होऊ शकते. म्हणून गरोदरपणात पहिल्या 3 महिन्यांत गोवर किंवा जर्मन गोवर सदृश रॅश आल्यास ह्या रोगाच्या अँटीबॉडीज तपासल्या जातात.
हेपटायटीस A: हा लिव्हरमध्ये वाढणारा व्हायरस आहे. ह्याचा प्रसार पिण्याच्या पाण्यातून होतो. ह्यामुळे कावीळ होते. ह्याची साथ येते. मुंबईत पाण्याच्या क्लोरीनेशनमुळे आता साथ येत नाही. ह्याचे निदान पूर्वी कावीळ झाली की होत असे. मात्र आता अँटिबॉडीजसाठी तपासणी करून होते.
हेपाटायटीस B: हा सुद्धा लिव्हरमध्ये वाढणारा व्हायरस आहे. मात्र हा शरीर संबंध, रक्त आणि इतर स्त्रावातून पसरतो. ह्यामुळे लिव्हर सिरोसिस आणि कॅन्सर होऊ शकतो म्हणून खूप धोकादायक आहे.
ह्याचे निदान अँटीजेन तपासणी (HBSAg)ने होते. रोग असल्याचे सिद्ध झाले तर पुढे वायरल लोड ही टेस्ट करून व्हायरसची संख्या कमी होत आहे का हे बघितले जाते. ह्यासाठी PCR ही पद्धत वापरली जाते.
रक्तदान केल्यावर सर्व बॅग्स मधील सॅम्पल्सवर ही टेस्ट करावी लागते. पॉझिटिव्ह असलेली बॅग नष्ट करावी लागते व रक्तदात्याला बोलवून त्याची चाचणी करावी लागते.
हेपाटायटीस C: हासुद्धा हेपाटायटीस B प्रमाणे रक्त व स्रावांतून पसरतो. ह्यामुळेही लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो. रक्ताच्या बॅग्सची HCV तपासणी सुद्धा करावी लागते.
ह्याचे निदान अँटिबॉडीज तयार झाल्याचे दाखवून होते. रोग झाल्याचे निदान झाल्यावर वायरल लोड करून व्हायरसची संख्या किती आहे बघावे लागते. ह्यासाठी PCR ही पद्धत वापरली जाते.
HIV: 1985 पासून हा रोग भारतात आला. मुख्यतः शारीरिक संबंधातून पसरत असल्याने ह्याच्या रोग्यांना सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागायचे. आता ह्याची भीती कमी झाली आहे.
HIV व्हायरस हा सर्वात जास्त धोकादायक आहे कारण तो रक्तातील लिंफोसाईट नावाच्या पांढऱ्या पेशीत वाढतो. ह्याच पेशींमुळे आपल्याला रोग प्रतिकार शक्ती मिळते. HIV मुळे ह्या पेशी कमी कमी होत जातात आणि शेवटी 200 पेक्षा कमी झाल्यावर एड्स होतो व पेशंटचा मृत्यू होतो.
निदान
HIV चा शरीरात शिरकाव झाल्यापासून अँटिबॉडीज तयार व्हायला साधारण एक महिना तरी लागतो. ह्याला विंडो पिरियड असे म्हणतात. पहिले निदान अँटिबॉडीज तयार झाल्याचे दाखवून करतात. पेशन्ट विंडो पिरियडमध्ये असेल तर व्हायरस शरीरात असूनही टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते. ह्यासाठी टेस्ट करण्याआधी आणि टेस्ट नंतर पेशंटशी बोलावे लागते. त्याचे वागणे HIV ला पूरक असेल तर टेस्ट निगेटीव्ह आली तरी काही काळाने पुन्हा करावी लागते. पूर्वी खात्री करण्यासाठी वेस्टर्न ब्लॉट ही टेस्ट करायचे. आता PCR टेस्ट करतात.
CBC: पांढऱ्या पेशी कमी होत जातात.
CD4/CD8 रेशो: ही टेस्ट एड्स होण्याची शक्यता किती आहे हे बघण्यासाठी करतात.
हल्ली प्रत्येक सर्जरी आधी पेशन्टच्या HIV, HCV, HBSAg ह्या टेस्ट करतात.
डेंगू: डेंगू हा व्हायरसमुळे होणारा रोग डासांमार्फत पसरतो. एडिस इजिप्ती ह्या प्रकारचे डास रोग्याच्या रक्तातील व्हायरस दुसऱ्या निरोगी व्यक्तीच्या रक्तात पोचवतात.
ह्यामुळे रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात. त्यामुळे आतल्या आत रक्तस्त्राव होतो. सांधेदुखी, डोकेदुखी, ताप ही लक्षणे दिसतात. ह्याची साथ येते.
निदान
CBC: हिमोग्लोबिन वाढते, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट कमी होतात.
डेंगू NS1 अँटीजेन: ही टेस्ट तापाच्या पहिल्या दिवशी पॉझिटिव्ह येते. नंतर निगेटिव्ह होऊ शकते.
डेंगू अँटिबॉडीज: IgM प्रकारच्या अँटिबॉडीज साधारण 5 दिवसांनी पॉझिटिव्ह येतात.
IgG प्रकारच्या अँटिबॉडीज 15/20 दिवसांनी पॉझिटिव्ह येतात. त्या बरीच वर्षे राहतात.
ह्याशिवाय डेंग्यूचा लिव्हरवर परिणाम होत असल्याने लिव्हर फंक्शन टेस्टस सुद्धा करतात.

Leave a Reply