मलेरिया आणि हत्तीरोग
मलेरिया: प्लाझमोडियम ह्या एकपेशीय सजीवामुळे हा रोग होतो. हे जीव ऍनाफेलीस ह्या डासाच्या मादीच्या लाळ ग्रंथीत वाढतात आणि तिथे साठून राहतात. जेव्हा ती माणसाला चावते तेव्हा हे जंतू माणसाच्या रक्तात सोडले जातात. ते तांबड्या पेशींमध्ये शिरतात आणि हळूहळू वाढू लागतात. त्यांच्यापासून स्त्री आणि पुबीजे(गॅमेट्स) तयार होतात. मग ती तांबडी पेशी तुटते आणि ती गॅमेट्स रक्तात मिसळतात. ह्यावेळी आपल्याला ताप येतो. थंडी भरते. ह्यावेळी डास चावल्यास ही गॅमेट्स त्याच्या अन्ननलिकेत आणि तिथून लाळ ग्रंथीत जातात. तिथे त्यांचे मिलन होऊन पुन्हा नवे जीव तयार होतात व चक्र पूर्ण होते.
प्लाझमोडियमचे फॅलसीपॅरम व व्हायवाक्स असे प्रकार आहेत.
फॅलसीपॅरममुळे तांबड्या पेशींचा नाश खूप जास्त होतो. त्यामुळे प्लाझ्मामध्ये हिमोग्लोबिन मिसळते. ह्याने किडनीला इजा होऊन मृत्यू येऊ शकतो. फॅलसीपॅरम मेंदूमध्ये सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळेही मृत्यू होऊ शकतो.
व्हायवाक्स तसा कमी गंभीर आहे पण लिव्हरमध्ये बराच काळ राहून पुन्हा पुन्हा रोग निर्माण करू शकतो.
निदान
CBC: हिमोग्लोबिन कमी होते, प्लेटलेट्स कमी होतात.
डेंगू आणि मलेरिया ह्या दोन्ही साथी साधारण पावसाळ्यानंतर येतात. दोन्हीमध्ये प्लेटलेट्स कमी होतात. पण डेंगूमध्ये हिमोग्लोबिन वाढते तर मलेरियामध्ये कमी होते.
रक्त स्लाईडवर घेऊन बघितल्यास प्लाझमोडियमचे जंतू दिसतात.
मलेरियाची कार्ड टेस्ट सुद्धा असते.
फॅलसीपॅरम असल्यास बरेचदा शिरेतून औषध द्यावे लागते. व्हायवाक्स असल्यास एक वेगळे औषध द्यावे लागते. ह्यासाठी कोणता प्रकार आहे ह्याचे निदान आवश्यक आहे.
औषधाने लगेच बरा होणारा हा रोग आहे. मात्र उशीर झाल्यास मृत्यूपर्यंत पोचवतो. म्हणून लगेच अचूक निदान आवश्यक ठरते.
हत्तीरोग
माझ्या वडिलांना ताप येत होता आणि त्यांचा एकच पाय सुजला होता. तेव्हाच माझी आई गेली होती. त्या दुःखात त्यांना डॉक्टरकडे नेले गेले नाही. साधारण 8 दिवसांनी MD डॉक्टरकडे गेलो. तिने ही लक्षणे हत्तीरोगाची आहेत. हेच निदानाचे निकष आहेत हे सांगितले. नंतर औषध घेतल्याने पायाला आणखी सूज आली नाही पण जेवढी सूज होती तेवढी कायम राहिली.
हत्तीरोग हा वूचरेरिया बॅंक्रोफ्टी ह्या जीवांमुळे होतो. ह्याचा प्रसारही डासांमार्फत होतो. ह्याचे जंतू तसे मोठे असतात. पण त्याच्या अळ्या डास चावतात तेव्हा रक्तात येतात. तेथून त्या लिंफवाहिन्यांमध्ये जातात व तेथे वाढत जाऊन मोठे जंत होतात. हे जंत पुन्हा अळ्या तयार करतात ज्या रक्तात येतात. अश्या रोग्याला डास चावल्यास त्या पुन्हा डासामध्ये जातात आणि चक्र पूर्ण होते.
ह्यामुळे लिंफचा प्रवाह अडवला जातो आणि हात किंवा पाय सुजायला लागतो. लगेच निदान झाल्यास पूर्ण बरा होतो. मात्र इलाज होईपर्यंत जी सूज असते ती कधीच कमी होत नाही.
निदानासाठी टेस्ट
ह्या अळ्या रात्री 12 वाजता रक्तात येतात. त्यावेळी रक्त घेऊन ते स्लाईडवर घेऊन पाहिल्यास ह्या अळ्या दिसतात.
अँटिबॉडी टेस्ट कोणत्याही वेळी करून अप्रत्यक्षपणे निदान करता येते.
सारांश: ह्या चारही भागांवरून हे लक्षात येईल की अनेक प्रकारच्या जंतूंमुळे ताप येतो. योग्य निदान झाल्यास रोगी पूर्ण बरा होतो. ह्यासाठी लॅबोरेटरी टेस्टस खूप महत्वाच्या आहेत.
– डॉ. मंजिरी मणेरीकर
Related