थायरॉईड टेस्ट
रश्मी आधी सडपातळ होती पण चाळीशीनंतर तिचं वजन वाढायला लागलं. भूक कमी लागायची, जेवणही कमी जायचं पण वजन वाढत होतं. झोप जास्त यायची. अंग थंड लागायचं. आवाज थोडासा घोगरा झाला. डॉक्टरांनी थायरॉईडची टेस्ट म्हणजे T3, T4, TSH ची टेस्ट करायला सांगितली. तिचं T3, T4 कमी तर TSH जास्त होते. तिला थायरॉईड हॉर्मोन्सची कमतरता होती. तिला गोळ्या सुरू केल्या. काही काळाने वजन नॉर्मल झालं.
रीनाला मात्र उलटाच प्रॉब्लेम होता. भूक खूप लागायची. जेवण जास्त जायचं पण वजन कमी होत होतं. अंग गरम लागायचं. छातीत धडधड व्हायची. गळ्याजवळ एक सूज आली होती. तिची थायरॉईड टेस्ट केली. त्यात T3, T4 जास्त तर TSH कमी होते. तिला हायपर थायरॉईडीझम होते. मात्र तिच्या आणखी टेस्ट कराव्या लागल्या. अल्ट्रासाऊंड आणि FNAC केल्यावर तिला थायरॉईडचा ट्युमर असल्याचं दिसून आलं. तिचं ऑपरेशन करून थायरॉईड काढावी लागली. नंतर कायम तिला थायरॉईड हॉर्मोनच्या गोळ्या घ्याव्या लागतात.
थायरॉईड ही एक आंतरस्त्रावी ग्रंथी आहे. म्हणजेच तिच्यात तयार होणारा स्त्राव हा रक्तात मिसळतो. ही ग्रंथी गळ्याच्या पुढच्या भागात असते. ही फुलपाखराच्या आकाराची असते. थायरोक्सिन (T4) आणि ट्राय आयोडो थायरोनिन (T3) ही दोन हार्मोन्स ती तयार करते. मेंदूत असलेल्या पियुषीका ग्रंथात तयार होणारे TSH हे हॉर्मोन तिच्या कार्यावर नियंत्रण ठेवते. जेव्हा T3 T4 ची लेवल कमी होते तेव्हा TSH वाढते आणि जर त्यांची लेव्हल वाढली तर TSH कमी होते.
थायरॉईड हार्मोन्समध्ये आयोडीन मोठ्या प्रमाणावर असते. आहारात आयोडीन कमी झालं तर थायरॉईड हार्मोन्स कमी तयार होतात. पण आजकाल मीठ आयोडाईज्ड असल्याने असं होण्याची शक्यता कमी होते.
थायरॉईड हार्मोन्स शरीराचा मेटाबॉलिक रेट वाढवतात. त्यामुळे खाल्लेलं अन्न नीट पचतं आणि त्याचा ऊर्जा मिळवण्यासाठी उपयोगही केला जातो. आयुष्याच्या स्ट्रेस असणाऱ्या काळात ह्या हॉर्मोन्सची गरज वाढते. वाढीचे वय, स्त्रियांमध्ये मासिक पाळी, गरोदरपणात ह्या हॉर्मोनची गरज वाढते. त्यामुळे ह्या काळात ह्याच्या लेव्हल कमी जास्त होऊ शकतात.
थायरॉईड हॉर्मोन वाढण्याचे कारण बरेचदा ट्युमर हे असते.
हायपो (कमी) आणि हायपर (जास्त) दोन्हीमध्ये थायरॉईड ग्रंथी वाढते. वाढलेल्या थायरॉईडला गॉयटर म्हणतात. थायरॉईड हॉर्मोनची लेव्हल कमी असेल तर नुसत्या गोळ्या घेऊन पुरतात. कधी कधी आयोडीन देऊनही फायदा होतो.
मात्र लेव्हल वाढलेली असते तेव्हा बरेचदा ट्युमर किंवा ऑटो इम्युनिटी हे कारण असते. ऑटो इम्युनिटी असेल तर रेडिओ थेरपीने बरे होऊ शकते. मात्र ट्युमर असेल तर थायरॉईड काढून टाकावी लागते. अश्या पेशन्टला कायम थायरॉईड हार्मोन्सच्या गोळ्या घ्याव्या लागतात.
काही मुलांना जन्मतःच थायरॉईड हॉर्मोन कमी असतात. ह्याला क्रेटिनिझम म्हणतात. अशा मुलांची बौद्धिक आणि शारीरिक वाढ दोन्ही कमी होते. जर नवजात बाळामध्ये लगेच ह्याचे निदान झाले तर त्याला थायरॉईड हॉर्मोन देऊन त्याची नॉर्मल वाढ होते. अश्या बाळात दूध नीट ओढता न येणे, कॉन्स्टिपेशन, घोगऱ्या आवाजात रडणे, खूप झोपळू असणे, नीट वाढ न होणे अशी लक्षणे दिसतात. मात्र लक्ष न दिल्यास पोट पुढे येते, त्वचा कोरडी होते, दात यायला उशीर होतो, उंची वाढत नाही. बौद्धिक वाढ सुद्धा होत नाही. त्याचे निदान लवकर होणे हेच उपयुक्त आहे. इतकी साधी टेस्ट पण ती करायला हवी हे समजणं गरजेचं आहे.
थायरॉईडचे कार्य नीट नाही अशी शंका आल्यास T3, T4, TSH ही टेस्ट सर्वप्रथम करतात.
थायरॉईड टेस्ट स्ट्रेसच्या काळात म्हणजे पाळी चालू असताना वगैरे केली तर फक्त TSH वाढलेले बाकीची हॉर्मोन नॉर्मल असा रिपोर्ट येऊ शकतो. अश्या वेळी 15 दिवसांनी पुन्हा टेस्ट करतात.
जर थायरॉईड वाढलेली असेल तर अल्ट्रासाऊंड, थायरॉईड स्कॅन अश्या टेस्ट करतात. फाईन निडल ऍस्पिरेशन सायटोलॉजी(FNAC) ही पॅथॉलॉजीची टेस्ट आहे. ह्यात एक सुई घालून त्यातले थोडे मटेरियल काढून घेतात. मायक्रोस्कोप मध्ये बघून ट्युमर आहे की नाही हे समजते. ट्युमर असल्यास सर्जरी हाच उपाय असतो.
थायरॉईडचा कॅन्सरही होऊ शकतो.
थायरॉईडची समस्या वयस्कर स्त्रीला असेल तर बरेचदा साधंच निदान असतं. अगदी ट्युमर असला तरी साधा असतो. मात्र तरुण पुरुषांत थायरॉईड असेल तर कॅन्सर निघण्याची शक्यता खूप जास्त असते.
– डॉ.मंजिरी मणेरीकर

Leave a Reply