लहान मुलांमधील डायबेटिस
छोटा राजू फार जास्त बाहेर न खेळणाराच! म्हणजे जरा खेळला की दमून जायचा. तहान सारखी लागायची आणि वारंवार शू सुद्धा व्हायची. जेवला तरी लगेच पुन्हा भूक लागायची आणि खायचाही.पण, वजन वाढत नव्हते. एक दिवस त्याला धाप लागली आणि विचित्र बरळायला लागला म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. त्याला ICU मध्ये ऍडमिट करून डॉक्टरांनी त्याची रक्तातली साखर तपासली तर ती 400 च्या वर होती. त्याला शिरेतून इन्शुलिन दिलं तेव्हा तो नॉर्मल झाला. त्याला टाईप 1 डायबेटिस आहे असं डॉक्टर म्हणाले. त्याला कायम इन्सुलिन घ्यावं लागतं.
चाळिशीनंतर होणारा डायबेटिस किंवा मधुमेह सर्वांनाच माहीत आहे. त्याला टाईप 2 डायबेटिस असे म्हणतात. मात्र काही मुलांना जन्मतःच डायबेटिस असतो. त्याला ज्यूवेनाईल डायबेटिस किंवा टाईप 1 डायबेटिस म्हणतात. ह्याचे मुख्य कारण म्हणजे इन्सुलिन तयारच होत नाही.
इन्शुलिन हे हॉर्मोन आपल्या स्वादुपिंडात तयार होते. त्यातील बीटा सेल्स हे हॉर्मोन तयार करतात. खाल्लेल्या अन्नातील कार्बोहायड्रेटचे पचन करून ग्लुकोजमध्ये रूपांतर, ते ग्लुकोज रक्तात शोषले जाणे, ते पेशींना पुरवणे, जास्त असलेले ग्लुकोज लिव्हरमध्ये साठवून ठेवणे आणि रक्तातील साखर कमी झाल्यास पुन्हा त्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करून रक्तात पाठवणे ही सर्व कामे इन्सुलिन करते.
मोठ्या वयात होणाऱ्या डायबेटिसचे कारण बीटा सेल्स नष्ट होणे हे असते तर लहान मुलांमध्ये ह्याचे कारण बीटा सेल्स जन्मतःच नष्ट झालेल्या असणे हे असते.
ह्यासाठी ज्या टेस्ट करतात त्या म्हणजे उपाशीपोटी आणि जेवणानंतर 2 तासांनी ब्लड शुगर टेस्ट.
मात्र लहान मुलांमध्ये ह्याची शंका येण्यासाठी काही लक्षणे दिसतात. खूप जास्त तहान, पाणी पिणे आणि लघवीला वारंवार जाणे, जास्त भूक, खाणे, तरीही वजन न वाढणे, पोट बिघडणे, उलट्या होणे, अतीव थकवा, काही लक्षणे अगदी इमर्जन्सी दाखवतात. गोंधळून जाणे, श्वासाला फळासारखा वास येणे, श्वासोच्छ्वास वेगाने होणे, पोटात दुखणे, कधीकधी बेशुद्ध होणे.
यासाठी मुख्य टेस्ट ब्लड शुगर हीच असली तरी आणखीही काही टेस्ट केल्या जातात.
युरिन शुगर: रक्तातील साखर जेव्हा खूप वाढते तेव्हा युरिन मधूनही साखर जाते.
रक्तातील इन्सुलिनची पातळी: टाईप 1 डायबेटिसमध्ये इन्सुलिनची पातळी कमी असते तर टाईप 2 मध्ये बरेचदा इन्सुलिन नॉर्मल किंवा जास्तच असते.
एकदा निदान झाले की मुलाची रक्तातील साखर 80 ते 100 च्या दरम्यान ठेवावी लागते.
त्यासाठी इन्शुलिनचा डोस बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी दर महिन्याला फास्टिंग आणि जेवणानंतरची शुगर करावी लागते. घरच्या घरी ग्लुकोमिटरनेही हे करता येते.
HbA1C: ह्या टेस्ट मुळे 4 महिन्यांत सरासरी किती शुगर लेव्हल होती ते समजते.
टाईप 1 डायबेटिस असलेल्या लोकांना मोठा धोका म्हणजे इन्शुलिनच्या अभावामुळे किटो ऍसिडोसिस होणे. ह्यामध्ये फॅटचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो आणि ऍसिटोन, ऍसिटो ऍसिटीक ऍसिड तयार होतात. ह्याचा मेंदूवर परिणाम होऊन पेशन्ट बेशुद्ध सुद्धा होऊ शकतो.
अशी वेळ आल्यास रक्तातील किटोनची पातळी आणि युरिन किटोन ह्या टेस्ट कराव्या लागतात. जर निदान होऊन इन्सुलिन चालू असेल तर इन्सुलिन घेऊन त्यानंतर काहीच न खाल्यानेही बेशुद्धी होऊ शकते. म्हणून अश्यावेळी आधी रक्तातील साखर तपासून साखर कमी असल्यास तोंडावाटे साखर द्यावी लागते. मात्र साखर जास्त असल्यास हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून शिरेतून इन्सुलिन द्यावे लागते. साखरेची पातळी घरीच ग्लुकोमिटरने तपासल्यास हॉस्पिटलमध्ये न्यावे की साखर द्यावी हे लगेच समजू शकते. अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे करावे.
ब्लड शुगर बराच काळ जास्त असल्याने काही अवयवांवर परिणाम होतो.
किडनी: युरिनमधून साखर, प्रोटीन जाणे.
ह्यासाठी 24 तासांत युरिन प्रोटीन, युरिन प्रोटीन क्रिऍटीनिन रेशो ह्या टेस्ट करतात.
डोळे: डोळ्यांमधील पडदा किंवा रेटिना ह्याला इजा होऊन अंधत्व येऊ शकते. ह्यासाठी रेटायनोस्कोपी करावी लागते.
हात आणि पायांची संवेदना जाणे: काही इजा झाल्यास दुखत नाही त्यामुळे जखमा होत राहतात. त्यात बॅक्टरीया वाढून ऍबसेस होतो, गॅंगरीन होऊन पायही कापावा लागू शकतो.
ह्यासाठी हाता पायांची खूप काळजी घ्यावी लागते.
आजकाल बैठी जीवनशैली, टीव्ही, मोबाईलवरच खेळ खेळणे, व्यायामाचा अभाव, जंक फूड ह्यामुळे लहान मुलांनाही टाईप 2 डायबेटिस होऊ लागला आहे. अगदी 8 वर्षांच्या मुलालाही हा झाल्याचे रिपोर्ट आहेत. ह्यात सुद्धा ह्याच टेस्ट कराव्या लागतात. मात्र असे मूल स्थूल असते.
टाईप 1 डायबेटिस टाळणे शक्य नाही मात्र एकदा निदान झाल्यावर ब्लड शुगर आणि HbA1C टेस्ट करून तो नियंत्रणात ठेवला पाहिजे. तसेच त्यातील धोकादायक गुंतागुंत टाळण्यासाठी योग्य आहार, व्यायाम ह्या गोष्टी आवश्यक आहेत. एकदा डायबेटिस झाल्यावर तो आपण नियंत्रणातच ठेवू शकतो. म्हणून जीवनशैली बदलणे हाच उपाय आहे.
– डॉ.मंजिरी मणेरीकर

Leave a Reply