अहमदाबादमध्ये फक्त डायबेटिसच्या रोग्यांसाठी एक हॉस्पिटल आहे. मी तिथं काही काळ काम केलंय. तिथं मी गरोदरपणात होणाऱ्या डायबेटिसच्या बऱ्याच केसेस पाहिल्या. म्हणजे प्रेग्नन्सी सुरू होण्याआधी डायबेटिस नसतो पण काही महिन्यांनी होतो आणि डिलिव्हरी झाली की बरा होतो. पण असं असलं तरी त्याचे बाळावर आणि त्या स्त्रीवर पण बरेच परिणाम होतात. म्हणूनच तो टाळणं आवश्यक आहे.
आता सर्वांना डायबेटिस बाबत बरीच माहिती असते. रक्तातील साखरेची पातळी वाढणे ही त्याचे निदान करण्याची पहिली टेस्ट आहे. मात्र गरोदरपणी डायबेटिस होतो तेव्हा आधी त्या स्त्रीला डायबेटिस नसतो. पण काही रिस्क फॅक्टर असतील तर गरोदरपणात डायबेटिस होण्याची शक्यता जास्त असते.
1 गरोदर होण्याआधी वजन जास्त असणे.
2 रक्तातील साखर 100 पेक्षा जास्त असणे.
3 कुटुंबातील व्यक्तीला डायबेटिस असणे.
4 आधीच्या गरोदरपणात डायबेटिस झालेला असणे.
5 PCOD (polycystic ovarian disease)
6 ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल जास्त असणे.
7 आधी अबोर्शन झालेले असणे किंवा मूल मृत जन्माला आलेले असणे.
हे रिस्क फॅक्टर असतील तर गरोदरपणात डायबेटिस होण्याची शक्यता वाढते.
निदान:
पूर्वी साधारण सातव्या महिन्यात बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये नाव घातलं जायचं. पण आता अगदी पाळी चुकल्यापासून स्त्री रोग तज्ज्ञांना नियमितपणे दाखवलं जातं. अश्या स्त्रियांची लगेच ब्लड शुगर केली जाते. ती 100 च्या वर असेल तर आणखी काही टेस्टस कराव्या लागतात.

गरोदरपणातील डायबेटिस साधारण पाचव्या महिन्यानंतर होतो. खूप तहान लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे, खूप भूक लागणे अशी लक्षणे असतील तर डायबेटिसची शंका येते.
ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट: ह्यासाठी आधी उपाशीपोटी रक्त घेतले जाते. मग 50 ते 75 ग्रॅम ग्लुकोज पाण्यातून पिऊन त्यानंतर दर अर्ध्या तासाने अशी 4 सॅम्पल्स घेतली जातात.
उपाशीपोटी शुगर 95 च्या वर, कोणत्याही सॅम्पलमध्ये शुगर 180 च्या वर असली किंवा 2 तासानंतरच्या सॅम्पलमध्ये 140 च्या वर असेल तर डायबेटिसचे निदान होते.
त्यानंतर दर महिन्याला ब्लड शुगर, युरिन शुगर, युरिन किटोन ह्या टेस्टस करत राहून डायबेटिस नियंत्रणात ठेवावा लागतो.
गरोदरपणात होणाऱ्या डायबेटिसचे कारण
गरोदरपणात प्लासेंटा (वार)मधून काही हॉर्मोन्स तयार होतात ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. साधारणपणे इन्शुलिनचे प्रमाण नॉर्मल असेल तर ही वाढ जास्त होत नाही. मात्र काही जणींमध्ये इन्शुलिन तेवढे तयार होत नाही आणि मग रक्तातील साखर वाढते. एक प्रकारे हा पुढील काळासाठी धोक्याचा इशाराच आहे.
गरोदरपणातील डायबेटिसचा बाळावर होणारा परिणाम
1 बाळामध्ये जन्मजात व्यंग असू शकते.
2 खूप जास्त वजनाचे मूल होते त्यामुळे प्रसूतीमध्ये अडचणी येतात. सिझेरियनची शक्यता वाढते.
3 वेळेपूर्वी प्रसूती होणे
4 अबोर्शन किंवा मृत मूल जन्मणे
5 बाळाची ब्लड शुगर कमी असणे
गरोदरपणात होणाऱ्या डायबेटिसचे आईवरील परिणाम
1 ब्लड प्रेशर वाढणे व त्यामुळे होणारी गुंतागुंत
2 प्रसूतीनंतर डायबेटिस तसाच राहणे किंवा कमी वयात डायबेटिस होणे.
डायबेटिस झाल्यावर आणि तो टाळण्यासाठी उपाय
ब्लड शुगर खूप जात असेल तर गोळ्या किंवा इन्शुलिन घ्यावे लागते. पण 100 ते 140 असेल तर आहारात बदल करूनही ती नियंत्रणात येते.
डायबेटिस हा चयापचय क्रियेचा रोग आहे. ह्यावर उपाय म्हणजे आपला आहार विहार म्हणजेच जीवनशैली सुधारणे.
1 आहारात कार्बोहायड्रेट, फॅट प्रोटीन ह्यांचे प्रमाण योग्य ठेवणे
2 तंतुमय पदार्थ म्हणजे फळे, भाज्या हे आहारात घेणे
3 तळलेले पदार्थ, मैदा, साखर असलेले पदार्थ कमीत कमी खाणे
4 नियमित व्यायाम करणे
गरोदरपण हा नॉर्मल काळ असतो. ह्या काळात रोजची सर्व कामे तर करावीच पण नियमित व्यायाम करणेही आवश्यक असते. चालणे, योग, स्नायू मजबूत करणारे व्यायाम ह्या सर्वामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासही मदत होते.
काही वेळा ब्लड प्रेशर जास्त असेल किंवा वार खाली असेल तर बेड रेस्ट सांगितली जाते पण काही मुली घरकाम टाळण्यासाठी स्त्री रोग तज्ज्ञांना ‘मला बेड रेस्ट लिहून द्या’ असे सांगतात. त्यांना वाटते आपण सासूला फसवतोय. पण त्या स्वतःलाच फसवत असतात. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य झोप ह्या गोष्टींमुळे आपणही निरोगी राहू आणि बाळाचीही योग्य वाढ होईल.
– डॉ मंजिरी मणेरीकर
Related