ताप येण्याची वेगवेगळी कारणे आणि त्याचे निदान
रक्त तपासणीः केव्हा? कशासाठी?
मला आठवतंय लहानपणी बरेचदा ताप आला की मी आमच्या शेजारीच राहणाऱ्या डॉक्टरांच्या घरी जायचे. ते स्टेथास्कोपने छाती तपासायचे आणि वेगवेगळ्या रंगांच्या गोळ्या आणि पातळ औषध बाटलीतून द्यायचे. त्याचे 3/4 डोस घेतले की बरं वाटायचं आणि मग पुन्हा दाखवायला जायची गरजही पडायची नाही. मी 11वीत असताना नाशिकला जाऊन आले आणि मला थंडी भरून ताप आला. डॉक्टरांनी विचारले बाहेरगावी गेली होतीस का? तिथे डास होते का? हो म्हटल्यावर तुला मलेरिया झालाय सांगून गोळ्या दिल्या. कुठलीही टेस्ट केली नाही.
मात्र आता मी स्वतःच टेस्टस् करणारी डॉक्टर झाले आहे आणि बघते की कोणीही पेशन्ट आला की आधी अनेक पॅथॉलॉजीच्या टेस्टस करायला सांगितल्या जातात. असं का? ह्यासाठी ताप येण्याची वेगवेगळी कारणं आधी समजून घायल्या हवीत. ताप येणं म्हणजे शरीराचं तापमान वाढणं. माणसाचं तापमान 37 डिग्री सेल्सिअस किंवा 98.4 फॅरेनहाईट इतकं असतं. त्यामुळे आपल्याला रोग निर्माण करणारे जंतू सुद्धा ह्या तापमानाला चांगले वाढतात. म्हणून जेव्हा कोणताही जंतू शरीरात प्रवेश करतो तेव्हा शरीराचा थर्मोस्टॅट जास्त तापमानाला सेट केला जातो. त्यामुळे ताप येतो. म्हणजेच ताप येणे हे शरीर जंतुंशी सामना करत असल्याचे लक्षण आहे. जेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते तेव्हा केवळ एव्हढ्यानेच जंतूंचा हल्ला परतवून लावला जातो. म्हणजेच नुसती विश्रांती घेऊन ताप जातो.
जंतूंपैकी बॅक्टरीयावर अँटिबायोटिक औषधं उपयोगी पडतात. पण व्हायरस, फंगस, जंत इ. साठी वेगळी औषधं असतात. शिवाय वेगवेगळ्या बॅक्टरीयासाठी वेगवेगळी अँटिबायोटिक असतात. जर निदान न करता अँटिबायोटिक दिले तर एक तर त्याचा उपयोग होणार नाही किंवा दुसरे म्हणजे ते जंतू त्या अँटिबायोटिकला रेझिस्टंट होतात म्हणजे नंतर त्यामुळे रोग झाल्यास त्या अँटिबायोटिकचा उपयोग होत नाही.
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक अँटिबायोटिकचा ठराविक कोर्स असतो. साधारण 5 दिवसांचा कोर्स असतो. तो पूर्ण न केल्यास सुद्धा बॅक्टरीया रेझिस्टंट होतात. ह्याचे कारण पुढीलप्रमाणे बॅक्टरीया जेव्हा वेगाने वाढत असतात तेव्हाच औषध त्यांना नष्ट करू शकते पण जे बॅक्टरीया कमी वेगाने वाढतात ते तसेच राहतात. त्यांची वाढ नंतर सुरू होते. तेव्हा जर औषध नसेल तर ते पुन्हा वाढून पुन्हा रोग होतो. उदा. पूर्वी टायफॉईड उलटायचा. काही जंतू उदा. टी बीचे जंतू खूप कमी वेगाने वाढतात. अश्या रोग्यांना कमीत कमी 6 महिने औषध घ्यावे लागते.
ह्यावरून हे लक्षात येईल की योग्य निदान गरजेचे आहे. त्यासाठी आजकाल औषध देण्याआधी बऱ्याच टेस्ट करतात.
– डॉ. मंजिरी मणेरीकर

Leave a Reply