आजच्या पिढीतल्या किती लोकांना, शाळकरी मुलांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा इतिहास माहिती आहे का? खरंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पण मराठवाड्यातले लोक त्यावेळीही पारतंत्र्यात होते. १७ सप्टेंबर १९४८ म्हणजेच स्वातंत्र्याच्या १३ महिन्यानंतर मराठवाड्यात राहणाऱ्या लोकांनी मोकळा श्वास घेतला. जुलमी निझाम आणि रझाकरांच्या तावडीतून सुटून तेही अखंड भारताचा भाग झाले. मराठवाडा स्वातंत्र्यलढ्यातली महत्त्वाची नावं म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, कॅप्टन जोशी, आ.कृ.वाघमारे, केशवराव कोरटकर, वामनराव नाईक आणि यांच्यासारखेच मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात लढलेले आणखीही स्वातंत्र्य सैनिकही आहेत.

क्रांतीवीर दत्तोबा भोसले हे नाव घेतल्याशिवाय मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. दत्तोबा भोसले यांचा जन्म औसा तालुक्यातील मातोळा या गावी १९ नोव्हेंबर १९१८ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण मातोळा गावी ऊर्दू माध्यमातून झाले. दत्तोबा भोसले म्हणजे लोहाऱ्याजवळच्या हिप्परगा गावातील स्वामी रामानंद तिर्थ मुख्याध्यापक असलेल्या राष्ट्रीय शाळेचे विद्यार्थी. नंतर त्यांनी हरीभाई देवकरण हायस्कुल, सोलापूर येथून मॅट्रीकचे शिक्षण पूर्ण केले. पुढे ते ज्ञानर्जनासाठी सयाजीराव गायवाडांच्या आश्रयाला बडोद्याला गेले. तिथे सयाजीरावांनी स्थापन केलेल्या प्रो राजरत्न माणिकराव यांच्या आखाड्यात कुस्तीचे कित्ते गिरवले व ते त्यांचे पट्टशिष्य झाले. स्वतः महाराजांसोबत कुस्ती खेळण्याची संधी दत्तोबा भोसले यांना मिळाली. त्यांनी संपूर्ण देशभर कुस्तीत वेल्टरवेट व फेदरवेट गटात चॅम्पियनशिप मिळवली. त्याकाळचे प्रसिद्ध जागतिक मल्ल गामा, गुंगा व इमामबक्ष यांच्या बरोबरच्या कुस्त्या गाजल्या.
दत्तोबा भोसले हे त्या काळातील उच्चशिक्षित तरुण. त्यांनी बडोद्याच्या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. महाराज सयाजीराव गायकवाड, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सहकार्याने शिक्षण, क्रांतीचे धडे घेतले. दत्तोबा भोसले यांच्या जेल डायरीवर एक नजर टाकली की त्यांचे व्यक्तिमत्व किती मोठे होते हे लक्षात येते. त्यातून असं लक्षात येत की, त्याही वेळी ते समानतेचा, मुलींच्या हक्कांचा, आणि शिक्षणाचा पुरस्कार करत असत. सर्वधर्मियांना समानतेने वागवत असत. त्यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक विधायक कामे केली. मराठवाड्यातील बालविवाह बंद पाडण्यात देखील दत्तोबा भोसले यांचा मोलाचा वाटा होता. दत्तोबा हे कुस्ती पटू देखील होते. १९४२ ते ४६ दरम्यान त्यांनी राष्ट्रीय किताबही जिंकले. त्यावेळचे गव्हर्नर लिनलिथगो यांच्या हस्ते दत्तोबा भोसले यांचा गौरव करण्यात आला होता. दत्तोबा भोसले यांचा मातोळा येथून सुरू झालेला प्रवास बडोदा येथे येऊन पोहोचला. आणि बडोद्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने स्वतःला घडवलं. बडोद्यामध्ये राजारामबापू पाटील यांच्याशी त्यांची मैत्री झाली. आणि मग राजारामबापू पाटलांनी दत्तोबा भोसले यांना क्रांतिसिंह नाना पाटील यांची ओळख करून दिली. महान विचारांचं बाळकडू घेऊन दत्तोबा भोसले बडोद्याहून जेव्हा मराठवाड्यात पोहोचले तेव्हा सुरू झाला मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा. आणि उच्चशिक्षित दत्तोबा ठरले निजामाचा कर्दनकाळ. रझाकरांचा नायनाट करण्यासाठी लढणारा दत्तू भोसले आपल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन कधी गनिमी काव्याने तर कधी उघडपणे त्यांनी रझाकरांशी दोन हात केले. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता ते रझाकारांशी लढत राहिले. वाऱ्याच्या वेगाने, विलक्षण चपळाईने तर कधी बेमालूम वेषांतर करून दत्तोबा यांनी रझाकारांना सळो की पळो करून सोडलं. सेलू येथील सरकारी खजिन्याची लूट असो किंवा देवताळा येथील १५० रझाकारांचे केलेले शीरकांड असो किंवा नाईचाकूर पोलीस ठाण्यावर केलेला हल्ला या प्रत्येक घटनेमागे दत्तोबा भोसले यांचा हात होता. १९४८ ला उस्मानाबादचे कलेक्टर असणाऱ्या महंमद हैदर यांनी लिहिलेल्या ऑक्टोबर कुपमध्ये दत्तोबा भोसले यांच्या कार्याबद्दल उल्लेख आहे. यात त्यांनी दत्तोबा भोसले यांना ‘मातोळा डेव्हिल ऑन हॉर्स बॅक’ अशी उपाधी दिली आहे.
निझाम आणि रझाकारांच्या मनात मराठवाडा सोडेपर्यंत दत्तोबा भोसले यांची दहशत हो

ती. दत्तोबा भोसले यांच्या सारख्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या अविरत प्रयत्नांमुळे मराठवाड्यात राहणारे आपण मोकळा श्वास घेत आहोत. १७ सप्टेंबर १९४८ ला मराठवाडा स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दत्तोबा भोसले यांनी सामाजिक सुधारणांसाठी अनेक विधायक कामे केली. स्त्री पुरुष समानता, सर्वधर्मीयांच्या समानतेसाठी कामे केली. स्त्रियांचे शिक्षण, विज्ञानवादी दृष्टिकोन समोर ठेवून कामे केली. कर्मकांडाला विरोध केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दत्तोबा भोसले यांनी स्वतः केलेल्या कामांचं, लढायांचं कुठेही स्तोम माजवल नाही. यातच क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचं वेगळेपण होते.
उस्मानाबादच्या तेरणेच्या खोऱ्यात तडोळा, काजळा, सारोळा, उपळा, वाघोली, कनगरा, आशिव, मातोळा, सास्तूर, ढोकी,आळणी, या भागातल्या शेकडो गावांना रजाकाराच्या जुलमी अत्याचारापासून क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांनी प्राणाची पर्वा न करता १९४८ साली मुक्त केले. शेकडो गावे निजामापासून मुक्त करून मुक्तापूर स्वराज्य निर्माण करून चिंचोली या गावाला राजधानी घोषीत केली. ह्या लढ्याचा नायक म्हणजे मातोळ्याचे क्रांतिविर दत्तोबा भोसले, ज्यांच्या कथा जात्याच्या पाळूपासून ते चावडीचावडीपर्यत सांगितल्या जातात. ज्यांना पकडण्यासाठी निझामाने लाखोचे बक्षिस ठेवले होते. अनेक सापळे रचले गेले पण ते सापडले नाहीत. वेशांतर करण्यापासून ते पांढऱ्या घोडीवर वाऱ्यासारखे धावणारे, सशस्त्र तरूणांची फौज उभी करणारे दत्तोबा भोसले एक अख्यायिका बनले आहेत.
दत्तोबा भोसले यांचे सामाजिक व राजकीय विचार (जेल डायरीतून)
लोककल्याणाचा एकच राजमार्ग म्हणून दाखविणे इतके हिंदुस्तानचे भावी सौख्य आज एकदेशीय नाही. एकीकडे राजकीय सामाजिक सुधारणा आहेत. धर्म उद्योग शिक्षण आहे. स्त्रियांचा प्रश्न आहे. तसेच अस्पृश्यांचा ही प्रश्न आहे व जातिभेदाचाही गोंधळ आहे. अशा या चमत्कारिक परिस्थितीत अमुक एकच

मार्ग इतरांपेक्षा चांगला आहे, असे सांगणे मोठे धाडसाचे आहे. परिस्थितीच्या अनुभवाप्रमाणे या विषयावर ज्याचे त्याचे विचार अगदी निराळे झाले आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रकृती तितकी मतं, आणि मतं तितकी मार्ग असा प्रकार होऊन आज जबाबदार आणि बेजबाबदार अशा सर्वच लोकांना बारा वाटा मोकळ्या होऊन बसल्या आहेत. आपल्याहून भिन्न रीतीने लोकहिताचा प्रयत्न कोणी करीत असेल तर त्याच्याबद्दल सहानुभूती न दाखविणे, देशहिताच्या विचाराताच स्पर्धा वाढवून एकमेकांना खाली पाडणे, दुसऱ्याच्या प्रयत्नांबद्दल अनादर दाखविणे या कारणांमुळे आज देशाची इतकी अवनती होत आहे. तितकी दुसऱ्या कुठल्याही कारणामुळे होत नसेल.
दत्तोबा भोसले यांचे पुत्र विवेक दत्तोबा भोसले म्हणतात, मराठवाडा मुक्तीसंग्रामावर जे निरनिराळी पुस्तके व इतिहासपर सामग्री लिहिली गेली ती वाचल्यावर मन खिन्न झाले. दत्तोबा भोसले यांना यथोचित न्याय मिळाला नाही ही भावना झाली. जिथे मातोळा हे दत्तू भोसलेचे मातोळा म्हणून ओळखले जाते, जिथे त्यांच्यावर गावोगावी पोवाडे गायले जातात, त्यांच्या बहादुरीचे, कुस्तीतले, रझाकराला यमसदनी पाठविलेले किस्से अभिमानाने सांगितले जातात. त्या बहाद्दर क्रांतीविराचे मूल्यमापन व उचित गौरव झाला नसल्याचे स्पष्ट जाणवले. दत्तोबा भोसले यांनी लक्ष फक्त मुलांवर शिक्षणावर व समाजकारणावरच केंद्रित केले होते. त्यांनी सन्मानपत्र सोडले तर कधी पेन्शनसाठी अर्ज केला नाही किंवा आपली महत्ता गायली नाही. आमच्या वडिलांची महती कर्तबगारी व बहादुरी ही मुख्यत्वे करून दुसऱ्या लोकांकडूनच जास्त ऐकली. जिथे जात होतो तिथे संपूर्ण मराठवाड्यात व बडोदा येथेही त्यांच्याविषयी खूप गौरवास्पद व अभिमानास्पद गोष्टी कानावर पडायच्या. ते स्वतःहून क्वचितच ह्या गोष्टी सांगायचे. त्यांचे सर्व लक्ष व शिकवण ही आरोग्य व शिक्षण ह्यावरच असायचे. सर्व भाऊ बहिणींचे शिक्षण घरातच करून थेट चौथी बोर्डालाच परीक्षेला बसवायचे. त्यांचे इंग्रजी अस्खलित असल्यामुळे पाचवीला असतानाच आम्ही सर्वांनी पूर्ण शुद्ध व्याकरणासहित इंग्रजीवर प्रभुत्व मिळविले. सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व क्रांतिवीर नाना पाटील यांचा त्यांच्यावर जबरदस्त पगडा होता. तो त्यांच्या जेल मधून लिहिलेल्या डायरी वरून कळतो.
– गिरीश भगत, ता.लोहारा जि.उस्मानाबाद
Related