आता मार्केटिंग विषमुक्त अन्नाचं
सीमा अग्रवाल. सध्या पुण्यात, पाषाणच्या रहिवासी. शिक्षण मार्केटिंग क्षेत्रातलं. लोकांशी गप्पा मारणं, त्यांच्या समस्या समजून घेणं, लोकांमध्ये राहणं, वेगवेगळ्या ठिकाणी जात राहणं अशा गोष्टींची आवड. त्यामुळे अर्थातच मार्केटिंगचं क्षेत्र त्यांना मानवलं. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी टूथपेस्ट, शाम्पू, साबण, कपडे अशी उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीसोबत त्यांनी १९९९ ते २०१६ अशी जवळजवळ १५ वर्ष काम केलं. पुणे,मुंबई,कॅनडा अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम पाहिलं. २००६ साली भारतात जेव्हा टिशू पेपर वापरणं फारसं माहिती नव्हतं, तेव्हा त्यांनी ग्रीन लाईम या टिशू पेपर बनवणाऱ्या कंपनीचा रिटेल विभाग भारतात सुरू केला. मार्केटिंग क्षेत्रातील नोकरीमुळे त्यांना चांगली उत्पादनं कळू लागली.
२०१६ मध्ये त्यांचे पती सुजित अग्रवाल यांनी पुण्यातील इकॉलोजिकल सोसायटीचा पर्यावरणाविषयीचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या कोर्समुळे त्यांना आताची आर्थिक प्रगती, हवाबंद डब्यातले पदार्थ तसेच सौंदर्य प्रसाधनामार्फत नकळत आपल्या शरीरात जाणारी रसायने, शेती करताना वापरलेली रसायने, पाणी-हवेचं प्रदूषण यामुळे शरीराचं तसंच निसर्गाचे होणारं नुकसान हे सगळंच नव्याने कळलं. मुळात सीमा ज्या क्षेत्रात काम करत होत्या, तिथं मोठ्या प्रमाणात रसायने वापरली जात. आपण करत असलेले काम कुणाचं तरी नुकसान करत आहे ही बाब त्यांना खटकू लागली आणि त्यांनी २०१६ ला नोकरी सोडली. त्याच काळात सीमा यांच्या आरोग्य विषयक काही समस्या चालू होत्या. त्याच संदर्भात पुण्यातील एमडी आयुर्वेद, कर्करोग तज्ञ डॉ. दिलीप गाडगीळ यांच्या व्याख्यानात सहभागी झाल्या. विषमुक्त अन्न, पोषक व नैसर्गिक वातावरण, शारीरिक श्रम या सगळ्यांनंतरचं औषध खाल्लं पाहिजे असा त्यांनी सल्ला दिला. या सगळ्या गोष्टी हव्या असतील तर शेती करणे आणि गावी राहणे हा एकच मार्ग उरतो. परंतु अनेक वर्ष शारीरिक श्रमाची सवय नसल्याने,स्वतःचं शेत नसल्याने शेती करणं सोपं नव्हतं. मात्र त्याच वेळी विषमुक्त अन्न पिकवणारे काही शेतकरी ओळखीचे होऊ लागले. मग अशाच शेतकऱ्याचा शेतमाल लोकांपर्यंत पोहचवून शेतकऱ्याला वाजवी किंमत देणे हा मार्ग सीमा यांनी निवडला.
बाणेर – पाषाण भागात सुरुवातीपासून सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याने सीमा यांची त्या भागातील नागरिकांशी चांगली ओळख होती. स्वतःसाठी विषमुक्त अन्न आणायला जाताना त्यांनी इतर नागरिकांसाठीही असा शेतमाल आणायला सुरुवात केली. शेतकरी कुठला,त्याला मिळणारा भाव किती,शेतमाल कुठल्या भागातून येतो या सगळ्यांची पारदर्शक माहिती दिल्याने लोकांचा विश्वास वाढू लागला. तेव्हापासून ते आजतागायत सीमा यांच्याशी जोडलेल्या शेतकऱ्याला बांधावर विक्री किमतीच्या पन्नास टक्के रक्कम मिळते आहे. भाजी देणारे पंढरपूरचे मोहन डोंगरे, चिकू आणि आंबे देणारे बाबुलाल गांधी,सीताफळ व राजमाचे तोरसकर, रवा, चटण्या मसाले देणारे नगरचे मिलिंद जिवाडे असे अनेक शेतकरी जोडले गेले. शेतकरी जोडले तसे जागरूक ग्राहक देखील जोडले. आपलं मार्केटिंग कौशल्य शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यास वापरूया. त्यातून लोकांचं आणि स्वतःचं आरोग्य सुधारू ही भावना सीमा यांच्या मनात निर्माण झाली. यातूनच ‘मेरा फार्मर’ची सुरुवात झाली.
नोकरी सोडल्यामुळे महिन्याला मिळणारी हुकमी रक्कम बंद झाली होती. पण, कुटुंबात कुणीच उगाच खर्च करणारं नव्हतं. बाकी सगळे खर्च जाऊन फक्त जेवणाचा खर्च उरला तो खर्च देखील शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या कामातूनच भागू लागला. त्यामुळे नोकरी नसतानाही आर्थिक, मानसिक, सामाजिक स्थैर्य कायम राहिलं. शिवाय तब्येतीच्या तक्रारीही कमी झाल्या. नोकरीत अडचणी येतात, स्पर्धा होते. या कामात मात्र स्पर्धा न होता एकमेकांना साह्य करूनच काम पुढे जाऊ लागलं. राजेश घोलप,चंदन गायकवाड,धीरज पिपाडा,भूषण पाटील अशी समविचारी मंडळी त्यांना भेटली त्यामुळे उत्साह वाढला. तसंच एका ठिकाणी शेतमाल देणारा शेतकरी दहा ठिकाणी जाऊ लागला.
विषमुक्त अन्नासाठी काम करणाऱ्या ‘अन्नदाता’ संस्थेत सीमा मुख्य सभासद म्हणून काम करतात. त्याच संस्थेने २०१७ साली भीमथडी येथे विषमुक्त शेतकऱ्यांसाठी एक दालन उभारले होते. महाराष्ट्रातून जवळजवळ २० शेतकरी सहभागी झाले. त्याच सोबत नदीविषयी काम करणारी जीवित नदी संस्था, टेकड्यांवविषयी काम करणारी वसुंधरा स्वच्छता अभियान, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुलांना जागरूक करण्याचे उपक्रम अशा कामासोबत सीमा जोडल्या गेल्या. वेळ मिळेल तसा आणि गरज असेल तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. त्याच काळात त्यांनी भूजल, नैसर्गिक उपचार, नैसर्गिक शेती, विषमुक्त अन्न या संदर्भातील कोर्स केले. कामासाठी लागणारा सगळा खर्च त्यांनी स्वतःच्या बचतीतून केला. आजपर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारचं फंडींग घेतलं नाही. आज मेरा फार्मरमुळे १००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा शेतमाल व १००० पेक्षा जास्त नागरिकांना विषमुक्त अन्न मिळत आहे. कोविडकाळात देखील त्यांचा गट न थांबता अविरतपणे काम करत होता. सीमा यांच्या स्वतःच्या आरोग्यात सुधारणा झालीच. शिवाय सकस,पौष्टिक,चवदार अन्नामुळे इतर नागरिकांचं आरोग्य सुधारण्यास मदत झाली.
“शेती क्षेत्रात जास्तीत जास्त कामे महिला करतात. घराचे आरोग्य, इतरांची काळजी असण्याची समज महिलांना जन्मतः असते. त्यामुळे विषमुक्त अन्नासाठी महिलांनी काम करायला सुरुवात करायला हवी. प्रत्येक इमारतीत अशी एक स्त्री जरी तयार झाली तर मोठा बदल घडून येईल. काही प्रमाणात पुण्यात असे बदल दिसून येत आहेत.” असं सीमा सांगतात.
– संतोष बोबडे, पुणे

Leave a Reply