मासिक पाळी म्हणजे काय, याची व्याख्याही नीटपणे पुरुषांना सांगितली जात नाही हे आपल्या शैक्षणिक व सामाजिक रचनेचे अपयश म्हणावे लागेल. हल्ली मुलांना शिकवली जाणारी मासिक पाळीची व्याख्या ‘मुलगी वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात.’ अशी सांगितली जाते. माझ्या दृष्टीने ही व्याख्या अतिशय तोकडी आहे. मुलांना / पुरुषांना हे माहीत असायला हवं की, पुरुषापेक्षा स्त्रीच्या बाह्य शरीरात जसे स्तन व योनी हे बदल आहेत त्याचप्रमाणे अंतर्गत शरीररचनेत गर्भाशय व प्रजनन संस्था यात बदल आहेत. स्त्री जेव्हा बाल्यावस्था संपून पौगंडावस्थेत प्रवेश करते तेव्हा तिच्या बाह्य शरीरासोबतच अंतर्गत अवयवांचीही वाढ होत असते. ही वाढ पूर्ण झाल्यानंतरच कोणतीही मुलगी गर्भधारणा करुन जन्म देण्यास सज्ज होते. पौगंडावस्थेत पोहोचलेल्या स्त्रीच्या गर्भाशयात अंडाशय स्वत:चे संप्रेरक तयार करून बीजनिर्माण प्रक्रिया सुरू करते. परिपक्व बीज १२ ते १४ व्या दिवसापासून बीजांडातून बाहेर पडते. ज्याला ‘ओव्यूलेशन’ म्हटले जाते. या काळात स्त्रीबीज आणि शुक्राणू (पुरुषबीज) यांचा संयोग झाल्यानंतर गर्भधारणा होते. मात्र स्त्रीबीज फलित होण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास स्त्रीबीजासह गर्भाशयाच्या आतील मांसल पडदा (आच्छादन) मासिक पाळीच्या माध्यमातून रक्त व स्नायूच्या गाठींच्या स्वरुपात बाहेर पडते. सामान्यतः २५ ते ३५ दिवसांत सर्वसाधारणपणे महिलांना मासिक पाळी येते. शास्त्रोक्त अभ्यास सांगतो सरासरी ८०-९० मिलीलिटर रक्तस्त्राव पाळीच्या दर दिवशी होतो. काही स्त्रियांना यापेक्षा जास्तही होतो. यावरून विचार करता येतो की, सर्वसाधारणपणे रक्तदान करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातून ३०० मिली रक्त काढले जाते. त्यानंतर तीन महिने तरी रक्तदान केले जात नाही. मात्र प्रत्येक मासिक पाळीच्या दरम्यान एका स्त्री च्या शरीरातून सरासरी ४५० मिली (पेक्षा कमीअधिक) रक्त बाहेर पडते. यामुळेच पाळीच्या काळात स्त्रियांच्या ओटीपोटात, पाठीत दुखते. मासिक पाळीचा शारीरिक त्रास प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, होतो. किमान इतकी माहिती प्रत्येक पुरुषाला असायलाच हवी. पण दुर्दैवाने आजही बहुसंख्य पुरुषांना याबाबतची कल्पना नसते.
मात्र, याच पुरुषांना धार्मिक, मंगल कार्यात विघ्न नको म्हणून मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या माहीत असतात. आणि घरातल्या स्त्रीने त्या खाव्यात याची माहिती हमखास असते. विशेषतः या माहितीचा स्रोत नात्यातीलच कोणीतरी जेष्ठ स्त्रीवल्लभा असते. हे चित्र शहरासह ग्रामीण भागातही बऱ्यापैकी समप्रमाणात पहायला मिळते, असे वैयक्तिक निरिक्षणातून आढळले. शिक्षणामुळे तसेच वेगवेगळ्या चळवळींमुळे समाजात मासिक पाळीबाबत प्रबोधन झाल्याचे कितीही दावे असले होत असले. तरी आजही बहुतांश कुटुंबामध्ये वेगवेगळ्या जाती-धर्मांमध्ये मासिक पाळीसंदर्भातील अंधश्रद्धा कायम आहेत. मासिक पाळीच्या शास्त्रीय मुद्द्यांवर कितीही उहापोह केला जात असला तरीही मासिक पाळीच्या पाच दिवसांना विटाळ मानला जातो. यामध्ये उच्चशिक्षित महिलांनाही काहीच वावगे वाटत नाही, याचे आश्चर्य वाटते. यातूनच मासिक पाळीला विटाळ मानण्याचा न्यूनगंड तयार होतो. यातूनच पती पत्नी दोघेही धार्मिक कार्यक्रम, मंगलकार्य, सणासमारंभ आदींमध्ये मासिक पाळीचा विटाळ नको म्हणून मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठीच्या गोळ्यांचा वापर करतात. मात्र स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने या गोळ्या घातक आहेत. कोणतेही स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अशा गोळ्या घेण्याचा अधिकृत सल्ला देत नाहीत. अशा गोळ्यांमुळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोरॉन असे स्त्रियांच्या शरीरातील दोन हार्मोन्सवर गंभीर परिणाम होतात. या हार्मोन्सवर मासिक पाळीचं चक्र आधारित असते. पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या नेमक्या याच हार्मोन्सच्या चक्रावर परिणाम करतात. शिवाय नैसर्गिकरित्या चालणारे पाळीचे चक्र पुढे मागे झाल्याने स्त्री च्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. शास्त्रीयदृष्ट्या कोणत्याही गोळ्या देण्याआधी पेशंटची हिस्ट्री तपासली जाते. संबंधीत स्त्री ला जर व्हर्टिगो, मायग्रेन, उच्च किंवा कमी रक्तदाबाचा त्रास असेल, आधी कधी स्ट्रोक येऊन गेला असेल, वजन जास्त असेल तर अशा पाळी लांबवणाऱ्या गोळ्यांचा संबंधीत स्त्रीला सर्वाधिक त्रास होऊ शकतो. शिवाय या गोळ्यांच्या अतिरेकामुळे भविष्यातील गर्भधारणेवर विपरीत परिणाम वा वंध्यत्वही येऊ शकते. पण देवधर्म, विटाळ-चांडाळ या संकल्पनेत रमलेला पुरुष या बाबींकडे दुर्लक्ष करून मासिक पाळीच्या नैसर्गिक धर्माकडेसुद्धा दुर्लक्ष करून आपला हेतू साध्य करून घेण्यासाठी लक्ष्मी मानल्या जाणाऱ्या आपल्याच सहचारिणीचा विचार स्वतःप्रमाणे करत नाही. हे चित्र बदलणे आवश्यक आहे. यासाठी फार मोठ्या प्रमाणावर महिलांनी पुरुषांचे व पुरुषांनी महिलांचे शास्त्रीय प्रबोधन करणे आवश्यक आहे.
या बाबतीत केरळ राज्यामध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२ मध्ये ‘कप ऑफ लाईफ’ (Cup of life) नावाच्या प्रकल्पांतर्गत पुरुषांना, स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदनांची जाणीव करून देण्यासाठी एक उपक्रम राबविला गेला. काँग्रेस नेते हिबी एडन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. कप ऑफ लाईफ या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मेन्स्ट्रुअल कप्स वाटणे आणि पाळीचे गैरसमज दूर करणे हा आहे. याच प्रकल्पांतर्गत स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदनेवर मोकळेपणाने चर्चा व्हावी, याकरिता मासिक पाळीच्या वेदना चेतवणाऱ्या यंत्राच्या माध्यमातून
पुरुषांवर प्रयोग करण्यात आला. या यंत्राला दोन तारा आहेत. त्या एका वेळी दोन पुरुषांना लावता येतात. या तारा लावल्यावर यंत्राची कळ सुरू करताच १ ते १० या पातळीवरील पटीत संबंधितास वेदना होण्यास सुरुवात होते. जेव्हा मुलींना हे यंत्र लावले तेव्हा त्यांना कोणत्याही वेदना झाल्या नाहीत. मात्र मुलांना जेव्हा ते यंत्र लावले तेव्हा मुले अक्षरश: गडाबडा लोळलीत. काही मुलांना या वेदना अजिबात सहन झाल्या नाहीत. त्यांनी आरडाओरड करून यंत्र बंद करायला लावले. स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान वर्षानुवर्षं झालेल्या वेदना या यंत्रामुळे समजावून घेण्याची सहनशीलताही पुरुषांमध्ये नाही याचे उदाहरण या प्रसंगातून दिसून येते. खरं तर केरळसारख्या साक्षर राज्यात किमान असा प्रयोग तरी शक्य झाला. पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यात असे प्रयोगही अजून झालेले नाहीत. प्रशासकीय पातळीवर प्रशासनाने, तसेच स्वयंसेवी संस्था व युवा राजकारण्यांनी पुढाकार घेऊन केरळचा हा पॅटर्नही राज्यात राबवायला हरकत नसावी. केरळप्रमाणेच मासिक पाळीच्या वेदना जाणवून देणारे यंत्राचे प्रात्यक्षिके आयोजित केल्यास मुलांमध्ये संवाद सुरू होऊ शकतो. पण त्यासाठीची इच्छाशक्ती कोठून आणायची? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही विभागातील मुलांना मासिक पाळी बाबचत प्रश्न विचारला तर मुले लाजतात. किंवा काहीतरी घाणेरडा प्रश्न विचारला असे चेहऱ्यावर भाव आणून हा प्रश्न म्हणजे चेष्टा समजतात. मासिक पाळी या विषयावर कोणाशी बोलता का? असा जरी प्रश्न विचारलात तरी त्याचे उत्तर मिळत नाही. या वयाच्या मुलांना पाळी या विषयावरील संवाद सुरू करण्यासाठी व पाळीच्या दरम्यानच्या वेदनांची जाणीव करुन देण्यासाठी या यंत्राचा वापर होणे आवश्यक आहे. केरळच्या सँड्रा सनी यांनी #feelthepain हा उपक्रम सुरू केला आहे. तसा उपक्रम महाराष्ट्रातही सुरू होणे आवश्यक आहे.
संवेदनशील प्रथमेश
प्रथमेश कोकणातील एका लहानश्या खेडयात मोठा झालेला माझा मित्र. प्रथमेश आणि मी वेगवेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या समाजात, जातीत वाढलो. त्यामुळे या विषयावर लिहीत असताना मी त्याला त्याचे अनुभव विचारले. अगदी मनमोकळेपणे त्याने त्याचा अनुभव सांगतिला. पण, शेवटी माझे नाव बदलून स्टोरी लिही हे त्याने आवर्जून सांगितले. प्रथमेश सध्या ३० वर्षांचा युवक आहे. तो सांगतो, घरात कितीही सुसंस्कृत वातावरण असले तरी, लहाणपणी आई किंवा काकूला मासिक पाळी आली की आई व काकू परसदाराच्या पडवीत ५ दिवस असायच्या. या काळात त्यांच्या जवळ जाण्यास लेकरांनाही मनाई असे. चुकून कोणी मूल त्यांच्या नकळत त्यांच्याजवळ गेलेच तर त्याचेवर गोमूत्राचा शिडकावा केला जाई. किंवा आंघोळ करुन गाईच्या पाया पडण्याचे विटाळक्षालन करावे लागे. समज आल्यावर याबाबतीत आई, काकू यांना विचारणा केल्यावर ‘कावळ्याचा स्पर्श झाल्यास पाच दिवस घरच्यांना स्पर्श करायचा नसतो. स्वयंपाक करावयाचा नसतो. अशी उत्तरे मिळायची.’ प्रथमेशच्या बालमनाला जरी हे उत्तर पटत असले तरी, या ५ दिवसांत परसातील बावीवर पाणी काढून दिल्यावर धुणी-भांडी केलेले कसे काय चालते? या प्रश्नाचे उत्तर काही केल्या न आई, काकूकडून मिळाले न बाबांकडून. प्रथमेश सातव्या इयत्तेत गेला तेव्हा त्याची मोठी बहीणही त्याच पडवीत ५ दिवस कावळा शिवल्याच्या कारणास्तव बसे. फक्त फरत इतकाच पडला होता की, तिला धुणी-भांडी करावी लागत नसत. शिवाय ५ दिवसांची शिक्षा ४ दिवसांवर आली होती. म्हणजे ५ व्या दिवशी सकाळी उकळलेल्या शिकेकाईच्या पाण्याने अंघोळ झाली की, ती घरात वावरू शकत होती. मात्र त्या दिवशीही तिला देवघरात जाण्यास मज्जाव असे.
प्रथमेशला मासिक पाळीची माहिती माझ्याप्रमाणेच कॉलेज जीवनात मिळाली. प्रथमेश सध्या जिल्ह्याच्या ठिकाणी बँकेत नोकरी करतो. तर त्याची पत्नी प्राध्यापिका आहे. प्रथमेशला मासिक पाळीच्या वेदनांची तीव्रता आणि समज लग्नानंतर नोकरीमुळे दोघेही शहरात रहायला आल्यानंतर आली, असे प्रथमेश सांगतो. मासिक पाळीच्या दरम्यान पत्नीला त्रास व्हायचा तेव्हा ती बेडरुममध्ये एकांतात ढसाढसा रडायची. जेव्हा हा प्रकार प्रथमेशने अनुभवला तेव्हा त्याला स्वतःच्या पुरुष असण्याची लाज वाटली. कसलाही संकोच न बाळगता तेव्हापासून तो केवळ मासिक पाळीच्या काळातच नव्हे तर इतर वेळीही घरकामात मदत करतो. मॉलमधील खरेदीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन आठवणीने खरेदी करतो. पाळीच्या दिवसांत पत्नीच्या पायांना, पाठीला तेल लावून मसाज करून देतो. शिवाय पाळीच्या आधी दोन दिवसांपासून पत्नीची चिडचिड सुरु झाली आहे हेसुध्दा लक्षात घेऊन त्यांची लुटुपुटूची भांडणे होतात. शरीरातील हार्मोन्सची पातळी बदलत असल्याने या काळात स्वभावात चिडचिडपणा येणे स्वाभाविक आहे. हे त्याने मानसिकदृष्ट्या मान्य केले आहे. नाहीतर कोणत्याही वादात माघार घेण्याचा प्रथमेशचा स्वभाव नाही. प्रथमेशच्या लग्नाला नुकतीच २ वर्षे पूर्ण झालीत. त्यावर त्याच्या अनुभवाप्रमाणेच मी त्याला त्याच्या पत्नीचा अनुभव विचारून घेण्यास सांगितले. मात्र स्टोरीसाठी अनुभव देण्यास तिने नकार दिला. शिवाय तिच्याच इच्छेखातर प्रथमेश हे बदललेले नाव स्टोरीमध्ये समाविष्ट केलेय. यावरुन केवळ पुरुषांचाच नव्हे तर महिलांचाही दृष्टिकोन अजूनही संकुचित आहे हे लक्षात येते. केवळ शिक्षणाने प्रगल्भता येत नाही. त्यासाठी योग्य वातावरण समाजात, कुटुंबात असणे आवश्यक आहे. शिवाय माणसाने माणसाशी जोडून राहण्यासाठी आवश्यक असलेला संवेदनशीलपणाही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रथमेशच्या लहाणपणी जी परिस्थिती होती तशी परिस्थिती आता बापट कुटुंबात नाही. याचे श्रेय प्रथमेशला जाते. कारण कुटुंबातील रुढीमध्ये प्रथमेशने बदल घडवला. त्याचा हा संवेदनशीलपणा प्रत्येक पुरुषाकडे असायला हवा असे त्याचे म्हणणे आहे.
आदिवासी समाजातील मासिक पाळीबाबत सामाजिक रुढी..
फक्त राज्यापुरता विचार करावयाचा झाल्यास महाराष्ट्रात अनेक आदिवासी जमाती आहेत, आपण त्यांना अनुसूचित जाती, जमाती मध्ये गणतो. राज्यात भिल्ल, गोंड, महादेव कोळी, पावरा, ठाकूर, वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (मुख्यत: कोकणपट्टा) आणि माडिया, गोंड (गडचिरोली जिल्हा) या केंद्र शासनाने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेल्या अशा तीन जमाती आहेत. गोंड आदिवासी हे पूर्वीच्या गोंडवन प्रदेशातील राजे, म्हणून त्यांना राजगोंड असेही म्हटले जाते. नुकतेच जानेवारी २०२३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील काही गावांचा दौरा केला. या दरम्यान गोंड आदिवासींच्या बाबतीतील पुस्तकांतील संदर्भाव्यतिरिक्त काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवता आल्या. गोंड आदिवासी सामाजिकदृष्ट्या नागरी समाजापेक्षा जास्त पुढारलेले आहेत. मात्र मासिक पाळीबाबत अजूनही त्यांच्यामध्ये म्हणावी अशी जागृती निर्माण झालेली नाही. हे निरीक्षण अधोरेखित करावे लागेल. अर्थात हे निरीक्षण सरसकट आदिवासींना लागू होत नाही. त्यामुळे आपण जाणून घेऊया गोंड आदिवासींची मासिक पाळी व्यवस्थापनाची ‘कुरमा ता लोन’ पध्दती..
पाळीचं घर नव्हे स्त्रियांचं घर
‘कुरमा ता लोन’ गोंड समाजाच्या गोंडी या भाषेतील शब्द आहे. पूर्वी या भाषेचा वापर केवळ बोलीभाषा म्हणून व्हायचा. मात्र अलीकडेच या समाजातील युवकांनी गोंडी भाषेची लिपी व वर्णमाला क्रमबध्द केलेली आहे. गोंडी भाषेतील ‘कुरमा ता लोन’ या शब्दांचा मराठीतील अर्थ ‘मासिक पाळीचे घर’ असा होतो. गावातील कोणत्याही महिला / युवतीला मासिक पाळी आल्यास ४-५ दिवस या घरात जावून रहावे लागते. आपल्याकडील सामाजिक विविधतेनुसार मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांच्या स्वतंत्र बसण्याच्या सुविधा आहेत. मात्र गोंड समाजामध्ये मासिक पाळी दरम्यान स्त्रीला स्वतंत्र ठेवले जाते. त्यासाठीच या ‘कुरमा ता लोन’ या ‘मासिक पाळीच्या घरांची / निवाऱ्याची निर्मिती केली जाते. या निवाऱ्याची निर्मिती वैयक्तिक नसून सामाईक प्रकारे केली जाते. ८-१० घरांच्या वस्तीमागे १ निवारा उभारला जातो. अर्थातच हा निवारा उभारण्यासाठी बांबू व अन्य लाकूडफाटा वापरला जातो. गावच्या लोकसंख्येवर या निवाऱ्यांची संख्या अवलंबून असते. ज्या स्त्रीला मासिक पाळी येते त्या स्त्रीला विटाळशी मानून या ‘कुरमा ता लोन’ नावाच्या निवाऱ्यात ३-४ दिवस रहायला जावे लागते. मासिक पाळी आलेल्या स्त्रीचा स्पर्शसुध्दा पाळीच्या ४ दिवसांत निषिध्द मानला जातो. अशा स्त्रीला सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीवर जाण्यास सक्त मनाई असते. तिला स्वतःच्या घरात जाता येत नाही. ‘कुरमा ता लोन’ मध्येच घरातील पुरुष वा स्त्रिया जेवण आणून देतात. तिच्या वाट्याची घरकामे घरातील इतर पुरुष वा महिला करतात. मात्र तिला धुणीभांडी करण्याची मुभा असते. त्यामुळे त्या ‘कुरमा ता लोन’ मध्येच घरातील मंडळी धुवायचे कपडे, भांडी व पाणी नेऊन देतात व काम करून घेतात.
मासिक पाळी दरम्यान घरातील कामांना, लोकांना स्पर्श करण्याची मुभा नसली तरी या काळात शेतातील कष्टाची कामे करण्यास कोणतीही हरकत नसते. म्हणजे गुरांना चारायला घेवून जाता येते. भांगलण करता येते, वगैरे. वा अन्य लाकूडफाटा जमा करण्याच्या कामात हातभार लावता येतो. मात्र शेतकामातही तिला भात लावणी, कापणी किंवा झोडणी करू दिली जात नाही. ‘कुरमा ता लोन’ या झोपडीवजा निवाऱ्यात एकाच वेळी त्या समूहातील अनेक स्त्रिया असू शकतात. मासिक पाळी आलेल्या स्त्रिया वगळता त्या निवाऱ्यात आत जाण्याची परवानगी इतर कोणालाही नसते. संबंधित स्त्रीला लहान मुले असतील तर ती मुले या निवारागृहात जाऊ शकतात, तिकडे खेळूही शकतात. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील राष्ट्रीय पातळीवर नावाजले गेलेले गाव म्हणजे मेंढा-लेखा. या गावाने देशात सर्वप्रथम वनहक्क कायद्यांची अंमलबजावणी ग्रामसभेच्या माध्यमातून करत आदिवासींची पिळवणूक थांबवण्याचे क्रांतिकारी पाऊल उचलले. या गावात सन २०१२-१४ च्या दरम्यान या पारंपारिक ‘कुरमा ता लोन’ मध्ये आमूलाग्र बदल केला. मासिक पाळी आलेल्या बाईला ३-४ दिवसांचा प्रदीर्घ कालावधी पाळीच्या निवारागृहात काढायला लागत असल्याने पाळी आलेल्या स्त्रियांची आबाळ होऊ नये म्हणून लहान झोपडीवजा निवाऱ्यांचे रूपांतर प्रशस्त सिमेंट-विटांच्या पक्क्या घरांमध्ये केले आहे. मेंढा-लेखा या गावाचा आवर्जून उल्लेख केला, कारण या गावाने ‘कुरमा ता लोन’ हे नाव बदलून ‘आस्कना लोन’ असे केले आहे. ‘आस्कना लोन’ हा देखील गोंडी भाषेतील शब्द असून याचा मराठीतील अर्थ ‘स्त्रियांचे घर’ असा होतो. पूर्वीचे मासिक पाळीचे घर हे नाव बदलून स्त्रियांचे घर असे केल्याने फार मोठी सामाजिक क्रांती वगैरे झालेली नाही. मात्र गोंड समाजाच्या मासिक पाळी बाबतच्या एकंदर दृष्टिकोनात बदल होत असल्याचे हे आशादायक चित्र म्हणावे लागेल.
आशादायक चित्र यासाठी म्हणतोय कारण, ही रुढी पाळणाऱ्या महिला या अशिक्षित वा अल्पशिक्षित आहेत. नव्या पिढीच्या शाळा कॉलेजात शिकणाऱ्या मुली या प्रथेला कवटाळून बसायला तयार नाहीत. कुटुंबियांना अतिशय समजूतदारपणे मासिक पाळी आणि त्यामागली नैसर्गिक, शास्त्रीय कारणे पटवून देतात. अशा प्रकारची बाजूला बसण्याची प्रथा पाळायला या मुली तयार नाहीत. शिवाय या मुली आपल्या पालकांचे प्रबोधन करतात. त्यामुळे ही प्रथा मोडीत निघण्याच्या उंबरठ्यावर आहे. पण पूर्णतः मोडली गेलेली नाही. सध्याच्या काळात या मुली घराबाहेर पडवीत वगैरे थांबल्या तरी पालकांशी बोलणे, इतर बायकांशी गप्पागोष्टी करणे व स्वयंपाक वगळता इतर कामे जमेल तश्या करतात. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात मुली आल्याने हा बदल दिसू लागला आहे. त्यामुळे याच मुली भविष्यात मासिक पाळी बाबतच्या स्वतंत्र मासिक पाळी घर किंवा स्त्री घराच्या प्रथेला तिलांजली देतील याची खात्री वाटते. कारण या प्रथेचं काय करायचे, हा निर्णय याच मुली आगामी काळात घेणार आहेत. ही आशा वाटते कारण सुमारे ५ ते ६ विविध गावातील मुलींशी बोलताना आंतरजातीय विवाहाबाबत तुमचे मत काय, हा प्रश्न विचारला तेव्हा या मुलींनी कोणताही संकोच मनात न बाळगता आपल्या पालकांसमोरच ‘विवाह करताना जातीधर्माचा विचार न करता जोडीदारातील गुण, कर्तबगारी याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे,’ असे ठाम मत मांडले. त्यावरून कोणत्याही सामाजिक रुढीला आगामी काळात या मुली शास्त्रीय दृष्टिकोनातून हाताळतील याची खात्री वाटते.
मासिक पाळी दरम्यान शरीरसंबंध योग्य की अयोग्य?
गोविंद काका हे माझे वय वर्षे सत्तरीच्या घरातील मित्र. गोविंद काका आणि माझी ओळख एका सहकारी संस्थेत एकत्र काम करत असताना १५ वर्षांपूर्वी झाली. गोविंद काका हे सुशेगात आयुष्य जगलेले गृहस्थ. अतिशय लाघवी व अभ्यासू मत प्रदर्शन हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य! सेवानिवृत्त झाल्यावरही सोशल मेडीयात प्रचंड सक्रीय असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या अशा साक्षर व सुशिक्षित मनुष्यालाही मासिक पाळी दरम्यान प्रचंड त्रास होतो. खूप रक्तस्त्राव होतो याची माहिती नव्हती. लग्नानंतर थोडीफार माहिती त्यांना पत्नीकडून मिळाली. तरीही म्हणावी अशी संवेदनशीलता त्यांच्याकडे आली नव्हती. मात्र जेव्हा त्यांची मुलगी पौगंडावस्थेत गेली व तिला मासिक पाळीचा त्रास सुरु झाला. तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना मासिक पाळीबाबतचे गांभीर्य लक्षात आले. व त्यानंतर ते संवेदनशील झाले, असे स्वतः गोविंद काकांनी सांगितले. अशीच एक माझी सांगलीची मैत्रीण आहे, वयाच्या साठीतून पुढे गेली आहे. आमची ओळख २०१४ मध्ये सांगलीत झाली, रेवती तिचे नांव. रेवतीला तीन मोठ्या बहिणी, वडिल सरकारी अधिकारी, आई गृहीणी. रेवतीच्या तारुण्यात मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी पॅड ऐवजी सुती कपड्यांच्या घड्या करुन वापरावे लागत असे. चौघी बहिणींनी अर्थातच कपड्याच्या घड्या वापरल्या. तेव्हा त्यांच्या कुटुंबात कमावणारे फक्त त्यांचे वडीलच असल्याने, खर्चात काटकसर म्हणून बहिणी कपड्यांच्या घड्या वापरायच्या. पाळी दरम्यान वापरलेले कापड धुवून सुकत टाकणे हा एक किळसवाणा प्रकार असल्याचे रेवती सांगते. आजही त्या आठवणी सांगताना तिच्या अंगावर शहारा येतो. मात्र रेवतीच्या वडीलांना जेव्हा या प्रकाराबाबत माहीत झाले. त्यानंतर तीचे वडील त्याकाळात चौघी बहिणींनी बचत करण्यासाठी म्हणून सॅनिटरी पॅड वापरत नाहीत याबद्दल नाराज झाले. त्या दिवसानंतर रेवतीचे वडील चौघी बहिणींसाठी बाजारातून सॅनिटरी पॅड खरेदी करून आणायचे. या दोन्ही उदाहरणातून एक निष्कर्ष काढावासा वाटतो. तो असा की, पत्नीच्या मासिक पाळी बाबत पुरुष जितका संवेदनशील असतो, त्यापेक्षा कित्येक पट जास्त मुलींच्या मासिक पाळीच्या बाबतीत संवेदनशील होतो. अर्थातच या निष्कर्षाचे सरसकटीकरण करता येत नाही. तसे सरसकटीकरण करुही नये.
मासिक पाळी दरम्यान जोडीदारासोबत शरीरसंबंध योग्य की अयोग्य? याबाबत दोन परस्परविरोधी मतप्रवाह आहेत. या दोन्ही मतप्रवाहांच्या विरुध्द एक पुरुष म्हणून माझे वैयक्तिक पातळीवर मत आहे. तेच मत मी इथे नमूद करणार आहे. निसर्गरचना व शास्त्रीय कसोटीवर विचार केल्यास, प्राणीमात्रामध्ये बोकड व मनुष्य सोडल्यास मादीच्या इच्छेविरुध्द किंवा परवानगी शिवाय शरीरसंबंध अन्य प्रवर्गातील प्राणी ठेवत नाहीत. मासिक पाळीचा ४-५ दिवसांचा कालावधी वगळला तर उर्वरित काळात वेळ काळाचे बंधन न पाळता शरीरसंबंध प्रस्थापित करता येऊ शकतात. त्यामुळे पाळीच्या काळात शरीरसंबंधाचा आग्रह असण्याचे काहीच कारण नाही. याउपरही एखाद्या जोडप्यास या काळात शरीरसंबंध प्रस्थापित करायचे असतील तर ती त्यांची वैयक्तिक बाब म्हणून दुर्लक्ष करावे. मात्र याचे उदात्तीकरण होऊ नये. हल्ली अनेक ऑनलाईन न्यूज देणाऱ्या पोर्टल्सवर मासिक पाळी दरम्यान शरीरसंबंध ठेवण्यासाठी धडधडीतपणे टिप्स दिल्या जातात. जे अतिशय चुकीचे आहे. कारण काही स्त्रिया वगळल्या तर सर्रास स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान रक्तस्राव व इतर शारीरिक त्रास होतच असतो. अशा काळात स्त्रियांना आराम करण्याची आवश्यकता अधिक असते. या काळात जोडीदाराची काळजी घेणे आवश्यक असते. नात्याची वीण अशा लहान-लहान प्रसंगातून अधिक मजबूत होत असते. याव्यतिरिक्त विज्ञान विषयाचा, लैंगिक शिक्षण विषयाचा अभ्यास नसलेला एक मोठा वर्ग आहे. केवळ लिहिता वाचता येणे म्हणजे साक्षरता असा समज आपल्याकडे आहे. विविध पोर्टल्सवरील माहिती कोणत्याही तज्ञाने वा शासनाने अधिकृत ठरवलेली माहिती नसते. अशा स्वरुपातील अर्धवट बातम्या वाचून उलट मासिक पाळी दरम्यानच्या काळात जबरदस्ती शरीरसंबंध किंवा अनैसर्गिक शरीरसंबंधास महिलांना बळी पडावे लागू शकते. बातमी व क्लिकबेटच्या नावाखाली समाजात अर्धवट माहिती पेरून विकृतीला खतपाणी घातले जात आहे. अशा प्रवृत्तीला विरोध करणे आवश्यक आहे. असे एक भारतीय, एक पुरुष व एक बाप म्हणून माझे ठाम मत आहे.
शिवाय शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन (STI) हे इन्फेक्शन मासिक पाळीदरम्यान होण्याची शक्यता अधिक असते. मासिक पाळीच्या कालखंडात उर्वरित महिन्याच्या तुलनेत स्त्रीच्या गर्भाशयाच्या मुखाचे तोंड अधिक प्रमाणात उघडे असते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यानचे शरीरसंबंध पुरुषाकडून काही इन्फेक्शन झाल्यास ते इन्फेक्शन थेट गर्भाशयात पोहोचू शकते. तसेच रक्त हे इन्फेक्शन होण्याचे सर्वात जलद माध्यम आहे. एचआयव्ही एड्स सारखे घातक रोग असुरक्षित शरीरसंबंध व रक्तातूनच झपाट्याने पसरले होते. याचा विसर पडू न देणे आवश्यक आहे. मासिक पाळीदरम्यान स्त्री च्या शरीरातून बाहेर पडणारे रक्त टाकाऊच असते. या रक्तामध्ये अन्य इन्फेक्शन असण्याची शक्यता असतेच असते. त्यामुळे या काळात शरीरसंबंध ठेवल्यास जोडीदारापैकी एकाला इन्फेक्शन असेल तर ते लगेच संक्रमित होण्याचा धोका सर्वाधिक असतो. मासिक पाळी दरम्यान सेक्स न केल्यास जोडीदार स्त्रीला किमान त्या कारणास्तव शारीरिक विश्रांती मिळते. ही विश्रांती केवळ स्वतःच्या समाधानासाठी हिरावून घेवून पुरुषार्थ गाजवण्यापेक्षा जाडीदार स्त्रीला मासिक पाळीदरम्यान सर्वच प्रकारच्या विश्रांतीला लाभ कसा देता येईल, याबाबत संवेदनशील असणे हा खरा पुरुषार्थ आहे.