माझ्या इमारतीत राहणारी मैत्रीण शीतल. एक दिवस सहज बोलता बोलता तिच्याकडून कळलं की सहा सहा महिने तिला मासिक पाळी येत नाही. आम्ही गेल्या १३ वर्षांपासून एकमेकींना ओळखतो. मात्र, या एक दोन वर्षात तिचं वजन वाढत असलेलं बघून मी तिला सहज म्हणाले की वजन कमी व्हायला हवं. नाहीतर मासिक पाळीच्या समस्या वाढतील. तेव्हा तिनं तिच्या पाळीची सध्याची समस्याच सांगितली. हे ऐकून खरंतर मी चक्रावून गेले. तिला म्हटलं, “अगं, मग डॉक्टरांना दाखवायला हवं.” त्यावर ती हसून म्हणाली पण मला आता सवय झाली आहे. या विषयाचं गांभीर्य तिला समजलं नव्हतं. मग मी तिला याबाबत भविष्यातील धोके समजावून सांगितले आणि डॉक्टरांकडे जायला तयार केलं. आता महिना झाला तिने चालायला वगैरे सुरू केले आहे, डॉक्टरांनी औषधांपेक्षा व्यायामावर भर द्या म्हणून सांगितलं. एक मैत्रीण म्हणून मी तिच्या मागे लागते. जबरदस्तीने तिला चालायला वगैरे नेते. आता बघूया, माझी मैत्रीण या परीक्षेत यशस्वी होतेय का?
मासिक पाळीचे चक्र दर महिन्याला सुरळीत सुरु राहिले तर महिला, मुलींचे आरोग्य उत्तम राहते असे आयुर्वेदात सुद्धा म्हटलं आहे. मात्र गेल्या पाच सहा वर्षापासून महिलांमध्ये विशेषत: अविवाहित मुलींमध्ये मासिक पाळीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याविषयी अनेक महिला, मुलींशी आणि स्त्री रोग तज्ज्ञांशी बोलून याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, बदलती जीवनशैली एकमेव कारण समोर आले. मात्र सध्या मासिक पाळीच्या अनियमित चक्रामुळे स्त्रियांमधील आजार वाढताहेत ही धक्कादायक माहिती रत्नागिरीतील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.शुभांगी बेडेकर यांच्या बोलण्यातून समोर आली.
डॉ. शुभांगी बेडेकर
मासिक पाळी अनियमित व्हायची अनेक कारणं डॉ.शुभांगी बेडेकर यांनी सांगितली. त्या म्हणाल्या, “दहा पंधरा वर्षात लोकांच्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलू लागल्या आहेत. फास्ट फूड खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. पूर्वी घरातील सर्वच मंडळी सकाळी पोळी, भाकरी- भाजी पोटभर खात असत किंवा इतर सकस न्याहारी करत होते. आता मुली चायनीज पदार्थांसह बिस्कीटं, चहा, कॉफी, मॅगी अशी काहीतरी अर्धवट न्याहारी करतात. शिवाय अवेळी खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही मुली सडपातळ राहण्याच्या नादातही आहाराकडे दुर्लक्ष करतात. परिणामी वयात आल्यावर काही महिने मासिक पाळी सुरळीत असते. वर्षभरानंतर मात्र मासिक पाळीचं चक्र बिघडायला सुरूवात होते आहे. फास्टफूडमुळे मुलींमध्ये वजन वाढण्याची समस्या सुरू होते आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, सकस आहाराचा अभाव- एक स्त्री कुटुंबाची काळजी घेत असताना मुलांना वगैरे सकस आहार देण्याचा प्रयत्न करत असते स्वत: मात्र वेळेत आणि योग्य आहार घेत नाही. आजकालच्या मुली घरातील नियमित कामे सुद्धा करत नसल्याने त्यांची हालचाल कमी झाली आहे. त्यामुळे भूकही मंदावतेय. योग्य सकस आहार नसल्याने हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी, कॅल्शियम कमी परिणामी मासिक पाळी चक्र बिघडत आहे.
बैठ्या जीवनशैलीमुळे अंगमेहनत कमी झाली आहे. त्याचाही परिणाम वजनावर होतोच. वजन वाढल्याने आपोआपच मासिक पाळीचे चक्र बिघडतेय. अपुरी झोप, कामाचा ताण, कौटुंबिक गोष्टींचा ताण याचाही परिणाम आपोआप आरोग्यावर होत आहे. आपण कितीही बाबत पुढे गेलो तरी आजही बहुतांश महिला घरातील शुभकार्य, धार्मिक कार्यावेळी पाळी येऊ नये यासाठी पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या घेतात. यामुळेही मासिक पाळी दरम्यान अंगावरुन कमी जाणे, जास्त जाणे असे चक्र सुरु होते. डॉ. शुभांगी यांच्या म्हणण्यांनुसार यामध्ये सुशिक्षित महिला सुद्धा मागे नाहीत. अशा बऱ्याच कारणांमुळे महिलांचे मासिक पाळीचे चक्र बिघडून गर्भाशय व त्यासंबंधी आजार वाढण्याचे प्रमाण वाढू लागले आहे आणि हे अतिशय चिंताजनक आहे.
आपल्या बायकोच्या मासिकचक्राविषयी जागरूक आहात ना …
”माझ्याकडे १८ वर्षाच्या मुलीची मासिक पाळीची केस आली होती. तिचे लग्न होऊन ३ महिने झाले होते. मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्राव होतोय म्हणून आली होती.” होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.रविराज सोनार सांगत होते. ”तिचे वय
डॉ. रविराज सोनार
पाहता आणि कौटुंबिक जबाबदारी यामध्ये तिची ओढाताण होतेय असे मला दिसून आले. म्हणून मी तिचे आधी समुदेशन केले. त्यानंतर होमिओपॅथी औषधे सुरू केले. ही औषधे तिने नियमितपणे घेतली नाही… पुन्हा काही महिन्यांनि ती माझ्याकडे आली… गोळ्या घ्यायला लक्षात राहत नाही, म्हणाली. मग मात्र मी तिच्या नवऱ्यालाही सोबत बोलावले आणि त्याला सर्व समजावून सांगितले. त्यानंतर तिने व्यवस्थित औषधे घेतली आणि सहा महिन्यात तिची पाळी सुरळीत झाली.”महिला, मुली आपल्या मासिक पाळीबद्दल फार काळजी घेत नाहीत. मग अति त्रास झाला की उपचारासाठी येतात. याकडे कुटुंबातील लोकांचे लक्ष नसते, याबाबत मोकळेपणाने बोलले जात नसल्याचे डॉ सोनार सांगतात.
२४ वर्षांची पूनम सांगते, ”माझे वजन जास्त आहे. वर्षभरापूर्वी माझे लग्न झाले. मला काही वर्षापासून मासिक पाळीचा त्रास आहे, त्यातच मला थॉरॉईडसुध्दा झाला आहे. यासाठी मी आयुर्वेदिक उपचार घेत आहे. आता लग्नानंतरही ही समस्या सुरु आहे, त्यामुळे मला प्रेग्नसीला काही अडचणी येतील का याबाबत घरच्यांना भीती वाटते. त्यामुळे मी एका स्त्रीरोग तज्ज्ञांकडून उपचारदेखील सुरु केले आहेत. या सगळ्याचा मानसिक ताणही येतो. मात्र आता आयुर्वेदिक उपचारामुळे आणि विशेषतः माझ्या नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे मी नियमित औषध घेते. खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा बदलल्या आहेत. आता थोडा फरक जाणवतोय. पूनमने आपल्या समस्येवर कशी मात करत आहे किंवा काय अडचणी येत आहेत, याबाबत सांगितले. दोन मुलांची आई असलेली रोहिणी सांगते, ”आता माझे वय १९ आहे. मला वयाच्या १२ व्या वर्षी मासिक पाळी सुरू झाली. सुरुवातीला मी खूप घाबरले होते. घाबरून तापसुध्दा भरला होता. घरात या विषयावर कोणी स्पष्टपणे बोलून समजावणारे नाही. मासिक पाळी आली की, बाजूच्या खोलीत बसवले जाते, इथ हात लावू नको तिथे हात लावू नको, कोपर्यात बसून रहा हे आजही माझ्यासारख्या अनेक मुलींना सहन करावे लागते यामुळे मनात एक प्रकारचे दडपण येते. मुळात मासिक पाळी हे एक नैसर्गिक चक्र आहे हे आजही कोणाला सहसा पटत नाही. मासिक पाळीतसुध्दा आनंदी राहता आले पाहिजे, मात्र आमच्या वाटेला असे नाही” अशी खंत ती व्यक्त करते. शीतल सांगते, ”मला लग्नानंतर मासिक पाळीचा त्रास सुरू झाला. आता माझे वय ३३ आहे. माझ्या दुसर्या प्रसुतीनंतर जवळपास एक-दीड वर्षे मासिक पाळीच आली नव्हती. आता मुलगी ८ वर्षाची झाली तरी मला दर महिन्याला पाळी येत नाही. तीन चार महिन्यांनी पाळी येते. मात्र एक दोन वेळा डॉक्टरांकडे गेले. त्यानंतर घरची जबाबदारी, २ मुलींचे शिक्षण यामध्ये स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही.. यामुळे माझे वजनही दुपटीने वाढले आहे. घरच्या कामातून व्यायाम करायलाही सवड नाही. मात्र आज प्रतिक्रिया व्यक्त करताना वाटतय मी स्वत:साठी वेळ काढला पाहिजे, नवी उमेदने महिलांच्या अगदी कॉमन प्रश्नाकडे लक्ष दिले. त्यामुळे आम्हालाही आता वाटू लागले आहे स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आता माझ्या मैत्रिणी मला सगळ्या गोष्टींतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आता मी स्वतःसाठी जगणार आहे स्वतःवर प्रेम करणार आहे हे सगळं माझ्या मैत्रिणीकडून शिकले. ” असे सकारात्मक विचार शीतल ने मांडले.
अपर्णा म्हणते, ”मासिक पाळीचा त्रास फारसा नव्हता मात्र कोरोना होऊन गेल्यानंतर अशक्तपणा व इतर बारीकसारीक तक्रारी सुरु झाल्यानंतर मात्र मासिक पाळीदरम्यान कमी जास्त अंगावरुन जाते. कधी अति जास्त तर कधी अतिशय कमी यामुळे माझ्या तब्येतीत सुधारणा होत नाही. माझे वय ३४ आहे. नोकरी, कौटुंबिक जबाबदारी आणि तब्येत सांभाळताना ओढाताण होते. मात्र नवऱ्याचा खूप मोठा आधार आहे. मासिक पाळीदरम्यान स्त्रीला सांभाळून घेणारी आणि आधार देणारी माणसे सभोवताली हवीतच.” मासिक पाळीवर आपले आरोग्य अवलंबून असते हे बर्याच महिला आणि मुलींना माहिती नाही. याविषयी स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्येही मोठ्या प्रमाणावर जागरूकता आवश्यक आहे.
माझी मासिक पाळी आणि भीती, गैरसमज
आता माझा स्वतःचा अनुभव. मासिक पाळीबाबत मला कधीच काही माहिती नव्हते. वयाच्या १४ व्या वर्षी मला मासिक पाळी आली. फ्रॉकला मागच्या बाजूला रक्ताचे डाग लागले होते. मला अजूनही चांगलं आठवतंय, शाळेला सुट्टी होती. मी झाडांना पाणी घालत होते. पलीकडे माझी मोठी ताई कपडे धुवत होती. तिचे लक्ष माझ्या फ्रॉककडे गेले आणि तिने आईला सांगितले. मी वयात आले आहे, मला कळलेच नव्हते. आईने मला लगेच आंघोळ घातली. माझ्या तेव्हा लक्षात आले की आपल्याला योनीमार्गातून रक्त जात आहे आणि याला पाळी म्हणतात आणि ती दर महिन्याला येणार, हे मला अजिबात माहिती नव्हते. आईने मला कॉटनचं फडकं घडी घालून दिले आणि लाव सांगितले. मी खूप घाबरले होते, मला रडायला पण येत होतं पण मला कोणीच काही सांगितले नाही. पण मी मोठी झाले आहे, आता नीट राहायचं आणि नीट वागायचं, एवढं बजावण्यात आलं. आंघोळ झाल्यावर आईने मला खोबरं आणि गूळ किसून त्यात तूप घालून खायला दिले आणि सांगितले ५ दिवस घराबाहेर जायचे नाही. घरात मोकळे वातावरण नव्हते त्यामुळे मी काही बोलले नाही. शांत झोपून होते. माझी पाळी सुरू झाली मला थोडा त्रास पण होऊ लागला. नंतर ताप पण आला होता. बाबा, जे मला नेहमी आल्यावर हाक मारायचे ते पण शांत होते. मला वाटत होतं की मी काही गुन्हा केला आहे का सगळे असे का वागत आहेत? पाचव्या दिवशी आईने गोडधोड केले घरातील माझ्या चुलत बहिणी वगैरे सगळे आले होते. मला साडी नेसवली, गजरा माळला, हिरव्या बांगड्या घातल्या. घरात आईला कधी पाळी येते का किंवा ताईला मला माहिती नव्हते. माझा मासिक पाळीचा कपडा मी स्वतः धुवून बाथरूममध्येच आडोशाला टाकायचे. त्यावर दुसरा फडका टाकायची कारण कोणाला कळू नये म्हणून…..
सहाव्या दिवशी शाळेत गेले पण माझ्यातील एक बालपण मी हरवले असं वाटत होतं या मासिक पाळीमुळे. माझ्या घरात, आमच्या सगळ्या नातेवाईकांमध्ये हीच प्रथा होती, मी शांत राहू लागले. खेळायला जातानाही विचार करू लागले. हळूहळू मला माझ्या मैत्रिणीकडून कळले की मासिक पाळी सर्व मुलींना योग्य वयात येते. त्यांनाही येत होती, पण माझ्या घरात कोणी सुशिक्षित नसतानाही मला ५ दिवस बाहेर बसवले नाही मात्र माझ्या मैत्रिणींना आडोशाला ३ दिवस राहावं लागत होतं. कोणत्याही वस्तूला वगेरे हात लावू देत नव्हते. मी मात्र त्यामानाने सुखी होते. माझ्या घरात असं नव्हतं. फक्त मासिक पाळी विषय आला की काहीतरी गुन्हा घडल्यासारखे सगळे बघायचे.
हा सगळा प्रकार काय आहे मला पत्रकार क्षेत्रात आल्यावर कळले. तोपर्यंत मला फार काही माहिती नव्हते.
लग्नानंतर माझ्या पतीनं याबाबत मला सपोर्ट केला. ते स्वतः मला अत्यावश्यक वेळी सॅनिटरी पॅड आणून देतात. कधी कधी माझा ११ वर्षाचा मुलगासुद्धा दुकानात जाऊन माझ्यासाठी पॅड आणतो. ऐकायला सगळ्यांना आश्चर्य वाटेल पण मी लग्न झाल्यावर काही कालावधीनंतर सॅनिटरी पॅड वापरायला लागले, माझ्या घरात असे सॅनिटरी पॅड असते, हेच माहिती नव्हते. पत्रकार क्षेत्रात आल्यावर मला याचा चांगला अभ्यास झाला. मी आता सगळीकडे याबाबत जनजागृती करते. आज माझे वडील ६० वर्षाचे आहेत. माझ्या वहिनीला ते स्वतः पॅड आणून देतात.
माझ्यावेळी साधारणतः २० वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती बदलली असली तरी याबाबत अजूनही जनजागृती होणे आवश्यक आहे. माझा मुलगा ३ वर्षांपूर्वी पॅड आणायला मेडिकलमध्ये गेला होता. त्यावेळी हे कागदात का बांधून देता? टिव्हीच्या जाहिरातीत कागद नसतो, हे लपवायचे नसते असे दुकानदाराला सांगितले होते. त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही कागदात बांधून पॅड घेत नाही. माझी दर महिन्याची डेट असते हे माझ्या मुलाला माहिती आहे. त्यावेळी तो मदतही करतो.
मला वाटते, आपण स्वतःहून मुलांना काही गोष्टी लहानपणीच सांगितल्या, त्यांना सजग केलं तर याविषयीचा दृष्टिकोन बदलेल. मासिक पाळीचं महत्त्व, त्याकडे आरोग्याच्या दृष्टिकोनातून निकोपपणे आणि आवश्यक त्या गांभीर्यानं पाहिलं तर भविष्यात मासिक पाळीच्या बऱ्याच समस्या सुटतील.