एप्रिल महिना. लॉकडाऊनचा काळ. किराणा सामान वाटताना संगिनी ग्रुप नाशिकच्या पाथर्डी- इंदिरानगर लिंक रोडवर पोतराज समाजाच्या वस्तीजवळ पोहोचला. त्यांना किराणा सामान दिलं. तेव्हा इथल्या मुलांसाठी काहीतरी करण्याची भावना जागी झाली.
पोतराज समाज डोक्याकर देव आणि देवघर घेऊन दारोदारी फिरतात. अन्नधान्य, पैसे मिळेल ते घेऊन उदरनिर्वाह करतात. सकाळी ९ वाजल्यापासूनशहरभर निघतात. सोबत मुलंही. १२ वाजेपर्यंत घरी परतात. शाळेची आणि यांची गाठ पडतच नाही.
संगिनी महिला जागृती मंडळाच्या कार्यकर्त्या कल्याणी अनिता मनोहर, शीतल पवार, हर्षाली देवरे, स्वाती त्यांच्या संपर्कात आल्या. काही मुलांची केवळ शाळेत नावं होती पण ते नियमित शाळेत जात नव्हते. काहींनी तर शाळेचं तोंडही पाहिलं नव्हतं. या मुलांना शिकवण्याचं, त्यांची कौशल्यं विकसित करायचं संगिनी ग्रुपनं ठरवलं.
सुरुवातीला मुलांशी मैत्री केली. त्यांचा विश्वास मिळवला. मगच त्यांना प्रत्यक्षात शिकवायला सुरवात केली. संगिनीच्या कार्यकर्त्यांनी रोज ३ ते ५ या वेळेत येऊन शिकवण्याचं ठरलं. त्यामुळे मुलंही वेळ देऊ शकली. आज या मुलांना शिक्षणाची गोडी लागली आहे. १ ते १८ वयोगटातली ३५ ते ४० मुलमुली आता शाळेत रमली आहेत.अक्षर, अंक ओळख झाली आहे. या खेळघराला त्यांनी ‘मस्ती कि पाठशाला’ असं नाव दिलं आहे. मुलांबरोबर खेळ घेणे, गाणी म्हणणे, क्राफ्ट शिकवणे, गोष्टी सांगणे या माध्यमातून त्यांना शाळेची गोडी लावली जात आहे.
मुलांना किमान लिहितावाचता तरी यावं अशी अपेक्षा पालक व्यक्त करतात. संगिनीच्या कार्यकर्त्यांना ते हवी ती मदत करतात. मागच्या लॉकडाऊनमध्ये शाळेसाठी बांधलेली झोपडी मध्यंतरी मुसळधार पावसाने पडून गेली. आता पुन्हा शाळेसाठी झोपडी बांधली आहे. यासाठी लागणारा निधी लोकसहभागातून. कुणी शैक्षणिक साहित्य, कुणी आर्थिक स्वरूपात तर कुणी श्रमदानातून मदत करतं. प्रिया ठाकूर नावाच्या एका मैत्रिणीने मुलांसाठी २५ पाट्या घेऊन दिल्या.
नुकताच या मुलांनी गणेशोत्सव साजरा केला. त्यांना पानांपासून गणपती कसा तयार करायचा ते शिकवण्यात आले. शाळेत छोटासा गणपती बसवण्यात आला. विविध कार्यक्रम झाले. मुलांनी वाया गेलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्यांपासून बसायचे टिकाऊ स्टूल तयार केलं.
आता भविष्यात शाळा जोमाने काम करणार आहे. शाळेला छोटीशी का होईना पण पक्की खोली बांधायची आहे. त्यासाठी आर्थिक मदत, साहित्य, श्रमदान यांची गरज आहे.
-भाग्यश्री मुळे, नाशिक
Related