सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. हिंगोली जिल्यातल्या सेनगाव तालुक्यातलं मौजे साखरा. इथंही २ लग्न होती, २४ डिसेंबरला. झटपट ठरलेल्या या लग्नात सगळं काही झटपट उरकलं जात होतं. वधू १८ वर्षांखालच्या होत्या. याबाबत चाईल्ड लाईनला माहिती मिळाली. जिल्हा महिला बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी तात्काळ नियोजन केलं. पथक गावात पोहोचलं. चौकशीत मुली अल्पवयीन असल्याची पुष्टी झाली. ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, अंगणवाडी ताई, मुलीचे आईवडील,मामा सर्वांना बोलावून समुपदेशन करण्यात आलं. ग्राम बाल संरक्षण समिती समक्ष आई वडिलांकडून, मुलीला १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, असा लेखी जवाब लिहून घेण्यात आला.

त्याआधीही ३० नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या १५ दिवसात ५ बालविवाह रोखण्यात आले. काही जागरूक नागरिक आणि ग्राम बाल संरक्षण समित्यांनी माहिती दिली. त्यानुसार ३० नोव्हेंबरला सिंदगी (ता. कळमनुरी ),७ डिसेंबरला कारवाडी (ता. हिंगोली ), पिंपळा चौरे (ता. वसमत ) इथले बालविवाह थांबवण्यात आले. ११ डिसेंबरला गोरेगांव (ता. सेनगाव ) इथली २ अल्पवयीन मुलींची लग्न टळली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारों अॅड. अनुराधा पंडीत, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी बालविवाहातले धोके,मुलींच्या आरोग्याला असलेला धोका, पालकांना समजावून सांगितले.
बालविवाह रोखण्यासाठी चाईल्ड लाईन (1098) या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा, असं आवाहन जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी केलं आहे.
मुलींचं शिक्षण आणि त्यांच्या वयाचा विचार न करता बालविवाह मोठ्या प्रमाणात होत आहेत. परंतु मुलांच्या हक्कांचे संरक्षण करुन त्याला प्रतिबंध आवश्यक आहे, असं जिल्हाधिकारी आणि बालविवाह प्रतिबंध समिती, अध्यक्ष, जितेंद्र पापळकर यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यात बालविवाह होऊ नयेत, यासाठी नुकत्याच झालेल्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या आढावा बैठकीत उपाययोजनांबाबत त्यांनी चर्चा केली. बालविवाह रोखण्यासाठी तालुका बाल संरक्षण समिती संदर्भातील सुचना फलक प्रत्येक तहसील कार्यालयात लावावेत. प्रत्येक ग्राम पंचायत कार्यालयात ग्राम बाल संरक्षण समितीचे सूचना फलक लावावेत, अशा सूचना दिल्या.
-बाळासाहेब काळे, हिंगोली
Related