माझा वर्ग… माझे विद्यार्थी..
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातली कौसडी इथली जिल्हा परिषदेची केंद्रीय पाथमिक शाळा. उस्मानाबादच्या विनोद शेंडगे सरांनी इथूनच 2004 साली शिक्षकी सेवेला सुरूवात केली. मुळातच शिक्षण क्षेत्राविषयी आवड, विद्यार्थ्यांप्रती जबाबदारीची जाणीव, यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणारे विविध उपक्रम त्यांच्याकडून राबविले जाऊ लागले.
माझा वर्ग… माझे विद्यार्थी..
2006 पासून त्यांनी विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली. ‘माझा वर्ग’ ही एक वेगळी पण तितकीच मनाला भावणारी, आपलेपणा निर्माण करणारी संकल्पना त्यांना सुचली. माझी वस्तू, माझी आई,माझे बाबा, माझं घर,माझं शेत याविषयी विद्यार्थी जसे हक्काने बोलतात, आपलेपणा दाखवतात तसंच त्यांनी वर्गाविषयी बोलावं असं वाटल्याचं सर सांगतात. सर म्हणतात, त्यांना जसे घरात आई-बाबांच्या जवळ सुरक्षित वाटते, प्रेम मिळते. तेवढेच माझ्या वर्गात, माझ्या सानिध्यात त्यांना मिळावे याची जाणही ठेवावी लागणार. हे माझ्या मनाला समजलं आणि तिथूनच या उपक्रमांचा श्री गणेशा झाला.
मुलांना जे जे घरात आई-बाबा जवळ मिळते, ते ते माझ्या वर्गातील मुलांना मिळालं पाहिजे. इतकंच नाही तर त्यापेक्षा आपण वेगळं पण योग्य काय काय देऊ शकू? असा विचार सरांच्या मनात सुरू झाला. मुलांच्या बौद्धिक क्षमतेनुसार, बाल मानसशास्त्राचा विचार करून एकेका शैक्षणिक उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यासाठी ना वेळाचा ना पैशाचा विचार त्यांनी केला.
या संकल्पनेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने कार्याचे नियोजन केले. मग ती वर्ग सजावट असो, कल्पकतेने केलेली रंगरंगोटी, विविध शैक्षणिक साहित्य याचा अध्यापनातील उपयोग असो. मुलांना लागणारे पेन, पेन्सिल, खोडरबर, वह्या, काही पुस्तके सुद्धा वर्गामध्येच उपलब्ध करून दिली जात असतं. विशेष म्हणजे 2009-10 मध्ये संगणकासह वर्ग डिजिटल केला होता. जेणेकरून विद्यार्थी संगणक साक्षर होतील. स्वखर्चाने त्यांनी हा उपक्रम राबविला. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी व आरोग्य तपासणी डॉ.भारत ठाकूर, डॉ.सुरेश खापरे, डॉ.महेश देशमुख यांच्या सहकार्याने केली. लोकसत्ता वर्तमानपत्राने या उपक्रमाची दखल घेऊन त्यांच्या शैक्षणिक संवाद वाहिनी उपक्रमांतर्गत स्वतंत्र चार पाणी पुरवणी ‘माझा वर्ग…माझे विद्यार्थी’ याविषयी प्रसिद्ध केली.
खगोल दर्शन :लोक तारांगण
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा. ग्रामीण भागातील अंधश्रद्धा दूर व्हाव्यात. ज्योतिष हे एक थोतांड आहे हे कळावं यासाठीही सरांनी प्रयत्न केले. खगोलशास्त्राची त्यांनाही आवड त्यामुळे सरांना स्वखर्चाने दुर्बीण घेतली. स्वतःच्या शाळेतील विद्यार्थ्यासोबतच परिसरातील, तालुक्यातील विद्यार्थ्यांना खगोल दर्शनाचे विविध कार्यक्रम घेतले. लोक जागृती घडू लागली. लोकांचा प्रतिसाद मिळाला म्हणून ते लोक तारांगण झाले. ग्रह, तारे खगोलीय घटना त्याची माहिती ऐकून लोक अचिंबित होऊ लागले.
सायकलिंग : निसर्ग पेडल मार्ग
स्वतःच्या व्यायामासाठी म्हणून सुरू केलेलं सायकलिंग हा छंद झाला. भटकंती होऊ लागली. स्वतःच्या आरोग्यासोबत निसर्ग आनंद मिळू लागला. याच्यातूनच गावोगाव सायकलिंगविषयी जनजागृती विनोद शेंडगे करू लागले. सायकलिंगचे महत्व, प्रदूषण,आरोग्य, परकीय चलन, निसर्ग सानिध्य याच्या विषयी माहिती सांगू लागले. मित्र, युवक, विद्यार्थी यांच्यामध्ये गोडी निर्माण होण्यासाठी ‘निसर्ग पेडल मार्ग’ हा सायकल्स ग्रुप तयार केला. त्या माध्यमातून जिल्हा सायकल परिक्रमा,परभणी-रायगड-मुंबई,संत जनाबाई ते संत नामदेव म्हणजेच गंगाखेड ते नरसी नामदेव, परभणी ते पुणे अशा अनेक सायकल संवाद यात्रा काढल्या.
अक्षर आनंद, वाचन संस्कार केंद्र
तनासाठी सायकलींग तर मनासाठी पुस्तक वाचन. वाचन ही त्यांची शालेय जीवनापासूनची आवड. सरांकडे स्वतःचा सातशे पुस्तकाचा ग्रंथ संग्रह आहे. पुस्तक ही माझी श्रीमंती आहे. त्यामुळे मन सशक्त होते तर सायकलिंगने तन मजबूत होते. सायकलिंग करणे वैभवी आहे, असे ते सांगतात.
करोना काळात शाळा बंद होत्या. पुस्तक वाचनासाठी वेळच वेळ होता. म्हणून त्यांनी स्वतः वाचलेली पुस्तके त्यांच्या भागातील लोकांसाठी खुली केली. हळूहळू याच्यातून वाचन चळवळ उदयास आली. त्यांच्या कॉलनीतून त्यांच्या शाळेच्या ठिकाणी म्हणजे सोमठाणा तालुका मानवत नंतर कौसडी, बोरी, निवळी, ब्राह्मणगाव असं करत करत जिल्हाभर पसरली. वाचन संस्कृती वाढावी, समाजात वाचन चळवळ रुजावी यासाठी विनोद शेंडगे सतत विविध उपक्रम घेत आहेत. लोक विचार प्रतिष्ठानच्या माध्यमातून अक्षर आनंद, वाचन संस्कार केंद्र समाजात वाचनाची पेरणी करत आहे.
वाढदिवस वाचन
मुलांना वाढदिवस साजरा करणे आवडते. त्यांनाच काय सर्वांनाच तो आवडतो. मग जसा केक कापतो तसे पुस्तक पण वाचू. केक कापू, पुस्तक वाचू. मुलांच्या आजूबाजूला पुस्तक असली, कोणी वाचणारं दिसलं तर ते वाचतील. म्हणून हा उपक्रम सुरू झाला. यालाही खूप छान प्रतिसाद मिळतोय.
कुटुंब वाचन
मुलं अनुकरणप्रिय असतात. मुलांचं काय समाज ही एकमेकांचं अनुकरण करत असतो. आपल्या आजूबाजूला आपल्यापेक्षा मोठे लोक जे करतात. घरातील आई वडील,बहिण भाऊ, शेजारी, नातेवाईक जे जे करतात त्याचं मुलं अनुकरण करत असतात.
आई-वडील टीव्ही, मोबाईलवर जास्त वेळ असतील तर मुलंही तेच करतील. स्वतः टीव्ही पाहत बसणे व मुलांना पुस्तक वाचायला सांगितले तर ते वाचतील का? मुळीच नाही. ते फक्त वाचण्याचे नाटक करतील, सर सांगत होते.
मुलांना पुस्तक वाचणारी माणसे दिसत नसतील तर ते पुस्तक वाचतील कसे? म्हणून कुटुंब वाचन दररोज किमान 20 ते 25 मिनिटे आपण सहकुटुंब वाचन करूया. आपण सहभोजन करतो. सहकुटुंब फिरायला जातो. मग सहकुटुंब वाचन का नाही? घरामध्ये सहकुटुंब वाचन घडले. पुस्तकावर ती चर्चा झाली. टेबलावर, सोफ्यावर, खिडकीत, कपाटात मुलांना पुस्तक दिसली पाहिजे. पुस्तकं वाचणारी माणसं दिसली पाहिजे. बाजारातून, शॉपिंग होऊन आपण जशा अनेक वस्तू आणतो. खाऊचे पदार्थ आणतो. तशी पुस्तकंही घेतली पाहिजे. म्हणजे मुलावरती वाचनाचे संस्कार होतील.
परभणी जिल्हा सायकल परिक्रमा
अक्षर आनंद,वाचन संस्कार केंद्र बालकांवर वाचनाचे संस्कार करते. समाजात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कार्य करते. हे कार्य पूर्ण परभणी जिल्ह्यात पोहोचावे व जास्तीत जास्त बालकांनी, शाळांनी यात सहभागी व्हावे. तसेच आरोग्यासाठी सायकल चालवणे आवश्यक आहे. मनासाठी पुस्तक वाचन तर आरोग्यासाठी सायकलिंग हे दोन्ही संदेश पूर्ण जिल्हाभर देण्यासाठी परभणी जिल्हा परिक्रमा केली. परभणी जिंतूर सेलू पाथरी सोनपेठ गंगाखेड पूर्णा परभणी अशी तीन दिवसाची 320 किलोमीटरची सायकल परिक्रमा करून अक्षर आनंदच्या कार्यास गती दिली.
अक्षर आनंद जिल्हास्तरीय पुस्तक वाचन स्पर्धा
परभणी जिल्हा सायकल परिक्रमेला भरभरून प्रतिसाद मिळाला. समाजात वाचन संस्कृती वाढवण्याची गरज आहे हे सरांच्या लक्षात आलं. त्यासाठी आपणाला कृती कार्यक्रम हवा. म्हणून मग जिल्हास्तरीय अक्षर आनंद पुस्तक वाचन स्पर्धेची संकल्पना पुढे आली.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत शाळा बंद होत्या. मुलांनी घरी बसून पुस्तके वाचावीत. असे समाज माध्यम, वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाहन केले. जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला. प्राथमिक गट व उच्च प्राथमिक गटात स्पर्धा झाल्या. प्रत्येक तालुक्यातून दोन्ही गटात प्रथम सहा उत्कृष्ट बालवाचक निवडले. त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ व वर्षभर किशोर मासिकाचे वर्गणीदार केले. याच विद्यार्थ्यांना परत 11 पुस्तके वाचण्याचे आवाहन करून त्यातून जिल्हास्तरावर 14 उत्कृष्ट बालवाचक निवडले.
संत जनाबाई ते संत नामदेव सायकल संवाद यात्रा
‘संत विचार वाचू, विवेकी समाजात राहू’ हा संदेश घेऊन संत जनाबाईचे जन्मस्थान गंगाखेड ते संत नामदेवांचे जन्मस्थान नरसी नामदेव असा सायकल प्रवास केला. गंगाखेड परभणी बोरी, जिंतूर येलदरी सेनगाव नरसी हिंगोली असा हा मार्ग होता.180 किलोमीटरचा सायकल प्रवास झाला. प्रवासात विविध ठिकाणी भेटी देऊन त्यांनी लोकांना संत विचारांचा संदेश दिला. विवेकी विचाराने, शांततेच्या मार्गाने जीवन समृद्ध जगू शकतो. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शांततेची गरज असते. ती विवेकातून साध्य होते. नामदेवांनी कीर्तन, अभंग, गोपाळकाला अशा अनेक देणग्या मराठी माणसांना दिल्या.
अक्षर आनंद राज्यस्तरीय अग्रलेख वाचन स्पर्धा
समाजात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेले व सहज उपलब्ध असणारे वाचनाचे साधन म्हणजे वर्तमानपत्र होय. म्हणून लोकांनी किमान वर्तमानपत्र तरी वाचावे. वाचताना घटना घडामोडी सोबत संपादकीय, अग्रलेख, दीर्घ लेख,विविध सदरे वाचावीत. ज्यामुळे घटनेमागील कारण मीमांसा समजेल. या उद्देशाने अक्षर आनंद राज्यस्तरीय अग्रलेख वाचन स्पर्धा घेण्याचे निश्चित केले. त्याच्या जनजागृतीसाठी परभणी ते पुणे 504 किलोमीटरचा सायकल प्रवास केला. परभणी, सेलू, परतुर जालना, औरंगाबाद, नगर, सुपा, आपधूप, भीमा कोरेगाव, वाघोली, पुणे असा प्रवास होता. वाटेत वाचनालये, वृत्तपत्र कार्यालये, वाचक प्रेमी यांच्याशी संवाद साधला. अग्रलेख वाचून नोंदी ठेवणे. 15 जून ते 24 सप्टेंबर 2022 हा या स्पर्धेचा कालावधी आहे.
लोक विचार प्रतिष्ठान परभणी
‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हे ब्रीद घेऊन समाजातील अज्ञान अंधकार दूर करण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम कल्पकतेने राबवण्यासाठी विनोद शेडगे यांनी लोक विचार प्रतिष्ठानची स्थापना केली. या माध्यमातून विविध शैक्षणिक समाज उपयोगी कार्य घडत आहे.
– बाळासाहेब काळे, परभणी

Leave a Reply