”माझी कला गरजवंताच्या आधारासाठी”-प्रशांत जोशी
“ना नफ्यासाठी
ना स्वार्थासाठी
माझी कला गरजवंतांच्या
आधारासाठी”
या विचारातून रोज किमान एक संगीत मैफिल करायची आणि किमान एका गरजू बंधू भगिनींस आधार देताना गरिबी नष्ट होईपर्यंत हेच काम करत राहायचं हेच ध्येय.  १ हजार ४०६ दिवसात तब्बल १ हजार ७०९ वी मैफल करून  हजारो व्यक्तींना विशेषतः रूग्णांना मदतीचे हात देणारे कोल्हापूरचे प्रशांत जोशी सांगत होते.
१९८० चा सुमार. कोल्हापुरातील भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कूलमध्ये प्रशांत सहावीत होते.   त्यांचे गुरुजी प्रदीप गबाले यांच्या दिग्दर्शनाखाली ते मुख्याध्यापक संघाच्या एकांकिका स्पर्धेत सहभागी झाले आणि त्यांचं  रंगमंचावर पदार्पण झाले.१९८४ पासून प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर अभिनय…
महाराष्ट्रभर नाट्यप्रयोग झाले.  १९९३ ला एका नाट्यप्रयोगा दरम्यान अभिनयाचे प्रचंड कौतुक होत असताना, रसिक प्रेक्षकांना स्वाक्षरी देत असताना, छायाचित्र काढत असताना मात्र प्रशांत जोशी  अस्वस्थ झाले. त्यांनी  नाटकात काम करणं  थांबवलं. त्यानंतर  पुढे ५ ऑक्टोबर २००० रोजी एका प्रसंगानं  त्यांना सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली. वर्तमानपत्रात आलेल्या मदतीच्या आवाहनानुसार कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या  एका रुग्णाची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी नाट्यप्रयोग केला . २२ ऑक्टोबर २००० रोजी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रंगमंचावर रुग्णाच्या नातेवाईकांना, नाट्यप्रयोगाच्या तिकीटविक्रीतून जमा झालेली रक्कम सुपूर्त करताना, मनाला मिळालेल्या समाधानामुळे लक्षात आलं.  ज्या कारणासाठी नाटकात काम करणं थांबवलं होतं, सात वर्ष ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो ते  मिळालं.  पुन्हा नाट्यनिर्मिती सुरू केली. नाटकाचे प्रयोग करायचे आणि त्यात जमा झालेली रक्कम गरजू व्यक्तीस द्यायची असं नकळत ठरून गेलं, असं सांगताना प्रशांत जोशी यांना अश्रू अनावर झाले.
गेल्या १५ वर्षांपासून आजपर्यंत झालेले  नाट्यप्रयोग आणि संगीत मैफिली ऐच्छिक शुल्काद्वारे  होत आहेत. जमलेले सगळे ऐच्छिक शुल्क हे समाजातील गरजूंना दिले जाते.   वृद्धाश्रमातील आजी आजोबांचे मनोरंजन करण्यासाठी २००२ पासून दर शनिवार रविवारी संगीत मैफिलीचे आयोजन. हा उपक्रम पुढे सलग ५/६ वर्षे सुरू होता. सध्या मात्र महिन्यातून एक दोन वेळाच होतो.
वृद्धांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नवपालवी एकांकिका महोत्सवाचं  आयोजन. वृद्धाश्रमात जावे लागलेल्या आजी आजोबांच्या समस्येवर आधारित “मिशन मम्मी डॅडी” या नाटकाचं  लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती करून २८८ प्रयोग गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी सादर केले.  २०१० ला “मिशन मम्मी डॅडी” या नाटकाचे सलग ३६ तासात ३२ प्रयोग केले. या प्रयोगातून ऐच्छिक शुल्काद्वारे जमलेला निधी गरजूंना देण्यात आला.
बालवयातच मुलांमध्ये  पर्यावरण रक्षणाची जबाबदारी निर्माण व्हावी म्हणून गेली अकरा वर्षे पर्यावरण बालनाट्य महोत्सव प्रशांत भरवतात.
 मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या कॅन्सरग्रस्त हबीबभाई सोलापूरे या गायक कलावंतास आनंद देण्याच्या हेतूनं  २ एप्रिल २०१९ पासून रोज गायन मैफिलीचं  आयोजन केलं. केवळ ४० ते ५० दिवसांचं आयुष्य शिल्लक राहिलेल्या कॅन्सरग्रस्त हबीबभाईनी त्या पुढे सलग १६६ मैफिली केल्या आणि नंतर मात्र त्यांचं  निधन झालं.
 या मैफिली हॉटेल झोरबा इथल्या  आनंद हॉलमध्ये सलग सुरू राहिल्या. आता नाट्यगृह भाडे किंवा कुठल्याही हॉलचे  भाडे देणे  परवडत नसल्याने या मैफिली कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहत इथल्या  विकासप्रतिज्ञा स्टुडिओमध्ये  आजही अविरत सुरू असल्याचे प्रशांत जोशी यांनी सांगितले.
   प्रशांत यांनी  २० डिसेंबर २०२१ पासून २० जून २०२२ पर्यंत रोज गीत मैफिल सादर करून ऐच्छिक शुल्कातून जमलेल्या निधीद्वारे पक्के घर बांधून २१ जून २०२२ या जागतिक संगीत दिनी हे घर एचआयव्हीग्रस्त महिलेस सुपूर्त केले.
ग्रोथ हार्मोन्स डिफिशियन्सीनेग्रस्त विजय जाधव या मुलावर उपचारासाठी , श्रेया सुतार या कर्करोगग्रस्त मुलीच्या उपचारासाठी, रस्त्याकडेला बसून विविध मूर्ती तयार करणाऱ्या गंगा राठोड या महिलेच्या उपचारासाठी निधी संकलन व्हावे याकरिता लॉकडाऊन काळातदेखील मैफिली घेऊन उपचाराकरिता त्यांनी मदत केली आहे.
या व्यतिरिक्त  विविध रुग्णांना वैयकिय उपचारास, औषधास मैफिली आयोजित करून सहकार्य केलं. सदर बाजार इथल्या  कोरगावकर हायस्कूलमधील   ४०० गरजू विद्यार्थीविद्यार्थिनींचं  शैक्षणिक शुल्क भरण्याचा संकल्पही प्रशांत जोशी आणि  त्यांच्या टीमने केला आहे.  निधी संकलनासाठी  गीत मैफिली सुरू आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक  प्रकाश आमटे आणि जगभरातील सर्व रुग्णांच्या आरोग्यासाठी  सलग सात दिवस म्हणजेच सलग १६८ तास “स्नेहस्वरांचा अष्टोप्रहर सप्ताह” या संगीत मैफिलही घेऊन प्रशांत जोशी यांनी नवीन विक्रमी कामगिरी काही महिन्यांपूर्वी केली आहे.
समाजातील प्रत्येक घटकांसाठी दिवसरात्र धडपडणारे अवलिया प्रशांत जोशी अद्यापही प्रसिद्धीझोतात आले  नाहीत.  केवळ समाजहितासाठी ते दिवसरात्र काम करत आहेत.  असंख्य अदृश्य मदतीचे हात त्यांच्यासोबत आहेत. हे काम प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे.
 प्रशांत जोशी यांच्या कामगिरीला सलाम!
-काशी विनोद

Leave a Reply