माझ्या डायबेटिसची गोष्ट

14 नोव्हेंबर हा जागतिक डायबेटिस दिवस म्हणून पाळला जातो. 11 पैकी 1 भारतीयाला मधुमेहाचे औपचारिक निदान झाले आहे. त्यामुळे चीननंतर या आजाराबाबत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवाय 2020 मध्ये सात लाख भारतीयांचा मधुमेह, हायपरग्लायसेमिया, किडनी रोग किंवा मधुमेहाच्या इतर गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला. जगातील सहापैकी एक व्यक्ती म्हणजे अंदाजे 17 टक्के व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहेत. भारतात, प्रकार 1 च्या मधुमेहाचे रुग्ण पाश्चात्य देशांपेक्षा कमी सापडतात. तर निदान झालेल्या सुमारे 90 ते 95 टक्के भारतीयांना प्रकार 2 चा मधुमेह होता. भारतातील फक्त एक तृतीयांश टाईप 2 मधुमेहींचा बॉडी मास इंडेक्स 25 च्या वर आहे. मला मधुमेहाचं निदान झालं आणि या आजाराची अधिकाधिक माहिती करून घेण्यासाठीच मग असं सगळं वाचन सुरू झालं. मला मधुमेह झाला आणि गेल्या दोन वर्षात या आजारातून मुक्त होण्यासाठी मी कोणते प्रयत्न केले, करते आहे आणि त्यात किती यश आलं याची ही छोटीशी गोष्ट. यातून झाला तर कुणाला त्याचा उपयोगच होवो हीच इच्छा.

2020 चा डिसेंबर. कोविडमुळे झालेलं लॉकडाऊन बऱ्यापैकी शिथील झालेलं. पण आपल्या एकूणच जगण्यावर आलेले निर्बंध तसेच होते. अशा काळात कुणी कुठलंही चेकअप करायला किंवा बारीक सारीक गोष्टींसाठी हॉस्पीटलला जाणं टाळत होतं. तेव्हाच माझ्या नवऱ्याला ऑफिसकडून असणाऱ्या रेग्युलर चेकअपची डेट मिळाली होती. तसं ते त्याला दरवर्षी कंपल्सरी होतंच. यावर्षी असं कोरोनात मुद्दाम कशाला हॉस्पीटलची वारी करा म्हणून जावं की न जावं असं त्याचं चाललं होतं. नंतर मग मला म्हणाला की चल, तुझीही चाळीशी उलटलीये तर तुझंही चेकअप करून घेऊ. हो नाही करत दुसऱ्या दिवशी मीही गेले. संध्याकाळीच बरेचसे रिपोर्ट आले. बाकी सगळं तसं ठीक होतंच. पण मुख्य रिपोर्ट होता तो शुगरचा, फास्टिंग, पीपीचा. दोन्ही शुगर थेट डायबेटिसचं निदान करणाऱ्या होत्या. मग डायबेटिससाठी डॉक्टर शोधणं आलं. डॉक्टरांचा पहिलाच प्रश्न होता, कधीपासून आहे डायबेटिस. म्हटलं, सहजच चेकअप केलं त्यात हे आलं आहे. आणि खरोखर त्याआधी मला कुठलाच त्रास होत नव्हता. म्हणजे टाईप 2 डायबेटिसचंच हे विशेष लक्षण म्हणावं. म्हणजे त्यावेळी आलेली शुगर होती ती 237. तर डॉक्टरांनी लगेचच HBA1C ही टेस्ट करून घेतली. त्याचा निकाल आला तो 6.9. म्हणजे डायबेटिक असल्याचंच ते निदान. आपल्या रक्तात मागील सहा महिन्यात असलेल्या साखरेचं प्रमाण या टेस्टमधून कळतं. डायबेटिस नसेल तर 5 किंवा 5.2 पर्यंत हा रेषो येतो. तेव्हा डॉक्टरांनी लगेच गोळी सुरू केली नाही. ते म्हणाले, पहिले सहा महिने गोळी सुरू करावी लागेलच असं नाही. मग त्यांनी रोज पाच कि.मी चालण्याचा व्यायाम सांगितला. सोबतच आहारात साखर पूर्ण बंद, बटाटा, भात, साबुदाणा बाकी जंक फूड असं सगळ्याचं प्रमाण अत्यल्प किंवा नाहीच असं सांगितलं. फळातही केळं, सीताफळ, चिक्कू, आंबा अशी फळं जवळपास बंदच करायला सांगितली. माझं वजन तेव्हा जवळपास दहा किलोने वाढलेलं होतं. तेही त्यांनी कमी करायला सांगितलं. साधारण 11 किंवा 12 डिसेंबर 2020 ला मी डॉक्टरांकडे पहिल्यांदा गेले असेन. त्यानंतर थेट 29 डिसेंबरला गेले. तेव्हाही जेवणानंतरची माझी शुगर 200 च्या घरात होतीच. त्यावेळी मात्र त्यांनी मला रात्रीच्या जेवणानंतरची 1000मिलीची ग्लायकोमेट गोळी सुरू केली. व्हायचं काय की दिवसभरात कधीही शुगर तपासली की ती कमी किंवा नॉर्मल यायची. पण जेवणानंतरची हमखास 200च्या घरात असायची. अशा तऱ्हेने गोळी सुरू झाल्यावर मी खरीखुरी जागी झाले. मला वाटायला लागलं की वयाच्या चाळीशीतच मला गोळ्या घेत आजारावर नियंत्रण मिळवायचं नाहीये. त्यातून गोळ्यांची साईड इफेक्ट ऐकून, वाचून घाबरवत होते. साठीनंतर मला गोळ्या घ्यायला लागल्या तरी चालेल. पण आत्तापासून नाही. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने मी डायबेटिसपासून मुक्ती मिळवायच्या प्रयत्नांना सुरूवात केली. आता 2022 चा डिसेंबर जवळ येतोय तर या दोन वर्षात मी काय केलं, गोळी बंद झाली का? तिची पॉवर कमी झाली का आणि मुख्य म्हणजे HBA1C चा आत्ताचा निकाल काय सांगतो ते महत्त्वाचं ठरतं.

माझ्या आजीला, आत्याला, काकाला शुगर होतीच त्यामुळे सुरूवातीला तरी मला डायबेटिस निघाल्याचं फार काही वाटलं नाही. त्यातून माझी लाईफस्टाईल पण शुगरला आमंत्रण देणारीच होती. म्हणजे धाकट्या मुलीच्या जन्मानंतर माझं योगा, चालणं असं सगळं बंद झालं होतं. घरात जास्त अडकून पडले होते. मुलींना ग्राऊंडला सोडा, वेळेत आणायला जा, भाजी, बाजारहाट असं सगळं करता करता मी चालण्याऐवजी गाडीचा जास्त वापर करायला लागले होते. म्हणजे घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर मिळणारी भाजी, सामान घ्यायलाही मला गाडीचीच गरज लागत होती. शिवाय माझं कामही बैठं. त्यामुळे अशा सेडेनटरी लाईफस्टाईल असणाऱ्या माणसाकडे कधी ना कधी तरी हा आजार येणार होताच. डायबेटिससाठी माझं वाढलेलं वजन आणि माझी बैठी जीवनशैली कारणीभूत होतीच.

माझ्या मोठ्या दोन बहि‍णींनी गेली काही वर्ष साखर सोडली होती. शिवाय त्या रनिंग, सायकलिंग करत होत्या. माझ्याहून सात- आठ वर्षांनी मोठ्या असूनही त्यांच्याकडे हे डायबेटिस प्रकरण फिरकलं नव्हतं. कारण अर्थातच सोपं होतं. त्या अक्टिव्ह होत्या. योग्य आहार, व्यायाम करून त्यांनी स्वतःला फिट ठेवलं होतं. रोजच्या व्यायामाने त्यांच्या शरीरात बाकी कुठल्याही आजाराने घर केलं नव्हतं. त्यामुळे कोविडच्या कचाट्यातून त्या सहीसलामत सुटल्या. नंतर मोठ्या दोघींनाही माझं शुगरचं सांगितलं. मग त्यांनी जसाकाही माझा ताबाच घेतला. मी रोज चालायला जातेय का याची चौकशी सुरू झाली. एका बहिणीने मला मोबाईलवर स्ट्रावा नावाचं अप डाऊनलोड करायला सांगितलं. रोज चालायला जाताना त्या अपवर रेकॉर्ड करायचं. म्हणजे नंतर हे त्यांनाही दिसायचं. मग एखादा दिवस माझं चालण्याचं रेकॉर्ड दिसलं नाही की लगेचच फोन यायचा. आज चालायला का नाही गेली, हा प्रश्न असायचा. मग सकाळी उठायचा कंटाळा आला तरी नवऱ्याचं हाकलणं आणि नंतर या दोघी विचारतील आणि रागावतील या भीतीनेही कित्येकदा मी चालायला जायचे. मुळात व्यायामाच्या बाबत आळशी असणारी मी या तिघांमुळे थोडीतरी सक्रिय होऊ लागले होते. चालणं आवडायला लागलं आणि रोजचं पाच किमी चालणं होऊ लागलं. सुरूवातीला होणारी दमणूक कमी व्हायला लागली आणि पाचाचे कधी सहा होऊ लागले. नंतर नंतर संध्याकाळीही पाच किमी चालायला सुरूवात केली.

चालणं आणि आहारावर बऱ्यापैकी ताबा मी मिळवला होता. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वजन काटाही त्याचे चांगले रिझल्ट दाखवत होता. जानेवारी ते जुलै-ऑगस्ट 2021 या काळात मी जवळपास पाच ते सहा किलो वजन घटवलं. यातही सतत बहि‍णींचा ससेमिरा मागे होताच. वजनावरून त्या बोलायच्या तेव्हा कधी कधी वाटायचं की किती बॉडी शेमिंग करताहेत या. पण मग लक्षात यायचं की माझ्याच सख्ख्या मोठ्या बहिणी आहेत. माझ्या वाढलेल्या वजनामुळे आणि मला होत असलेले बारीकसारीक त्रास त्यांच्या पटकन लक्षात येत आहेत, जाणवताहेत. त्यामुळे त्या बोलल्या तरी मीही प्रयत्न करायला हवेत. एका बहिणीच्या नातेवाईकांनाही डायबेटिस होता. ते नातेवाईक 33 वर्षांचे असतानाच त्यांना शुगर डिटेक्ट झाली होती. आणि त्यानंतर जवळपास 15-17 वर्षांनी त्यांनी एका डॉक्टरांचे नियमित उपचार, आहार, व्यायाम यांनी शुगर आटोक्यात आणली होती. आणि आता त्यांच्या शुगरच्या गोळ्यांची मात्रा कमी झाली होती. मग बहिणीने मला त्या डॉक्टरांकडे जायचं सुचवलं. पण मला अगदी टोकाचं डाएट करून म्हणजे दूध बंद, व्हेगन, केटो असे कुठलेही प्रकार करून शरीराचं कुठलंही नुकसान न करता डाएट हवं होतं. त्यामुळे या डॉक्टरांकडे जाणं मी टाळलं.

दोन्ही वेळचं चालणं, थोडफार डाएट कंट्रोल यामुळे ऑगस्ट 2021 पर्यंत वजन 66 किलो आणि HBA1C (रक्तातली गेल्या ३ महिन्यातली साखरेची सरासरी पातळी मोजणारी रक्तचाचणी, याची नॉर्मल पातळी ५. ७% च्या खाली असावी लागते.) 6.2 वर आलं होतं. म्हणजेच डायबेटिकवरून प्री डायबेटिक लेव्हल मी गाठली होती. इथूनच पुढे खरी परीक्षा होती. कारण सुरूवातीचं 2-3 किलो वजन कमी झालं होतं ते फक्त आणि फक्त साखर पूर्णपणे बंद केल्यानेच झालं होतं. नंतर जोडीला चालण्याचा व्यायाम आणि आहारावरचे निर्बंध होते. HBA1C 6.2 ही लेव्हल आता आणखी कमी करायची होती आणि माझ्या उंचीनुसार अजून किमान 4-5 किलो कमी करायला हवं होतं. इथंपर्यंत मजल गाठल्यावर मला पुढं काय करायचं ते सुचत नव्हतं. म्हणजे आहार, व्यायाम आहे तोच सुरू ठेवावा असं वाटत होतं. पण त्यातून आता फार काही घडत नाहीये असंही वाटू लागलं होतं.

माझा चालण्याचा व्यायाम व्यवस्थित सुरू होता. उलट सकाळ संध्याकाळचं मिळून माझं चालणं आता 10 किमी किंवा त्याहून अधिक होऊ लागलं होतं. भाजी, बाजारहाट या गोष्टींसाठी आता मी गाडीचा वापर जवळजवळ थांबवला होता. शक्य तितक्या वेळेला चालत जायचं सुरू केलं होतं. बऱ्याच वेगवेगळ्या डॉक्टरांची डायबेटिसवरची व्याख्यानं, पुस्तकं वाचणं सुरू होतं. त्यातच एक थिएरी वाचनात आली होती ती म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग. म्हणजे एकदा जेवल्यानंतर ठराविक काळ काही खायचं नाही. अशावेळी भूक लागली की काही डॉक्टर कुठले ज्यूस वगैरे घ्यायला सांगतात. अर्थात हे वाचूनच मला हे शक्य नाही असं लक्षात आलं होतं. त्यामुळे मी त्यातल्या त्यात मधला मार्ग स्वीकारला. एकदा दुपारी जेवलं की रात्रीच्या जेवणापर्यंत काही खायचं नाही. हे सुरू केल्यावर कळलं की कित्येकदा भूक नसतानाच घरातल्या दुसऱ्याने काहीबाही खाल्लं की टेम्प्टिंग होऊन आपण एखादी गोष्ट खातो. मग खाण्यावर ताबा राहत नाही. अजून थोडंसं खाल्ल्याने काय होतंय असं वाटून रोजचं काहीतरी खाणं होतं. हा ताबा मिळवणं खरंतर अशक्य होतं आणि अजूनही आहे. पण हे बऱ्याच प्रमाणात मी साध्य करू शकले आहे.
इथं एक लिहायचं राहूनच गेलं. सुरूवातीपासून ज्या डॉक्टरांकडे जायचे तेव्हाही जेवल्यानंतर साधारण दोन तासांनी शुगर चेक केली जायची. तेव्हा कायम ती 200 च्या वर असायची. याचा अर्थ माझं जेवण काहीतरी चुकतंय असं मला वाटत होतं. पण डॉक्टर मात्र काहीच सुचवायचे नाहीत. त्यांना विचारलं तरी काही उत्तर नसायचं. ते म्हणायचे, नेहमीचं जेवा आणि गोळी घ्या. फक्त गोळ्या घेऊन मला शुगरवरचा कंट्रोल नको होता. डायबेटिस हा जीवनशैलीचा आजार असेल तर त्यात काहीतरी बदलायला हवं असं वाटत असायचं. पण, इथं माझया डॉक्टरांची काहीच मदत होत नव्हती. काहीतरी चुकतंय पण काय हे कळत नव्हतं. जेवण अर्थातच नेहमीसारखं पोळी-भाजी, वरण-भात असंच असायचं.
एकदा बहिणीने तिच्या डायबेटिसवाल्या नातेवाईकांचा आहार, जेवणातले पदार्थ सांगितले. त्या डॉक्टरांचं एक लेक्चरही तेव्हा मी अटेंड केलं. त्यांनी सांगितल्यानुसार मग जेवणात बदल केले. त्यांच्यानुसार जेवणात एक भाग कार्बोहायड्रेटसचा पण प्रमाण कमी. दोन धान्य एकावेळी खायची नाहीत. म्हणजे गहू आणि तांदूळ दोन्ही एकाचवेळी नसावं. पोळी खाल्ली तर शुगर वाढते की भाकरी असं चेक करत माझी गाडी भाकरीवर स्थिरावली. मग एक भाकरी, वाटीभर भाजी, आमटी आणि तेवढीच कोशिंबीर असं जेवण मला सूट झालं. हे सगळं खाऊन अजून भूक असेल तर जेवढी भाकरी घेऊ त्याचप्रमाणात बाकीचंही घ्यायचं. यामुळे काय झालं की आहारातले सगळे घटक मोजून मापून पण योग्य प्रमाणात पोटात जायला लागले. जेवल्यानंतर अर्थातच पावणेदोन तासांनी शुगर मोजायचे. ती थेट 200 वर जायची ती 182, 170 असं करत हळूहळू 160 ते 145 च्या घरात येऊ लागली. जेवणानंतर किमान 10 मिनिटांनी थोडं चालायचं. लगेचच कामाला बसायचं नाही. हेही सुरू केलं.
दुसरं एक ऐकलं होतं की जेवणात गोड खाल्लं किंवा एकूणच जेवल्यानंतर काहीवेळा जिने चढउतार केल्याने शुगर वाढत नाही. हे ऐकल्यावर मला करून बघावं वाटलंच. कारण तोवर माझी शुगर ही कायम जेवणानंतरच जास्त असायची. वर लिहिलेला आहार घ्यायला सुरूवात केल्यानंतर शुगर थोडी आटोक्यात आली तर कधीतरी ती जास्त असायचीच. मग जिने चढउतार करायचा प्रयोग करून बघायचं ठरवलं. एकदा असंच जेवण झाल्यावर पावणेदोन तासांनी शुगर चेक केली. मस्त 179 चा आकडा मीटरवर चमकत होता. मग लगेचच 2 वेळा सात मजले चढले उतरले, परत शुगर चेक केली तर ती अक्षरशः नॉर्मलवर आली होती.
काहीवेळा शुगर खूपच लो झाली तर चक्कर येणे, अस्वस्थ वाटायला लागणे हे सगळं सुरू होतं. हे सगळं त्या त्या वेळी मला होतंच होतं. यावर उपाय अर्थात एकच होता. शुगर अशी वाढू न देणं हाच. आणि अर्थातच तो सगळ्यात कठीण भाग आहे. कारण त्यासाठी खाण्यावर प्रचंड कंट्रोल आणि नक्की काय खाल्लं तर चालेल याचा सतत शोध घेत राहायचं.
आधी लिहिलं तसं खाण्याचा पोर्शन आणि काय खावं हे तर कळलं होतं पण आता प्रश्न होता, की सकाळी चालून आलं की आणि दुपारी 4-5 वाजता कडकडून भूक लागायची तेव्हा असं काहीतरी अबरचबर खाल्लं तर वजन तर वाढायचंच शिवाय शुगरवरही त्याचा परिणाम व्हायचा. मग दिवसातून किती वेळा खावं, काय खावं, किती प्रमाणात यासाठी डायटिशियनचा शोध सुरू केला. अर्चना रायरीकर यांचं नाव कळलं. त्यांनी सकाळी उठल्याउठल्या काय खावं, प्यावं, जेवणात काय हवं. डायबेटिसफ्रेंडली पदार्थ कोणते, त्याच्या रेसिपीज असा एक चार्टच करून दिला. त्यात सकाळी घ्यायच्या स्मूदीचा उल्लेख होता. स्मूदी म्हणजे कच्ची फळे आणि भाज्यांचा रस. बरेचजण या प्रकाराला खरंतर नावं ठेवतात किंवा त्याचा उपयोग होत नाही म्हणतात. पण मला मात्र हे प्रकरण फारच आवडलं. त्यांनी स्मूदीचे वेगवेगळे प्रकार सांगितले होते तरी मला आपली पालक, कोथिंबीर, पुदिना आणि केळं या मिश्रणाचीच स्मूदी बरी वाटायची. कधीतरी पालकाच्या ऐवजी राजगिरा, चवळई, हिरवा माठ अशा भाज्या मी वापरायचे.
डाएट म्हणजे मी फार काहीतरी वेगळं करते असं कित्येकांना वाटायचं पण खरंतर सगळे पदार्थ रोजच्या जेवणातले होते. कधीतरी त्यांनी सांगितलेली तृणधान्याची पिठं, नाचणी, ज्वारीच्या कण्यांचा उपमा असे पदार्थ खाल्लेही. कधीतरी सोया मिल्कही घेतलं. पण हे सगळं मला फारसं आवडत नाही आणि रोजचं दोन वेळचं नीट जेवण घेतलं की इतर वेळी भूकही लागत नाही हे लक्षात आलं. त्यामुळे हळूहळू हे सगळं कमी होतं नंतर बंदच झालं. जेवणाच्या वेळा आणि प्रत्येक पदार्थाचा पोर्शन मात्र अजूनही ठरवल्यानुसारच घेते.
डाएट घेतलं तेव्हाच रोजच्या चालण्याच्या व्यायामात स्ट्रेंथ ट्रेनिंगची भर पडली होती. माझी बहिण एका ग्रुपसोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग, रनिंग आणि सायकलिंग करत होतीच. तिनेच #PRS म्हणजेच पुणे साऊथ रनिंग या ग्रुपचं नाव सुचवलं. तिथं सगळ्यांचं ट्रेनिंग घेणाऱ्या पद्मराज सरांना फोन केला आणि लगेच दुसऱ्याच दिवशी पहाटे ट्रेनिंगला पोहोचले. ट्रेनिंगचा माझा पहिलाच दिवस असला तरी तिथला तो महिन्याचा शेवटचा शुक्रवार होता. त्यामुळे त्या दिवशी तिथला 108 सूर्यनमस्काराचा तो दिवस होता. अगदी सगळे नाही तरी किमान 70-80 सूर्यनमस्कार मी घालू शकले. पुढचे दोन दिवस मस्तपैकी सगळं अंग, मसल्स दुखवून घेतले आणि शनिवारची सुट्टी घेऊन रविवारी परत ग्रुपसोबत पुढच्या अक्टिव्हिजसाठी जाऊ लागले. हा ग्रुप नक्की काय काय करतो याची एक एक चुणूक हळूहळू बघायला मिळाली.
सरांना फोन केला तेव्हा त्यांनी विचारलं होतं की रनिंग पण करणार आहे की फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंगला येणार? तेव्हा मी जाऊन बघू तरी जे जमेल ते करून बघू अशा विचाराने सांगितलं की रनिंगही बघेन करून. या ग्रुपचं विशेष म्हणजे कुणी कुणीला उगीच शिकवायला जात नाही, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गतीने व्यायाम करू देतात. उगीचच टीका नसते किंवा त्यावर गॉसिपिंग नसतं. त्यामुळे मला हा ग्रुप खूपच आवडला. नवीन नवीन रनिंगला सुरूवात करतानाही सरांनी रस्त्यावरचे विजेचे दोन खांब पळायचं, दोन खांब चालायचं असं सोपं गणित सांगितलं. त्यामुळे पळताना आपसूकच स्वतःचा अंदाज घेता यायचा. सुरूवातीला एक खांब ते दुसरा खांब पळणंही कठिण वाटायचं. हळूहळू ते जमायला लागलं.
स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये माऊंटन क्लाइंबर्स, स्क्वॅट्स, सुमो स्क्वॅट्स, ब्रिज, रशियन ट्विस्ट्स, साईड प्लॅन्क, रिव्हर्स प्लॅन्क, प्लॅन्क, फुल सिट अप्स, हाफ सिट अप्स हे आणि असे आणखीही बरेच व्यायाम प्रकार असतात. हे सगळे अजूनही 100टक्के जमतात असं नाही पण आता प्रयत्न सुरू ठेवावेच लागतात. हा व्यायाम आणि थोडं डाएट यानं एक मात्र नक्की झालं की वजन कमी होताना मसल लॉस झाला नाही. त्यामुळे जेव्हा डाएटिशियनकडे पुढच्या व्हिजिटसाठी जायचे तेव्हा आपण योग्य पद्धतीने वजन कमी करतो आहोत याची खात्री पटायची. जानेवारी 2021 पासून पुढे वर्षभर दर महिन्याला साधारण एक ते दोन किलो या प्रमाणात वजन कमी करून मी उंचीनुसार वजनाच्या रेषोत परत आले. मागच्या वर्षीच्या ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मी हा ग्रुप जॉईन केला. तेव्हा या ग्रुपच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून बाकी सदस्य काय काय करतात, कुठल्या मॅरेथॉन आणि इतरही बऱ्याच अक्टिव्हिटिज कळू लागल्या. गेली काही वर्ष व्यायाम आणि योग्य आहार-विहार या सगळ्यातून बाजूला पडलेली मी परत योग्य जगाकडे वळले. पुण्याच्या आसपास असलेले हत्ती डोंगर, खंडोबा डोंगर हे तसे साधे साधे ट्रेकही करण्याची भीती वाटणारी मी ते करू शकले. नंतर एक दिवस कमळगडाचा ट्रेकही करू शकले ते या स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे शिवाय ग्रुपमधल्या सदस्यांच्या अक्टिव्हिटी वाचून त्यातून प्रेरित होऊन. रनिंगची मजल अजूनतरी 10किमीच्या पुढे गेली नाहीये. पण तीही जाईल नक्कीच असा आता विश्वास वाटतो.आता गेलं वर्षभर पूर्वीइतकी रोजच्या रोज शुगर चेक करत नसले तरी अचानक लो होणारी शुगर हा प्रकार बऱ्यापैकी कमी झाला आहे. अर्थात आठवड्यातून एक ते दोन वेळा शुगर मोजत राहून त्यावर लक्ष ठेवावं लागतंच.
या सगळ्यात सतत डाएट, व्यायाम आणि ठराविक जीवनशैली अवलंबणं अर्थातच सहज शक्य नसतं. त्यामुळे कधीकधी आवडता पदार्थ मनापासून खाल्ला जातो त्याविषयी रिग्रेट्स् न बाळगता थोडा जास्त व्यायाम करणं हातात असतं. कधीकधी छोटीछोटी आजारपणं, इन्ज्युरीज मधे येतात आणि गाडी रूळावरून घसरते. कधी कधी आराम 8-10 दिवसांवरून थेट 15 दिवसांपर्यंत जातो. तेव्हा पहाटे मन आणि शरीर या दोघांनाही अंथरूणातून अक्षरशः पकडून, ओढून काढून व्यायामासाठी तयार करावं लागतं.
शुगरची गोळी घ्यावी लागू नये म्हणून हे सगळं मी सुरू केलं त्याला आता डिसेंबरमध्ये 2 वर्ष होतील. म्हणून लगेचच शुगरची गोळी बंद झाली का? तर नाही. आजही शुगरची एक गोळी सुरू आहे. आणि ती बंद होण्यासाठी मला अजून थोडे प्रयत्न करावे लागतीलच. आज HBA1C चा रिझल्ट 6.9 म्हणजेच डायबेटिक वरून 5.8 म्हणजेच प्री-डायबेटिकवर आला आहे हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.
  • वर्षा जोशी – आठवले

Leave a Reply