माझ्या बाळाचा जन्म झाला आणि सासू सासरे जवळ असल्याचे फायदे जाणवायला लागले. सार्थक माझा मोठा मुलगा, आमच्या कुटुंबांमधलं पहिलं बाळ, सासू सासऱ्यांचा पहिला नातू, त्यामुळे लाडाचा. तो फक्त माझ्याकडे दूध पिण्यासाठीच येत असे, बाकी पूर्ण वेळ तो सासरे आणि सासू यांच्याकडेच असायचा. त्याला बाल दमा होता, दर आठ दिवसांनी तो आजारी पडायचा. माझे सासरे त्याला रात्र रात्र मांडीवर घेऊन असायचे, मला सांगायचे, ‘तू झोप, मी सांभाळतो.’ किती मोठा आधार वाटायचा तेव्हा!
सार्थकनंतर जवळ जवळ सात वर्षाने आमच्या घरात दुसरं बाळ आलं, ते म्हणजे माझी पुतणी निहरिका… मग दीड वर्षाच्या अंतराने मला मुलगी झाली नीरजा, मग दीड वर्षाच्या अंतराने पुतण्या, सात्विक.
घर अगदी गोकुळ झालं… प्रत्येक बाळ वेगवेगळ्या तऱ्हेचं.
सार्थक सगळ्यात मोठा, पहिलं बाळ, म्हणून तो आजीआजोबांसोबत, काकाचा पण खूप लाडका, मग काकू आली, नवीन नवीन काकू त्याला कधी कधी जेवण भरवायची, त्याच्या सोबत खेळायची.
जावेच्या दुसऱ्या बाळंतपणामध्ये, तिच्या मोठ्या मुलीची, निहारिकाची शाळा बदलली, अभ्यास वाढला, तेव्हा तिचा अभ्यास मी करून घेतला.

सार्थक आणि सात्विक मध्ये दहा वर्षाच अंतर आहे, सात्विकसाठी दादा म्हणजे हिरो. दादा म्हणेल ती पूर्व दिशा.
मुलं आता मोठी होत आहेत. आजीची मुलींकडून वेगळी अपेक्षा असते. घर कामात मुलींनी मदत केली पाहिजे वगैरे आजी सांगत असते. निहारिका एका कानाने ऐकते, दुसऱ्या कानाने सोडून देते, पण नीरजा लगेच बंड पुकारते, आजीशी वाद घालते, ‘मुलींनीच का म्हणून कामं करायची, घर सगळ्यांचं आहे, घरातली कामं सगळ्यांनीच केली पाहिजेत. तू बॉईजना काही काम सांगत नाही.” यावर आजी निशब्द होऊन जाते, कौतुकाने ऐकत राहते.
आजोबांचा आग्रह की सगळ्या नातवंडांनी त्यांच्या सोबत जेवायला बसायचं. सगळे आवडीने एकत्र जेवायला बसतात. त्यामुळे मुलांना जी भाजी केली आहे ती, सॅलड, सिझनल फळं असं सगळं खायची सवय लागली.
मी आणि जाऊ आपापल्या कामाने दिवसभर बाहेर असतो, मुलं जास्तीतजास्त वेळ आजीआजोबांसोबत असतात. त्यांचं जेवण, दूध सगळं आजी आजोबा करतात.
सार्थक तर 12 वीला जाई पर्यंत आजीआजोबांच्या खोलीत झोपायचा. घरात जागा कमी म्हणून नाही तर त्यांच्यापाशी त्याला आवडतं म्हणून. एकदा तो आजोबांना म्हणाला, आता आपला बेड ह्या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत करावा लागेल, का तर आता आजोबांची सगळी नातवंडं आजी आजोबांपाशी झोपणार तर पलंग पण मोठा पाहिजे न…
नीरजा, निहारिका सव्वा वर्षाच्या अंतराने पाठोपाठच्या दोघींचं खूप सुत गुत, खूप काही सिक्रेट्स. घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला मुलींकडून एक कार्ड असतं, त्यात नीरजाचं स्केच असतं आणि निहारिकाचा मजकूर असतो.
लहानपणापासून घरात एकत्र वाढल्याने कोणत्याच मुलाचं कधी घरी आई वडील, दोन चार दिवस नाहीत म्हणून अडलं नाही.
घरी केलेला, आणलेला एखादा पदार्थ सगळ्यांनी वाटून खायचा, ही आजीची शिकवण मुलांमध्ये रुजली. शेअरिंग, एकमेकांची काळजी, एकमेकांना मदत, हे सगळं मुलं आपसूकच शिकली. एकत्र कुटुंब पद्धती हीच एक मोठी संस्था असल्याने आमच्या मुलांना कधी सुट्ट्यांमध्ये वेळ जावा म्हणून कोणता क्लास लावायची वेळ आली नाही. काही शिकण्यासाठी क्लास लावला ती गोष्ट वेगळी. संस्कार हे घरातल्या वाडीलधाऱ्यांकडून आपोआप होत गेले, त्यासाठी खास संस्कार वर्गाची गरज भासली नाही. नामशेष होत चालली एकत्र कुटुंब पद्धती ही मुलांच्या निकोप मानसिक वाढीसाठी अत्यंत गरजेची आहे हा माझा अनुभव.
– ऍड. मयुरी देशमुख (चपळगावकर)
Related