नव्यानं जन्माला आलेल्या बाळासाठी आईचं दूध म्हणजे पूर्णान्न. बाळाला रोगप्रतिकारशक्ती बहाल करण्यात, विशेष म्हणजे आईशी नातं आणखी दृढ करण्यात स्तनपान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. बाळाच्याच नव्हे तर आईच्या आरोग्यासाठीही याचे अनेक सकारात्मक परिणाम दिसतात.
कोरोना महामारीच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेसह सर्वांनीच बाळांना स्तनपानापासून वंचित न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. सर्व प्रकारचे प्रतिबंधात्मक नियम पाळा, मात्र बाळाला स्तनपान द्याच, असा आग्रह या तज्ज्ञ आणि संघटनांनी केला आहे. ज्या बाळाची आई कोरोना काळात दगावली आहे त्या बाळालाही आईचं दूध मिळावे यासाठी मिल्क बँक यंत्रणेनं पुढाकार घेतला.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मिल्क बँकेच्या डॉ. विशाखा हरीदास सांगतात, महामारी असो किंवा नसो, मिल्क बँकेसाठी दूध संकलन करणं, त्यावरील प्रक्रिया , त्याची साठवणूक या बाबी नेहमीच अत्यंत जबाबदारीच्या. ज्या आईची प्रसुती झाली असेल तिला बाळाला पोटभर पाजल्यानंतरही पुरेसं दूध येत असेल, ते दूध दान करण्याची तिची इच्छा असेल तर आम्ही त्यांच्या आवश्यक चाचण्या करतो. दूध कसं संकलित करावं, कसं आणि किती तापमानाला ते साठवावं याची माहिती देतो. त्यानंतर आमच्या मिल्क बँकेचे कर्मचारी त्यांच्याकडून दुधाच्या बाटल्या ताब्यात घेतात आणि मिल्क बँकेकडे जमा करतात. कोरोना काळात रुग्णालयांमध्ये कोरोना व्यतिरिक्त रुग्ण भरती होण्याचे प्रमाण कमी झाले. स्वाभाविक प्रसुतीसाठी दाखल होणाऱया महिलांचं प्रमाणही कमी झालं. मिल्क बँकेत येणाऱ्या दुधाचं प्रमाणही त्यामुळे काहीसं घटलं. कोरोनापूर्वी महिन्याला साधारण ६० लिटर दूधाचं संकलन होत असे असं मानलं तर त्यात १०-२० टक्के घट झाली. बाहेर पडण्यावर असलेले निर्बंध, बाहेरील माणसे घरी येण्यावरही असलेले निर्बंध यांमुळेही हा फरक पडला. काही महिलांनी घरच्या घरी दूध साठवून ते एकत्र, एकाच वेळी जास्त प्रमाणात मिल्क बँकेत जमा करण्यासही प्राधान्य दिलं. आलेलं दूध खरोखरीच गरज असलेल्या बाळांनाच देण्याचा निर्णय मात्र आम्हाला कटाक्षाने घ्यावा लागला. काही वेळा मृत्यू किंवा आरोग्याच्या इतर कारणामुळे आईचे दूध बाळाला मिळणं शक्य नसेल तर अशा वेळी कुटूंबाकडून मिल्क बँकेला संपर्क साधला जातो. मात्र अशा वेळी बाळाचा जन्म पूर्ण नऊ महिने भरल्यानंतर झाला असेल, त्याची प्रकृती चांगली असेल तर नाईलाजास्तव अशा बाळाला दूध न देण्याचा निर्णय घ्यावा लागतो, कारण अशा बाळापेक्षा गरजू म्हणजे प्रिमॅच्युअर बाळाला आईच्या दूधाची गरज जास्त असते, असेही डॉ. हरीदास स्पष्ट करतात.
स्तनपान सल्लागार रश्मी पौडवाल सांगतात, दूध दान करण्याबाबत शहरीभागात अत्यंत सकारात्मक प्रबोधन झालं आहे. त्यामुळे अनेक नवीन माता दूध दानासाठी पुढाकार घेतात. बाळाला पाजणं असेल किंवा मिल्क बँकेसाठी दूधाचं संकलन, स्तनदा आईने शांत, समाधानी आणि आनंदी असणं अत्यंत महत्वाचं आहे. आई ताणतणावाखाली असेल तर स्तनपानासाठी आवश्यक हार्मोन्स स्त्रवण्यात अडचणी येतात. त्यामुळे स्तनदा आईच्या कुटूंबाने तिची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोना काळात अनेक महिलांनी मिल्क बँकेची मदत न घेता परस्पर दूध दान करण्याचा निर्णय घेतला आणि गरजू बाळाला पाजले किंवा संकलित करून अशा बाळापर्यंत दूध पोहोचवलं. आईचं आरोग्य उत्तम असेल तर अशा दूधातून बाळाला कोणताही संसर्ग होण्याची शक्यता नसतेच… तरी शक्य असेल तिथे दूध दान करण्यापूर्वी स्तनपान सल्लागार (लॅक्टेशन कन्सल्टंट) किंवा डॉक्टर यांच्याशी चर्चा करणं योग्य, असं रश्मी स्पष्ट करतात.
– के. भक्ती, पुणे
Related