नाशिक जिल्ह्यातला बोरीपाडा. हरसूलपासून १२ किमीवरचं. बाभळाच्या आणि मोहाच्या वृक्षराजीत वसलेलं बोरीपाडा. जेमतेम ४५० लोकवस्ती असलेलं छोटं आदिवासी गाव. गावाला रोजगाराचं साधन नाही. त्यामुळे गावातील पुरुषांसोबत महिला देखील रोजगारासाठी नाशिक किंवा गिरणारे या ठिकाणी येतात व शहराच्या नाक्यावर आणि गिरणारेच्या चौफुलीवर उभं राहून मिळेल ते काम करण्यास तयार असतात.
कोविडमुळे लॉकडाऊन होण्याआधी बोरीपाडात हीच परिस्थिती होती. नंतर अभिव्यक्ती मिडीया फॉर डेव्हलपमेंट संस्थेने ऑक्टोबर२०२० मध्ये बोरीपाड्यात सर्व्हेक्षण केलं. सर्वेतून लक्षात आलं होतं की बोरीपाड्यात मोहाची फुलं बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहेत. याचाच उपयोग करून घेत कायमस्वरूपी रोजगार मिळावा यासाठी संस्थेने प्रयत्न सुरू केले. महिलांना ग्रामीण आर्थिक समृद्धी विकास या प्रकल्पाची माहिती देण्यात आली. त्यातूनच महिलांनी मोहाच्या फुलापासून फरशी स्वच्छ करण्याचे द्रव्य म्हणजेच फिनाईल तयार केले.
याविषयी अभिव्यक्ती मिडीया फॉर डेव्हलपमेंटचे भिला ठाकरे म्हणाले, “बोरीपाडा येथील सरपंच अनुसया पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गावाचं सर्व्हेक्षण करण्यात आले. ग्राम पंचायतीमध्ये विषय मांडला आणि गावात फिनाईल उद्योगासाठी जागा मंजूर करून घेतली. सर्व महिलांना एकत्रित करून त्यांनी ग्राम पंचायतीकडून ना हरकतचा दाखला मिळवला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. गावातील महिला नाशिक जिल्हा सोडून कधी बाहेर पडलेल्या नव्हत्या. लोकांशी कसे बोलावे याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड भीती होती. हळूहळू त्या बोलायला लागल्या.”
अभिव्यक्तीच्या कार्यकर्त्यांनी या महिलांना बोलतं केलं. त्यांना त्यांचं नाव, गाव आणि सध्या काय करत आहात पुढे काय, तुमचं स्वप्न काय आहे यावर चर्चा केली. आता महिला बोलू लागल्या होत्या. त्यांनीही आमचं स्थलांतर थांबायला हवं असं सांगितलं. स्थानिक पातळीवर काम मिळालं तर इथं राहूनच मन लावून आम्ही काम करू असं महिला म्हणाल्या. अभिव्यक्ती संस्थेने फिनाईल बनवायचं ठरवलं होतं. पण ते वापरणार कोण असा प्रश्न महिलांच्या मनात होता. कारण ग्रामीण भागातील बहुतांश घरं शेण मातीची आहेत. त्यात फिनाईल कुठ वापरणार यावर पुन्हा चर्चा झाली. फिनाईलचा वापर संडास बाथरूममध्ये करू शकतो त्यामुळे स्वच्छता ठेवता येईल हे महिलांना काही अंशी पटलं. भिला ठाकरे सांगतात, “फिनाईल बनवून बघू. ते विकायचं कसं यावर विचार करता येईल या विषयी चर्चा करण्यात आली.
दरम्यान, हात लोंडी आणि बोरीपाडा येथील इच्छुक महिलांना येत वर्धा इथं फिनाईल व इतर उद्योग कसे चालतात याची माहिती घेण्यासाठी पाठवण्यात आलं.”
महिला प्रशिक्षण घेऊन आल्या. तोवर गावात शेड बांधल्या गेल्या होत्या. आता तिथं फिनाईल तयार करण्याचे यंत्र बसवण्यात आलं. आणि प्रत्यक्ष फिनाईल बनवायला सुरुवात केली. प्रशिक्षणानंतर प्रयोग सुरू राहिले. अखेर एक दिवस चार प्रकारचे सुगंध आणि रंग वापरून फिनाईल तयार करून त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन विक्री केली. पहिल्या दिवशी ३०० रुपयाची विक्री झाली. बोरीपाडा येथील महिला ग्राम पंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय महाविद्यालय इथं जाऊन या महिलांनी सर्व अधिकाऱ्यांना फिनाईलची माहिती दिली. त्यांनीही वैयक्तिकरित्या फिनाईल खरेदी केलं आणि महिला उद्योगाचा उत्साह वाढवला.
या मोहा सरफेस क्लीनरची प्रयोगशाळेत त्याची तपासणी करण्यात आली. हे वापरण्या योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळालं आहे. आत्ता पर्यंत एक हजार लिटर फिनाईल तयार करण्यात आलं असून स्थानिक बाजारपेठेत त्याची विक्री होत आहे. आत्ता पर्यंत सहा हजार रूपयांचे फिनाईल विकण्यात आले. महिलांनी पुढाकार घेऊन सुरू केलेला हा उद्योग नक्कीच आशेचा किरण दाखवणारा ठरत आहे.