मोहफुलांच्या पाककृतींची संशोधक सुश्मिता
मोहाची चिक्की, मोहाचे लाडू, मोहाचं सरबत या पदार्थांबद्दल ऎकलंयत का कधी? मग वाचाच हे.
नुकतंच, गडचिरोलीत गेलो होतो. तिथून घरी नेण्यासाठी काय खाऊ न्यावा, याचा विचार करत होतो. आम्ही आमच्या आरोग्यासाठी (तालुका कुरखेडा) या संस्थेच्या कार्यालयात तिथल्या पदार्थांचं एक छोटंस दुकान आहे. दुकानातल्या कार्यकर्त्याने इतक्या पदार्थांचे पर्याय सुचवले आणि त्यातले काही चाखायलाही दिले. यात अधिकांश पदार्थ मोहाचे होते. मोहाचे लाडू, मोहाची चिक्की हे गोड पदार्थ फारच चवदार होते. अधिक माहिती काढायला गेलो, तेव्हा अवाक झालो. आणि याच संस्थेत सुश्मिता भेटली. सुश्मिता हेपट. आदिवासी खाद्यसंस्कृतीच्या इतिहासात डोकावत ही २३ वर्षांची तरूणी कालौघात लुप्त झालेल्या त्यांच्या पाककृती पुन्हा शोधून काढण्याचं काम करतेय. पोषणमुल्यांनी समृध्द असलेले मोहाचे पदार्थ पुन्हा ताटात यावेत, आदिवासींकडे असलेली वनउपज त्यांना अधिक उत्पन्न मिळवून देणारी ठरावी, हा सुश्मिताच्या कामामागचा हेतू.
चक बल्लारपूर (ता.पोंभूर्णा, जि.चंद्रपूर) इथल्या शेतकरी कुटुंबात, निसर्गाचं वैभव लाभलेल्या भागात जन्मलेली सुश्मिता बालपणापासून झाडं, वेली, फुले, फळं, पानं यांच्यात रमलेली. बल्लारपूरला जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंत, पुढे चंद्रपूरला मामाकडे राहून दहावीपर्यंतचं शिक्षण घेऊन तिने आपल्या करिअरची दिशा ठरवत बामनी इथल्या बीआयटी या संस्थेत अन्नतंत्र पदविकेसाठी प्रवेश घेतला. याच काळात वैदर्भीय खाद्यसंस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहे हे तिला जाणवलं. आणि ती जपण्यासाठी काही तरी केले पाहिजे, असं तिच्या मनाने घेतलं. पदविकेनंतर जळगावातील निलॉन्स संस्थेत तिने इंटर्नशीप केली.जीव घालून काम करण्याच्या तिच्या स्वभावामुळे तिला नोकरीची संधी मिळाली. परंतु, सुश्मिताने पुढे शिकण्याचं ठरवलं.
२०१८ मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शासकीय महाविद्यालयात केमिकल अँड फुड टेक्नॉलॉजी पदवी अभ्यासक्रमासाठी तिने प्रवेश घेतला. ती नियमित लेक्चर्स, अभ्यास आणि ग्रंथालयात रमली. तिचं वाचन वाढत गेलं. तिची तळमळ पाहून शिक्षकांनीही विशेष मार्गदर्शन केले. दरम्यान महाविद्यालयाचं राष्ट्रीय सेवा योजनेचं (एनएसएस) शिबिर मेळघाटात पार पडलं. एनएसएस स्वयंसेवक म्हणून काम करताना सुश्मिताचा मेळघाटातल्या कोरकू समाजाशी जवळचा संबंध आला. कुपोषणाचं प्रमाण या भागात अधिक होतं. या समाजाला पोषणविषयक माहिती, मार्गदर्शनाची गरज असल्याचं तिला जाणवलं. या आदिवासी समाजासाठी काही करता येईल का? या विचाराने तिला झपाटलं. वडील ऋषी हेपट यांचा सामाजिक संस्थांशी संबंध होता. सुश्मितालाही वाटू लागलं की, शक्य होईल ते या लोकांसाठी केलं पाहिजे.
आदिवासी बांधवांना पोषण, आरोग्य याविषयी ज्ञान मिळायला हवं, त्यासाठी आपण कसं योगदान देऊ शकू, याबाबत ती विचार करू लागली. सामाजिक कार्यकर्त्या संध्या एदलाबादकर यांच्याशी ती बोलली. त्यांनी सुश्मिताला ‘आपण आपल्या आरोग्यासाठी’ या संस्थेसोबत काम करण्याचं सुचवलं.
सप्टेंबर २०२१ मध्ये सुश्मिता कुरखेड्यात आली. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेचे संचालक डॉ.सतीश गोगुलवार, सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख यांच्याशी झालेला संवाद आणि गडचिरोलीतल्या आदिवासी भागात फिरल्यानंतर इथल्या पारंपरिक पोषणमूल्य असलेल्या पाककृती नव्याने पुढे आणण्याचं तिने निश्चित केलं.
कुरखेडा, कोरची तालुक्यांत आणि परिसरातल्या गावांत फिरून सुश्मिताने तिथल्या भौगोलिक परिस्थितीचं, खाद्यसंस्कृतीचं अवलोकन केलं. यातून तिच्या लक्षात आलं की मोहाची फुलं इथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्यांचा आहारातला वापर कमी होत आहे. मोह हा मधुक गोत्रातील पानगळीचा मोठा वृक्ष. गडचिरोली आणि परिसरातल्या जंगलात आदिवासींसाठी हा वृक्ष वरदान. मोहाची फुलं, फळं, बिया, पानं, सालं, फांद्या, मुळं या सर्वांचा वापर होत असल्याने हे झाड म्हणजे आदिवासींचा कल्पवृक्ष. मोह हा डेरेदार वृक्ष आहे. तो ४० ते ६० फूट उंच वाढतो. मोहाचे झाड ६०-७० वर्षांपर्यंत जगतं. गाभ्यातील लाकूड लालसर तपकिरी असते. आदिवासी संस्कृतीत मोहाचं विशेष स्थान आहे. जन्म, मृत्यू, विवाह अशा प्रसंगी तर खासच. म्हणूनच या झाडाच्या लाकडाचा वापर आदिवासी सहसा घर बांधण्यासाठी करत नाहीत. वसंत ऋतूत ही झाडं मोहफुलांनी बहरतात. उन्हाळ्यात मोहाची फुले, बिया वेचणं, त्यांची विक्री करणं, तेल काढणं वगैरे कामं आदिवासी स्त्री-पुरुष करतात.
दरम्यान, नव्या पिढीला मोहाच्या कित्येक पाककृतींची फारशी माहिती नसल्याचं सुश्मिताला समजलं. जुनी पिढी मात्र या बाबतीत माहीतगार. फार पूर्वी तेलासाठी मोह वापरायचो, असं जुनी पिढी सांगते. बोंडा, पोळ्या, लोऱ्या, मुठ्ठे असे पदार्थ अलीकडे तर होतचं नाहीत. मोहाची दारू व एखाद-दुसरा पदार्थच सध्या वापरात असल्याचं चर्चेतून कळलं. रोज, लोकांना भेटून आल्यानंतर काढलेल्या टिपणांचं वाचन करणं, त्याविषयी डॉ.सतीश गोगुलवार, शुभदा देशमुख आणि इतरांशी चर्चा करणं, असं दोन-तीन महिने सुरु राहिलं. सुश्मिताने मोहफुलं आणून ती वाळत घालून पाकप्रयोगांना सुरुवात केली. स्वत: फार स्वयंपाकगृहात वेळ घातलेला नसल्याने ती जबाबदारी तिने विनोद लोहंबरे यांच्यावर सोपवली.
मोहाची फुलं सुरुवातीला धुवून ड्रायरमध्ये स्वच्छ वाळवून घेतली. लाडू हा सुष्मिताने मोहापासून बनवलेला पहिला पदार्थ. लाडू कोरडा बनला. हातात पकडला की फुटून जायचा. बरेच प्रयोग केल्यानंतर चांगला घट्ट वळलेला चविष्ट असा मोहाचा लाडू बनवण्यात तिला यश आलं. या काळात तिने स्वत: पाककौशल्यही शिकून घेतलं. चव, वास आणि पोत यांच्या चाचण्या कैकदा करत ती इथपर्यंत आली. बनवलेला लाडू संस्थेतील सहकारी आणि पाहुण्यांना चाखायला दिला. त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या. सर्वांची दाद मिळाल्यावर लाडूची चव अंतिम झाली. त्यानंतर मोहाचं सरबत. इथेही चव निश्चित करण्यापर्यंत अनेक अडथळे आले. मोहाची मूळ चव कायम राखणं हे आव्हान होतं. एकदा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांनी हे सरबत चाखून पाहिलं आणि मोहाची मूळ चव बदलता कामा नये, असं त्यांनीही सुचवलं. अनेक प्रयोगानंतर मोहाची मूळ चव कायम राखत तिने सरबत बनवलं. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेचं ५२ गावांमध्ये कुपोषणमुक्त ग्राम अभियान सुरु होतं. या गावांत जाऊन सुश्मिताने ग्रामस्थांना लाडू आणि सरबत दिलं. “मोहाचं सरबत आहे, चढणार तर नाही ना? मोहाचा लाडू आहे, नशा तर नाही ना येणार?”, असे लोकांचे सुरुवातीचे प्रश्न. मात्र, चव घेतल्यानंतर लोकांना ती आवडली. नशेबाबतचे गैरसमजही दूर झाले. त्यासाठी तिने जनजागृती केली. पुढे सुश्मिताने चिक्कीही बनवली. यात लहान मुलांना काय आवडतं, याचा विचार केला. गूळ, शेंगदाणा आणि त्यात मोहफुलं. काही वेळा जवस आणि टरबुजाच्या बिया वापरल्या. चिक्कीचं पोषणमूल्य तपासण्यासाठी प्रयोगशाळेत सँम्पल पाठवले. राष्ट्रीय चाचणी आणि अंशांकन प्रयोगशाळा मान्यता मंडळ (एनएबीएल) प्रमाणित प्रयोगशाळेच्या तपासणीत या चिक्कीत एरवीच्या चिक्कीपेक्षा दुप्पट पोषणमूल्यं आढळली. कोविडमध्ये ज्या व्हिटॅमिन सीच्या मागे सर्वजण धावत होते, तेही यात भरपूर प्रमाणात होतं. या रिपोर्टने सुश्मिताच्या प्रयोगांना मोठं बळ मिळालं. आता, ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’कडून सुश्मिताने बनवलेली मोहाची चिक्की, लाडू, सरबत, बोंडा, गुलाबजाम असे अनेक पदार्थ विकले जात आहेत.
‘नागपूर बीजोत्सव’ या उपक्रमातून मोहाच्या पाककृतींना अधिक प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, मोबाईल हेल्थ क्लिनीकच्या माध्यमातून सुश्मिताने या ५२ आदिवासी गावांतील ग्रामस्थांना हे पदार्थ तयार करण्याचंही प्रशिक्षण दिलं. तिथले महिला-बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे यांच्या सहकार्याने कुरखेडा तालुक्यातल्या सर्व आशा, अंगणवाडी सेविकांसाठी सुष्मिताने प्रशिक्षण शिबिरं घेतली. मुलांना पोषणआहार मिळावा, मोहाचे पदार्थ सगळ्यांना करता यावेत आणि त्यांच्या विक्रीतून कही ममाई व्हावी, हा या शिबिरांचा उद्देश. जेली, जाम, केक असे नव्या पिढीला आवडणारे पदार्थही ती आता मोहापासून करते.