कवडसा
नोव्हेंबर २०१९ मधला तो दिवस मला अजूनही आठवतोय. मी आणि माझी मुलगी नुकतंच दिल्लीला शिफ्ट झालो होतो. माझा नवरा सागर अजूनही मुंबईत होता. माझ्याबरोबर सासू-सासरे होते. पण काही महत्त्वाच्या कामामुळे त्यांना नाशिकला जावं लागलं. मला दोन दिवस एकटीने काढायचे होते. सकाळीच अनाहिताला [तेव्हा वय वर्षे जेमतेम ३ वर्षे] तयार करून टॅक्सीत बसून पाळणाघरात सोडलं. ते पाळणाघर चार किलोमीटर दूर. दिल्लीतल्या ट्रॅफिकमध्ये आपण मुलीला कुठेतरी दूर सोडून येत आहोत, याचा मोठ्ठा गिल्ट घेऊन मी नोकरीच्या ठिकाणी पोहोचले. संध्याकाळी ऑफिस संपवून पुन्हा टॅक्सीतून तिला घ्यायला गेले तेव्हा अख्ख्या पाळणाघरात शेवटच्या दोनच मुली पालकांची वाट पाहात थांबल्या होत्या. मी लहान असताना पाळणाघरात अनेक वर्षं जात होते, त्यामुळे पाळणाघर ही मुलांसाठी मजा करायची जागा असू शकते या विचारांची मी. पण त्या दिल्लीतल्या नवख्या वातावरणात छोट्या अनाहिताला धावत बिलगताना बघितलं आणि क्षणभर वाटून गेलं.. “माझं बाळ, मला दिवसभर घरी हवं – आणि बाळासाठी त्यांचे आई-बाबा.” मार्च २०२० पासून हे “लहान मूल, तिचे आई-बाबा” खरंच २४ तास एकमेकांबरोबर राहणार आहेत,” अशी भविष्यवाणी कुणी केली असती तर मी कदाचित वेड्यात काढलं असतं! अनाहिताचे आजी-आबा सोबत असल्याचे काही महिने वगळले तर कसे गेले बरं आमचे तिघांचे हे सगळे दिवस? कोंडलेल्या परिस्थितीत आमची मनःस्थिती कोंडलेली राहिली की आमच्या परीनं मोकळा श्वास घेत राहिलो आम्ही? या प्रश्नाचं उत्तर साधं सोपं नाही. लंबकाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत अशा विविध प्रकारच्या मनःस्थितीतून आम्ही तिघंही गेलो.
वर्तमानपत्रातील बातम्या वाचून, जवळच्या व्यक्तींच्या आजारपणाच्या, निधनाच्या बातम्या ऐकून आणि आमची हतबलता जाणवल्यानं मी आणि सागर अनाहितासमोरच किती वेळेला रडलो. अनाहितानं विचारलेल्या “कोरोनाची पिल्लं त्यांच्या आई-बाबांचं का ऐकत नाहीत?” अशा निरागस प्रश्नांनी आम्हाला निरुत्तर केलं. काही वेळेला “आपण सामाजिक क्षेत्रात काम करतोय त्याचा काही खरंच उपयोग होणार आहे का?” अशा विचारांनी आम्हाला हरल्यासारखंही वाटलं आणि घरासमोरच्या बागेतल्या रिकाम्या झुल्याकडे, हिरवळीकडे पाहून अनाहिताचे प्रश्नार्थक उदास डोळे पाहून पोटात तुटलं. पण मानवी मनाची फार मोठी गंमत वाटते. आपल्यातली जिगीषु वृत्ती सतत एक आशेचा किनारा शोधत असते. अनाहिताच्या लहानग्या मनाला झेपतील अशी तिच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देत गेल्यावर लक्षात आलं, की ती आणि आम्ही आलेली परिस्थिती हळूहळू स्वीकारत गेलो, रोजच्या वेगळ्या प्रकारच्या जीवनशैलीचा अर्थ लावत गेलो.
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काहीच दिवसात समजलं की आमच्या ‘ऑफिस cum घरात’ अनाहिताची प्रयोगशाळासुद्धा भरणार आहे. तिच्या उत्सुक मनाला या बंद घरातही अवकाश दिसत होता आणि ते अवकाश धुंडाळण्याकरिता ज्याला मोठी माणसं ‘पसारा’ म्हणतात तो होऊ देणं नितांत गरजेचं होतं. त्याबरोबरच मला स्वतःला आई म्हणून थोडा डिस्काउंट देणंही गरजेचं होतं. मी ‘सुपरमॉम’ आणि ‘सुपरवुमन’ होण्याचा अट्टाहास न धरता स्वतःतल्या कमतरतांना स्वीकारायला शिकले, वैतागले, चिडले तर अनाहिताशी “मला कंटाळा आलाय, १० मिनिटं मला एका खोलीत एकटीला शांत बसू दे” असा संवादही साधायला शिकले. यातून तीही हळूहळू अधिक समजूतदार, स्वावलंबी आणि मोकळी होत गेली. कागद, खडू, पाटी, तिच्या आवडीचे काही खेळ, चाईल्ड-फ्रेंडली कात्री, तिच्या कल्पनेतल्या नाटकात रंगवायची काही पात्र, रांगोळी, घरातला छोटा तंबू आणि बोगदा, भरपूर पुस्तकं असं आम्ही तिच्या हाताशी मिळतील अशा ठिकाणी ठेवायला सुरुवात केली. ते न पुरल्यानं खोलीच्या भिंती रंगवल्या आणि नटवल्या गेल्याच!
घरातल्या घरात खेळायचे कित्येक खेळ शोधून काढले- कधी कुंड्या रंगवल्या, कधी तिच्या छोट्या ढोलकीशी जुगलबंदी केली, कधी लाकडी ठोकळ्यांचा सज्जनगड बांधला, कधी गाणी लावून नाच केला, भरपूर गाणी ऐकली, मराठी लिहायला-वाचायला सुरुवात केली, घरातले मुंग्या, मुंगळे यांचे निरीक्षण केलं, पक्ष्यासाठी घरटे बांधलं, कधी सगळ्यांनी मिळून रेसिपीचा व्हिडीओ बघून अनाहिताच्या सूचनांनुसार पदार्थ केले तर एखाद्या दिवशी फारसं काहीच न करता लोळालोळी पण केली. ‘आज मला कंटाळा आलाय, असं तिलाही वाटणारच की!
या सगळ्यात आम्हाला भक्कम साथ होती – आणि अजूनही आहे ती अनाहिताच्या दोन्ही आजी-आबांची. तिच्याशी रोज व्हिडीओ कॉलवर ते जे नावीन्यपूर्ण खेळ-गप्पा-गोष्टी करतात त्यावर एक स्वतंत्र लेख लिहायला हवा. तिच्या नीलिमाआजी बरोबर मराठी कवितांचे खेळ, माधव आबाबरोबर डिजिटल पकडापकडी [आबा पकडण्यासाठी त्याच्या घरात धावायचा आणि अनाहिता तितक्याच उत्साहाने आरडाओरडा करत तिच्या घरात धावायची], राजन आबासोबत ‘सारेगम’ची जुगलबंदी आणि गच्चीतला फेरफटका, वंदना आजीसोबत ‘चल रे भोपळ्या’ गोष्टीचे नाट्य [अनाहिताचा मुलगी आणि वाघोबा असा डबलरोल आणि आजी ही गोष्टीतली आजीबाई] अशा खेळांमुळे, गप्पांमुळे फक्त नात्यातला ओलावाच जपला गेला नाही तर अनाहिताच्या भावविश्वात नवनवीन कल्पनांची बीजं रुजली गेली.
काळ कठीण होता आणि आहे. असे कित्येक दिवस गेले जेव्हा फार कोंडल्यासारखं वाटलं, ऑफिसच्या अंगावर आलेल्या कामामुळे नोकरी सोडावीशी वाटली, अनाहिताच्या छोट्याशा नाका-तोंडावर मास्क चढवताना चीड आली पण या चिमुरडीनं दार किलकिलं करून कवडसा कसा शोधायचा, याचा धडा दिलाय आम्हाला!
– डॉ. मुक्ता गुंडी

Leave a Reply