माझ्यासाठी समाधान म्हणजे काय ?
बऱ्याचदा ध्येय गाठून झालं की पोकळी निर्माण होते. त्यामुळे ध्येय किंवा काम पूर्ण होणं, बक्षीस मिळणं यात समाधान शोधण्यापेक्षा काम करताना मिळणारं समाधान जास्त महत्त्वाचं आहे. आई सांगायची, कामातला आनंद घ्या. हा आनंद घेता आला तर ध्येय साध्य झाल्यानंतरची पोकळी निर्माण होत नाही.
आईबाबा आणि डॉ.आनंद नाडकर्णी यांनी १९८६ मध्ये मुक्तांगणची स्थापना केली तेव्हा मी कॉलेजमध्ये होते. अधूनमधून तिथं जात असले तरी हेच करिअर करायचं वगैरे ठरवलं नव्हतं. पुणे विद्यापीठातून क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. सुवर्णपदक मिळालं. त्यानंतर पीएचडी करायचं ठरवलं.
माझे गाईड डॉ. म. न. पलसाने यांच्या मार्गदर्शनानुसार व्यसनमुक्तीबाबत संशोधन करायचं ठरवलं. त्यांच्या सल्ल्यानुसार मुक्तांगणमध्ये हे संशोधन करायला सुरुवात केली. तिथे सुरुवातीला आईचं, कार्यकर्त्यांचं निरीक्षण मी करायचे. या निरीक्षणातून हळूहळू जाणीव झाली, संशोधनापेक्षा इथं काम करण्यातून मला समाधान मिळेल. करिअर असं निवडावं, ज्यातून समाधान मिळेल, त्याचसोबत एकदा करिअर निवडल्यावरही त्यात समाधान कसं वाटेल ते बघणंही महत्त्वाचं ठरतं. क्षेत्र कुठलंही असो, कितीही आवडीचं असो, काम करताना काही अडचणी असतातच. त्या स्वीकारून पुढे जावं लागतं. कौतुक जसं स्वीकारतो तशा नकारात्मक बाबींचा सामनाही करावा लागतो. आईबाबामुळे ही उमज आपोआप रुजत गेली.
मुक्तांगणमध्ये काम सुरू केल्यावर आईला पाहून मला खूप आश्चर्य वाटायचं. काम करताना तिला खूप समाधान मिळायचं. रुग्णांना तेचतेच सांगायचं… आजारपणातही आई १०-१० रुग्णांना तपासायची. सुट्टी फक्त तिला उपचारासाठी जावं लागे तेवढ्याच दिवसापुरती. शेवटच्या रुग्णालाही ती तो पहिलाच रुग्ण असल्याच्या उत्साहानं तपासायची. ”सर्वांना तेचतेच सांगण्याचा तुला कंटाळा कसा येत नाही?” हे तिला विचारलं तेव्हा म्हणाली, ”रुग्ण शेवटचा असला, आधीच्या ९ रुग्णांशी आपण तेच बोलत असलो तरी त्या शेवटच्या रुग्णाला हे माहीत नसतं. तो आपल्याला पहिल्यांदाच ऐकत असतो.”
असंच सुरुवातीच्या काळात मुंबईचा एक पेशंट आला होता. मुक्तांगणमध्ये दाखल व्हायची ही त्याची दुसरी वेळ होती. त्याची बायको खूप रडत होती. मला खूप राग आला, घरच्यांना एवढा त्रास होतोय, या माणसाला कळत नाही का? मी आईपाशी व्यक्त झाले. तेव्हा तिने समजावलं, ”व्यसन सुटायला हवं, हे त्यालाही समजतंय. पण व्यसनामुळे त्याच्या मेंदूवर परिणाम झालाय. समजत असूनही तो व्यसन सोडू शकत नाही, याचाच अर्थ तो आजारी आहे. तो माणूस वाईट नाही.” माणसाच्या चांगुलपणावरचा तिचा विश्वास, रुग्णाशी आपलेपणानं वागणंबोलणं, त्यांच्याकडून शिकणं मला खूप काही शिकवून गेलं. एखादा रुग्ण पुन्हा पुन्हा व्यसनाकडे वळतोय त्याचा त्रास करून घेण्यापेक्षा त्याकडे आव्हान म्हणून बघायचं. त्याचं व्यसन सोडवण्यासाठी आपल्याला शक्य आहे ते सर्व करायचं. त्याच्यासाठी करत असलेल्या कामातून समाधान मिळवायचं.
– मुक्ता पुणतांबेकर

Leave a Reply