मुक्तांगण स्वावलंबी होणं आणि आयएसओ सर्टिफिकेट
सुरुवातीला मुक्तांगणला सरकारी अनुदान मिळायचं. पण ते कधीच वेळेवर यायचं नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पैसे वेळेत देणं, मुक्तांगण चालवणं आव्हानात्मक असायचं. त्याखेरीज अनुदानासाठी जी तपासणी चालायची ती क्लेशदायी असायची. सरकारी अनुदान मिळणाऱ्या सामाजिक संस्था सरकारला फसवत, लुबाडत तर नाहीत ना, असा कायम संशय या तपासणीत असायचा. मुक्तांगणची स्थापना समाजहिताची उद्दिष्टे ठेवून झालेली. आम्ही ठरवलं, मुक्तांगणसाठी सन्मानानं निधी मिळवायचा. त्यासाठी मुक्तांगणच्या टीमनं एकत्रित निर्णय घेतला. संस्थेला नफा नको पण खर्च भागवण्यासाठी पैसे मिळवण्याचा. त्यासाठी कामाला सुरुवात केली. सरकारी अनुदान नाकारलं. परिस्थिती नाही म्हणून कोणाला उपचार नाकारायचे नाहीत, पण ज्यांना सहज शक्य आहे त्यांच्यासाठी शुल्क आकारायला सुरुवात केली. महापालिकेच्या शाळांमध्ये आम्ही मोफत समुपदेशन करतो पण ज्या शाळांना, कॉर्पोरेट कंपन्यांना पैसे देणं शक्य आहे, त्यांच्यासाठी पैसे आकारणे, सीएसआर निधी, त्यासाठी प्रत्येक बाबीचं डॉक्युमेन्टेशन, असं करत करत मुक्तांगण स्वावलंबी झालं. मुक्तांगणचं स्वावलंबी होणं, हा मोठा समाधानाचा क्षण होता. मुक्तांगणचं डिजिटलाइझेशन, कंपोस्ट खत निर्मिती मार्गी लावणं सुरू आहे.
सामाजिक संस्थांना आयएसओ प्रमाणपत्र मिळणं तेव्हा खूप दुर्मिळ होतं. २००४-०५ मध्ये त्यासाठी प्रयत्न सुरू करून जेव्हा हे प्रमाणपत्र आम्हाला मिळालं तो क्षण अतीव आनंदाचा होता. पत्रकार परिषद घेऊन आम्ही सर्वांसोबत हा आनंद शेअर केला. तेव्हा बाबा म्हणाला, ”हे सर्टिफिकेट म्हणजे कागदाचा तुकडा आहे. रुग्णाचं समाधान हेच आपलं खरं समाधान.” बाबाचं ते वाक्य खूप महत्त्वाचं होतं. पाय जमिनीवरच ठेवणारं होतं.
व्यावसायिक गुणवत्ता जोपासताना आपल्या मूल्यांना धक्का लागता कामा नये. यासाठी आम्ही यासंदर्भात इंटर्नल ऑडिट करतो. आपलेपणा, साधेपणा, समानता, पारदर्शकता, स्वयंशिस्त, स्वावलंबन ही आईबाबानं घालून दिलेली मूल्ये जपली जात आहेत ना, हे तपासतो. दर शुक्रवारी २ ते ४ या वेळेत पूर्ण आठवड्याच्या कामाचं विश्लेषण करतो.
मला वाटतं, समाधानासाठी मूल्ये जपणं खूप आवश्यक आहे.
– मुक्ता पुणतांबेकर
शब्दांकन – सोनाली काकडे

Leave a Reply