शाबासकीचे क्षण… समाधानाचे क्षण
राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यासारखे अत्यंत सन्मानाचे क्षण समाधानाचे क्षण असतात का?… तर पुरस्कार आनंद देणारे असतात, ते संपूर्ण टीमचे असतात. ते जबाबदारीची जाणीव करून देतात. पण पुरस्कारांपेक्षा माझ्या माणसांनी दिलेली शाबासकी, कौतुक हे माझ्यासाठी अतीव समाधानाचे क्षण ठरले आहेत. आईसोबत मी ३ वर्ष काम केलं. तेव्हा आई आणि माझे मेंटॉर डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडून खूप काही शिकले. सुरुवातीपासूनच मुक्तांगणमध्ये प्रत्येकाच्या कामाचं मूल्यांकन होतं. तशी माझी वेळ आली. आई आणि डॉ. नाडकर्णी दोघांनी माझ्या फाईल्स बघितल्या आणि माझं कौतुक केलं. सुरुवातीच्या त्या दिवसांमध्ये त्या दोघांकडून मिळालेली शाबासकी हा अतीव समाधानाचा क्षण आहे. तो आठवून आजही मला तेवढाच आनंद होतो.
माझे गाईड डॉ.पलसाने आता ८६ वर्षांचे आहेत. महिन्यातून एकदा तरी मी त्यांना भेटते. ‘आनंदयात्री’ चा अंक घेऊन जाते. त्यांच्याशी चर्चा करते. कामाबद्दल सांगते. तेव्हा त्यांनी केलेलं कौतुक मला खूप आवडतं. मी पुन्हा लहान होते.
अगदी अलीकडची एक गोष्ट सांगते.
व्यसनमुक्ती केंद्रातलं कोविड व्यवस्थापन यासाठी आता लोक मार्गदर्शनाकरिता फोन करतात पण कोविड काळ मुक्तांगणसाठीही कठीण होता. अगदी सुरुवातीला आधीच दाखल असलेल्या रुग्णांच्या सुरक्षेसाठी बाहेरच्या कोणाला प्रवेश नव्हता. पहिल्या लॉकडाऊनमध्ये मार्च- एप्रिलमध्ये कडक निर्बंधांमुळे दारू मिळणं कठीण होतं त्यामुळे डिस्ट्रेस कॉल कमी होते. व्हिडिओ कॉलमार्फत आम्ही बाकीच्या रुग्णांशी बोलायचो. दारूची दुकानं सुरू झाल्यावर कसोटीचा काळ सुरू झाला. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना रुग्ण, कार्यकर्ते यांच्या तपासण्या, कोविडविषयक नियमांचं काटेकोर पालन आणि त्याचसोबत व्यसनमुक्तीचे प्रभावी उपचार…
या काळात पुणे महानगरपालिकेसोबत आम्ही काम केलं. रुग्णांच्या विलगीकरणासाठी सोय केली. ६० पेक्षा अधिक पॉझिटिव्ह केसेस आमच्याकडे आल्या. अनेक रुग्णांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आम्ही या काळात आलो. प्रचंड तणावाचा असा तो काळ होता.
आमच्या या कामाबाबत बाबा आणि एमकेसीएलचे चीफ मेंटॉर विवेक सावंत यांच्यात विषय झाला. तेव्हा बाबा त्यांना मुक्ताचा खूप अभिमान वाटत असल्याचं म्हणाले. सावंत यांनी मला बाबानं केलेलं कौतुक सांगितलं. त्यांचं बोलणं, बाबानं माझं त्यांच्यापाशी केलेलं कौतुक अतीव समाधानाचा क्षण होता. आनंदाचा क्षण होता. बाबानं समोरासमोर बसून माझं इतकं कौतुक केलं नसतं. माझ्या या साऱ्या जवळच्या मोठ्यांच्या कौतुकातून मी पुन्हा लहान होते आणि आनंदाचे, समाधानाचे क्षण वेचते. ll
– मुक्ता पुणतांबेकर
शब्दांकन – सोनाली काकडे

Leave a Reply