सहचरी गट
परदेशांमधली व्यसनमुक्ती केंद्र मी पाहिली. आपल्या तुलनेनं तिथे खूप चांगल्या सोयीसुविधा आहेत. तरीही तिथे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण कमी आहे. व्यसनमुक्तीबाबत अभ्यास करण्यासाठी भारत सरकारने वर्ष १९९५ मध्ये देशातून ५ जणांना फ्रान्सच्या दौऱ्यावर पाठवलं होतं. त्यात मीही होते. हा माझा पहिलाच दौरा होता. तीन महिन्यांच्या कालावधीत आम्हाला सर्वांनाच जाणवलं की तिथे रुग्णाला भेटायला नातेवाईक फारसे येतच नाहीत. आपल्याकडे रुग्णाला भेटायला नातेवाईक कुठूनकुठून येतात… तिथे तर न्यायला-आणायला कोणी आलं तरी पुष्कळ वाटायचं. आपल्याकडे व्यसनी व्यक्तीचे आईवडील किती त्रास सोसतात. विशेषतः बायका नवऱ्यानं दारू पिऊन किती मारलं, तरी त्याची तक्रार करतील, नाव ठेवतील पण त्याचं व्यसन सुटण्यासाठी त्या पूर्ण प्रयत्न करतात. व्यक्ती व्यसनमुक्त व्हावी यासाठी संपूर्ण कुटुंब झटतं आणि व्यक्ती व्यसनमुक्त होण्यात त्याच्या कुटुंबाचाही मोठा सहभाग असतो.
या क्षेत्रात फ्रान्समध्ये काम करणाऱ्या संबधितांसमोर आम्ही हा पैलू मांडला तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं. फ्रान्समधली मंडळीही आपल्या इथे आली होती. तेव्हा ”तुम्ही आमच्याकडून शिकण्यापेक्षा आम्हीच तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे”, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तो क्षण माझ्यासाठी समाधानाचा होता. आपल्या कुटुंबव्यवस्थेचा खूप अभिमान मला त्यावेळी वाटला.
मंगळवारी मुक्तांगणच्या फॅमिली मीटिंगला अगदी लांबून, पहाटे उठून कुटुंब येतं. आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९९७ मध्ये आम्ही सहचरी गटाची स्थापना केली. यामागची कल्पना तिचीच होती. रुग्णाच्या पत्नींचा तो आधारगट आहे. मी आणि आत्या प्रफुल्ला मोहिते, आम्ही दोघी या गटाची मीटिंग घेतो. कोरोनामुळे झूमच्या माध्यमातून सध्या आम्ही ही मीटिंग घेतो. त्यामुळे या काळात या महिलांची स्थिती प्रत्यक्ष दिसली. कोण शेतात काम करतंय. कोणाचं बाळ झोळीत झोपलंय. किती हालअपेष्टा या महिला सोसतात. पण त्या मोडून पडत नाहीत. जिद्दीनं कुठल्याही परिस्थितीत उभ्या राहतात. आपल्या देशातल्या बायका खूप खंबीर आहेत. त्यांच्याशी बोलतानाचे क्षण समाधानाचे क्षण देऊन जातात.
– मुक्ता पुणतांबेकर

Leave a Reply