गोष्ट माधवची
रुग्णमित्र व्यसनमुक्त होण्यासारखा दुसरा आनंद कुठला? मुक्तांगणमध्ये आलेला रुग्ण व्यसनमुक्त व्हावा, त्याचा इथला कालावधी शांत, आनंददायी होऊन तो पुन्हा माणसात यावा, यासाठी मुक्तांगणमधले आम्ही सर्वच झटत असतो. इथे रुग्णमित्र स्वतःची कामं स्वतः करतात. मुक्तांगणमधली कामं वाटून घेतात. यासाठी कोणालाच कुठलं लेक्चर द्यावं लागत नाही. स्वावलंबन, शिस्त याविषयीचे नियम मुक्तांगणमधल्या आम्हा सर्वांनाच समान आहेत. इथून व्यसनमुक्त झालेले अनेक रुग्णमित्र पुढेही कार्यकर्ते म्हणून मुक्तांगणसोबत जोडले जातात. यापैकीच एक माधव कोल्हटकर. नुकताच त्याचा वाढदिवस झाला.
माधव, मुंबईतल्या उच्च मध्यमवर्गातला लाडावलेला मुलगा. साधारण १० वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्याचे आईबाबा त्याला मुक्तांगणमध्ये घेऊन आले. ११ वी -१२ वी तच त्याला दारूचं व्यसन जडलं होतं. टोकाला गेलेलं त्याचं व्यसन सुटता सुटेना. आईबाबांनी संबंध तोडले. माधव रस्त्यावर आला. पुण्यात आला असताना एका मित्रानं त्याला पुन्हा इथं ऍडमिट केलं. त्याला खरंच इथे राहायचं आहे ना, हे पाहण्यासाठी आम्ही त्याच्याकडे शौचालयांच्या स्वच्छतेची जबाबदारी दिली. हळूहळू तो बदलायला लागला. त्याने आईबाबांना पत्र लिहिलं. वर्षभराने त्याचे घरचे त्याला भेटायला आले तेव्हा माधवला खूप आनंद झाला. त्यानंतर तो आमच्यासोबत समुपदेशक म्हणून काम करू लागला. दारूचं व्यसन सुटलं तरी त्याचं निकोटिनचं व्यसन काही सुटेना. मुक्तांगणमध्ये स्टाफसाठी कडक नियम आहेत. माधवचं तंबाखूचं व्यसन सोडवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. मुक्तांगणच्या नाशिक आणि ठाणे केंद्राचं फॉलोअप तो बघायचा. ते बंद करण्याचा कडक इशारा मी त्याला दिला. ”आज मी तंबाखू खाल्ली नाही”, असा मेसेज रोज रात्री करायला सांगितलं. तंबाखू सोडून माधवला ७-८ वर्ष झाली पण आजही रात्री तो न चुकता मेसेज करतो. एवढंच नाही तर तो त्याच्या रुग्णमित्रांसाठीही ही युक्ती वापरत आहे. खरंच ‘ज्योत से ज्योत जगाते चलो।’ सारखे दुसरे समाधान नाही.
मला वाटतं, आपल्यासोबतची माणसं, मग ती आपल्या कामाच्या ठिकाणी असोत की घरातली, खूष असणं महत्त्वाचं आहे. वर्क लाईफ बॅलन्स साधणं आवश्यक असतं. कला आणि व्यायाम या दोन्ही प्रकारातला एक तरी छंद हवाच. त्याशिवाय मित्रमैत्रिणी तर हवेतच. अजूनही शाळेतले आम्ही मित्रमैत्रिणी भेटतो. या भेटीतलं समाधान अवर्णनीयच !
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं समाधान आपल्यापाशी आहे. ते आपल्याला शोधता आलं पाहिजे, हे मी आजी आणि बाबाकडून शिकले. आजीला रांगोळीचा छंद होता. पुण्यात घरापुढल्या अंगणात ती छान, मोठी रांगोळी काढायची. पण रहदारीचा रस्ता असल्यानं जेमतेम अर्ध्या तासात रांगोळी पुसली जायची. आजीने कधी तक्रार केली नाही की रांगोळी काढणं सोडलं नाही. ‘माझ्या आनंदासाठी मी रांगोळी काढते’ असं ती सांगायची. लोकांच्या कौतुकासाठी नाही तर आपल्यासाठी आपण आनंद घेतला पाहिजे, छोट्याछोट्या गोष्टीतूनही खूप आनंद मिळवता येतो, ही शिकवण तिने दिली. असा छोट्या छोट्या गोष्टीतून स्वतःला मिळणारा आणि दुसऱ्याला देता येणारा आनंद समाधानाचे असंख्य क्षण देऊन जातात!
ll समाप्तll
– मुक्ता पुणतांबेकर
शब्दांकन- सोनाली काकडे

Leave a Reply