झाले मोकळे आकाश
तेलंगणाच्या सीमेवर धर्माबाद तालुक्यातील नायगाव(ध). गाव व्यसनांनी घेरलेलं. गावातील बहुतांश पुरुषच नव्हे तर चौथी,पाचवीची मुलंही 10-10 रुपये जमवून मद्यपान करत होती. दारूच्या व्यसनापायी अनेकांनी पती, जावाई, मुलं गमावली. गावातील महिलांनी अखेर एकजुटीने चार वर्षे लढा दिला आणि गावात दारूबंदी झाली. ज्या देशी दारूच्या दुकानामुळे अनेक कुटुंबांची राखरांगोळी झाली, त्या दुकानाला जुलै 2021 मध्ये सील करण्यात आलं. या लढ्याविषयी सांगताना जीवन ज्योती ग्रामसंघाच्या अध्यक्षा सुनिता संजय राजपोड सांगत होत्या. “नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबादपासून 11 किमीवर 1400 लोकवस्ती असलेलं नायगाव (ध). गावापासून दीड किमीवर तेलंगणा राज्य असल्याने येथील नागरिकांना मराठी सोबतच तेलुगू भाषाही अवगत आहे. इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा, अंगणवाडी आहे. दर एकादशीला गावात कीर्तन, भजन,स्वाध्याय, महापुरुषांच्या जयंत्या उत्साहात साजर्या होतात. असं असलं तरी, ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिराच्या समोरच देशी दारूच्या दुकानामुळं गावातील महिलांचं जगणं कठीण झालं होतं. स्वस्तात दारू मिळते म्हणून तेलंगणातील ग्रामस्थ चोरट्या मार्गानं वाहनं करून दारू पिण्यासाठी इथं येत. घरातील पुरूष, महिला शेतात गेल्यानंतर ज्येष्ठ मंडळी दिवसभर घरात असत. दारू पिऊन पुरूष नशेत दारोदार फिरत होती.
रस्त्यावरून जाताना ज्येष्ठांचा पाठलाग करत होती. काही म्हणताच अंगावर धाऊन येत. कोणाच्याही घरात घुसत, अशा वेळी पळ काढता येत नाही. ज्येष्ठ नागरिकांना दिवसभर बाहेर बसून पाळत ठेवावी लागत होती. स्वत:चं घर असूनही तिथं राहण्याची चोरी होती. गावातील वातावरणामुळे पुढील शिक्षणासाठी मुलींना बाहेर पाठवता येत नव्हतं. त्यामुळे दहावीनंतरच मुलींचं लग्न लावून दिलं जातं. गावातील व्यसनाधीनता पाहता गावत मुली दिल्या जात नव्हत्या. पुढे चौथीची मुलंही 10-10 रुपये जमवून दारू पीत असल्याने गावातील त्रस्त झालेल्या महिलांनी नांदेड जिल्हाधिकारी कर्यालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रत्येक टप्यावर महिलांना लढा द्यावा लागला. विशेष म्हणजे ज्या महिलांनी कधी घराचा उंबरठाही ओलांडला नाही, त्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी गावगाडा सांभाळत प्रशासनाकडे खेटे मारत होत्या.”
दरम्यान, बर्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. तीन महिने सातत्याने दिवसरात्र एक करुन महिलांनी एकत्र येत 5 मार्च 2021 रोजी ग्रामसभा घेऊन दारूबंदीचा ठराव घेतला. यावेळी ‘दारू बंद, दारू बंद’ घोषणा देतच मंडपातील सर्वच 374 महिलांनी हात उंचावला. दारू दुकान सुरु ठेवण्याच्या बाजुने एकही मत पडलं नाही. तांत्रिक अडचणीमुळे पुढे या प्रक्रियेला वेळ लागला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी सुनावणी घेऊन दोन्ही बाजुंचं म्हणणं ऐकून घेतलं. यावेळी ग्रामसभेतील दारू बंदीचा घेतलेला ठराव, शाळेतील विद्यार्थ्यांवर होणार परिणाम, गावातील तंटे, घरगुती हिंसाचारात होणारी वाढ या सर्व गोष्टी दारूमुळे होत असल्याचं लक्षात आल्यावर गावातील दारूचं दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. अखेर बिलोली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी जुलैमध्ये रोजी दारू दुकानाला सील ठोकलं. महिलांच्या आनंदला पारावार उरला नाही. अंधाराच्या छायेतून मोकळं झाल्या सारखं वाटलं. “महिलांना कोणी कमी समजू नये, त्यांनी ठरवलं तर त्या काहीही करू शकतात. हा विजय महिलांच्या एकजुटीचा” असं सुनिता राजपोड म्हणाल्या.
– शरद काटकर, नांदेड

Leave a Reply