‘’पस्तीसेक वर्ष झाली आता या इमारतीला, थोडी पडझड झाली आहे, पण सध्या संस्थेची आर्थिक परिस्थिती नाही आणि एवढी मोठी रक्कम देणारेही कोणीच नाही’’, शीलाताई फिनिक्सला सांगत होत्या. जवळपास गेली ४० वर्ष शीलाताई सगर गायकवाड,नंदनवन नेरली कुष्ठधामच्या व्यवस्थापिका म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
मराठवाडा लोकसेवा मंडळाचा नांदेड इथला हा आश्रम. त्याला भेट द्यायला त्यांच्या भावाचा म्हणजे भाकपाचे ज्येष्ठ नेते कॉ. विठ्ठलराव सगर यांचा नातू फिनिक्स आला होता. शीलाताई, त्यांचे पती आणि संस्थेचे विश्वस्त तुकाराम गायकवाड यांनी केंद्र दाखवले. कुष्ठरुग्ण विभागाच्या इमारतीच्या छताची पडझड झाली होती. पत्रे तुटले होते. ही गोष्ट गेल्या मार्चमधली.या भेटीनंतर आजोबा, वडील प्रा.किरण (मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष,पुरोगामी चळवळीतले नेते) आणि इतर सगर कुटुंबाप्रमाणे आपणही काहीतरी योगदान द्यावे असे फिनिक्स यांना वाटू लागले. नेरली कुष्ठधामचे ‘नंदनवन ‘ होण्यात सगर कुटुंबीयांचाही मोलाचा वाटा आहे.
पद्मश्री श्यामराव कदम, व्ही. आर. भुसारी, डॉ. वाडेकर, डॉ. मालपाणी यांच्यासारख्या सेवाभावी वृत्तीच्या व्यक्तींनी यासाठी योगदान दिले आहे.
फिनिक्स गुजरातमध्ये सोफोस कंपनीतसॉफ्टवेअर इंजिनीअर. कंपनीच्या सीएसआर फंडातून काही मदत मिळते का बघायचे त्यांनी ठरवले. फिनिक्स यांचा कंपनीतला आलेख चढा होता. त्यांची झोकून काम करण्याची वृत्ती,निस्वार्थी प्रस्ताव यामुळे कंपनीने प्रस्ताव स्वीकारला. कोरोंना स्थितीमुळे यात काही अडचणी येऊन वर्षभराचा विलंब झाला. पण यंदाच्या मार्च महिन्यात कंपनीने अडीच लाखांचा निधी संस्थेच्या खात्यात पाठवला. फिनिक्स यांनी मार्चअखेरीला कुठलाच डामडौल न करता नोंदणी पद्धतीने लग्न केले. आठवडाभराने पत्नी भावनासह ते आश्रमात आले. सोबत दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य आणि टीम. तिथे राहून त्यांनी जातीने काम करून घेतले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनील कदम, उपाध्यक्ष एस.पी.गायकवाड, कोषाध्यक्ष विजय मालपाणी, सचिव डॉ. हंसराज वैद्य आणि आश्रमातल्या सर्वांनी त्यांचे आभार मानले. फिनिक्स यांच्या पुढाकारामुळे इथल्या रुग्णांचा निवारा सुरक्षित झाला आहे.
-गिरीश भगत
Related