समस्यांशी लढण्याचा- ‘नंदुरबार पॅटर्न’

जिल्हा नंदुरबार. शहादा तालुक्यातलं लांबोळा हे छोटंसं गाव. गावातील एका आदिवासी मातेला मुलगी झाली. पण बाळ दीड महिन्याचं होत नाही, तोवर कौटुंबिक कलहामुळे ती माता बाळाला तिथंच सोडून दुसऱ्या गावी निघून गेली. इकडं आईचं दूध मिळत नसल्याने बाळाचे हाल होऊ लागले. घरातल्यांनी त्या छोट्या बाळाला वरचा आहार म्हणून अधून- मधून म्हशीचं दूध देणं चालू केलं. पण ते दूध काही बाळाला पचत नव्हतं. गावातील अंगणवाडी सेविका उज्ज्वला सुखलाल बागूल यांचं या बाळाकडे विशेष लक्ष होतं. बाळाला ते दूधही पचत नव्हतं. त्या चिमुरडीची प्रकृती दिवसेंदिवस खालावू लागली होती. चिमुरडी कुपोषणाच्या उंबरठ्यावर होती, घरगुती उपायांनी जेव्हा तिलं बरं वाटेनासं झालं, आणि वजन खूपच खालावलं तेव्हा उज्ज्वला ताईंनी मागचा पुढचा विचार न करता त्या बाळाला उचलून जवळचं प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं आणि बाळाला तिथं दाखल केलं. तिथं जवळपास 8 ते 10 दिवस त्या बाळावर उपचार झाले. आणि त्यानंतर ती चिमुरडी – रूपाली नीट बरी झाली. एवढंच नाही तर घरी आल्यानंतर पण उज्ज्वला ताईंचे रूपालीच्या वाढीकडे, आहाराकडे बारीक लक्ष होतं. आज हीच रूपाली 3 वर्षांची झाली असून हे एक निरोगी आहे.

अशीच लांबोळामधलीच आणखी एक केस. सिकलसेल रूग्ण असलेल्या लक्ष्मी ठाकरे या गरोदर होत्या.  त्यात त्यांचं हिमोग्लोबिन फक्त 5 वर आलं होतं. अंगणवाडी सेविका उज्ज्वला ताईंचे त्यांच्याकडे बारीक लक्ष होतं. हे अत्यंत जोखमीचं गर्भारपण असल्याचं त्यांनी ओळखलं. डॉक्टरांच्याही कायम संपर्कात राहून आधी त्यांच्या आयर्न, फॉलिक असिडच्या गोळ्या काही दिवसांसाठी बंद करून त्यांना आयर्न सुक्रोजचं इंजेक्शन सुरू केलं. नंतर डॉक्टरी सल्ल्याने गोळ्या सुरू केल्या. आहारातही हिमोग्लोबिन वाढवणारे बदल केले. मात्र सिकलसेलच्या रूग्णात खूप प्रयत्न करूनही फारसे हिमोग्लोबिन वाढत नाही. लक्ष्मीताईंचं हिमोग्लोबिन थोडं वाढलं, तरीही प्रसूतीच्या वेळी ते 10 च्या खालीच होतं. ही प्रसूती अत्यंत जोखमीची असल्याने, ती दवाखान्यातच होणं आवश्यक होतं. त्यासाठी अंगणवाडीताई उज्ज्वलाताईंनी अगदी वेळेवर लक्ष्मीताईंना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. प्रसूती डॉक्टरांच्या निरिक्षणात नीटपणे पार पडली, आणि बाळ सुखरूप जन्माला आलं.

 

“खरंतर अंगणवाडी ताईंचं काम हे फक्त माता- बालकांचं पोषण, आरोग्य, कुपोषण होणार नाही, पूर्वप्राथमिक शिक्षणाची तोंडओळख करून देणं इतकंच अपेक्षित असतं. पण नंदुरबारसारख्या ठिकाणी काम करताना निरक्षरता, भौगोलिक अडचणी या सगळ्यांवर मात करत अंगणवाडी ताई काम करतात. आणि फक्त पोषण- कुपोषणाचे प्रश्नच नव्हे तर, समुपदेशन आणि नंदुरबारमध्ये आढळणाऱ्या ‘सिकल सेल अनिमिया’ सारख्या रोगाशीही त्यांना दोन हात करावे लागतात.”

“सिकल सेल अनिमियात त्या व्यक्तीच्या शरीरातील लाल रक्तपेशी या गोलाकार नसून अर्धचंद्राकार असतात, त्या रक्तपेशीतून सहज वाहून नेल्या जात नाहीत, त्यामुळे त्या मध्येच अडकून शरीराला प्राणवायू किंवा रक्ताचा पुरवठा कमी होतो. सामान्य गोल लाल रक्तपेशी 120 दिवस जगतात, तर त्या तुलनेत या रक्तपेशी फारच कमी दिवस म्हणजे 10 ते 20 दिवस जगतात. एकूण सिकल सेलच्या रूग्णाचे आयुष्य अवघडच. शिवाय नवरा बायको दोघेही सिकलसेलचे रूग्ण असतील तर त्यांच्या होणाऱ्या बाळाला ‘सिकल सेल’ होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे अश्या सिकल सेल रूग्णांनी मुळात एकमेकांशी लग्नच न करणे, हे नवा सिकल सेल रूग्ण जन्माला येऊ नये, यासाठी आवश्यक असतं. वेळप्रसंगी याबाबत जनजागृती, चाचण्यांचा आग्रह हे ही काम नंदुरबारच्या अंगणवाडी ताई करतात,” शहादा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी रणजित कुऱ्हे सांगत होते. “नंदुरबारमध्ये अडचणी भरपूर आहेत, आदिवासी लोकांची वस्ती दूर दूर असते, दळणवळणाच्या अत्याधुनिक सोयी इथं नाहीत, बराचसा समाज निरक्षर आहे, काही अंधश्रद्धा आहेत, त्यामुळे इथं समस्याही जास्त आहेत. मात्र त्यावर काम करण्यासाठी उज्ज्वलाताईंसाऱख्या उत्साही अंगणवाडी सेविका, चांगल्या पर्यवेक्षिकाही भरपूर आहेत. उज्ज्वलाताईंनी त्यांच्या अंगणवाडीत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचं ‘बाहुलीघर’ तयार केलंय, ज्याचा उपयोग अंगणवाडीतील मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षण देण्यासाठी, त्यांना अंगणवाडीत रमवण्यासाठी होतो. तसंच इथल्या अनेक अंगणवाडी ताया उत्साहाने गृहभेटी देतात, स्थानिक आदिवासी भाषांत लोकांशी संवाद साधतात, पाककृती करून दाखवतात, पथनाट्ये, रेसिपी शोज करतात आणि पोषणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवतात.” कुऱ्हे सर सांगत होते.

 

 

 

नंदुरबारच्या ‘मान्सूनपूर्व आरोग्य तपासणी’ या पथदर्शी प्रकल्पाची नोंद तर, महिला आणि बालविकासमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी घेतली आहे. जिल्ह्यातील एकही कुपोषित बालक निरिक्षणातून सुटू नये आणि उपचाराविना राहू नये, याकरिता दरवर्षी मे आणि जून महिन्यात शून्य ते सहा वयोगटातील प्रत्येक बालकाची तपासणी होते. याकरिता एका गावातल्या अंगणवाडी ताई, पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकारी आणि बालरोगतज्ज्ञ डॉक्टर हे दुसऱ्या गावात जातात आणि तेथील प्रत्येक बालकाचे वय, वजन, उंची, दंडाचा घेर, आरोग्य समस्या यांची काटेकोर नोंद ठेवतात. त्यासोबत गरोदर आणि स्तनदा मातांचीही तपासणी होते. त्यांच्याही समस्यांची नोंद ठेवली जाते. यावर्षी सुमारे 1,60,000 बालकांची तपासणी करण्यात आली त्यात सुमारे 3439 बालकं कुपोषित आढळली. या कुपोषित बालकांवर ग्राम बाल विकास केंद्रात उपचार केले जातात. त्यांना विशेष पूरक आहार दिला जातो, त्यांच्या वजन, माप आणि लक्षणांची नोंद ठेवली जाते, तरीही बरे न वाटल्यास NRC (Nutrition Rehabilitation Centre) मध्ये दाखल केलं जातं. जिथं विशेष डॉक्टरांची टीम, बालरोगतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ असतात. नंदुरबार जिल्ह्यात अश्या चार NRC आहेत. “या उपक्रमामुळे कुपोषित बालकं अगदी लगेच लक्षात आल्याने त्यांच्यावर त्वरेने उपचार करणं शक्य होते. यावर्षी आढळलेल्या 3439 पैकी 3200 बालकांना लगेच ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात आलं. शिवाय आता कोरोना काळामुळे आम्ही हा विशेष पूरक पोषक आहार, बालकांना घरपोच पोहोचवतोय, शिवाय काही ठिकाणी बालकांच्या घरांनाच अंगणवाडी तायांनी ग्राम बाल विकास केंद्राचं स्वरूप दिलं आहे. या सगळ्या बाबींमुळेच, मंत्रिमहोदय मा.यशोमतीताईंच्या आदेशाने नंदुरबारच्या धर्तीवर राज्यात सर्वत्र असे बालकांचे स्क्रिनिंग करण्याचे आदेश 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान देण्यात आले होते,” कुऱ्हे सर माहिती देत होते.

“नंदुरबारचं वैशिष्ट्य असं की गेल्या वर्षी कोरोनाचं संकट आदळलेलं असताना सुद्धा सर्व काळजी घेऊन, दुर्गम भागात जाऊन जून, जुलै 2020 मध्ये ही तपासणी झाली, पुन्हा डिसेंबर 20 आणि जानेवारी 2021 मध्ये सुद्धा आम्ही स्क्रिनिंग केलं. आणि अर्थात या वर्षी पुन्हा मे- जून 2021 मध्ये ही तपासणी झाली. इतकंच नाही तर या तपासणीच्या वेळी काही कारणाने, गावाबाहेर गेलेली बालकं जेव्हा परत आली, तेव्हा तेव्हा आम्ही त्यांची तपासणीही करतो आहोत. एकही मूल तपासणी आणि पोषणापासून वंचित राहू नये, असं आम्हांला वाटतं. नंदुरबारसारख्या आदिवासी भागात पोषणाचं महत्त्व अधोरेखित करणारे हे काम करताना समाधान वाटतं, मात्र कुपोषणाची समस्या ही काही फक्त आदिवासी भागात नाही, ती ग्रामीण- शहरी भागातही आढळू शकते, त्याकरिता जनजागृतीची आणि सातत्याने प्रयत्नांची गरज आहे” कुऱ्हे सर सांगत होते.

– स्नेहल बनसोडे- शेलुडकर

3 thoughts on “समस्यांशी लढण्याचा- ‘नंदुरबार पॅटर्न’

    1. शून्य ते सहा वयोगटातील बालके, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व 45 वयापर्यंतच्या सर्व महिला यांना पोषण शिक्षण देणे कामे अंगणवाडी सेविका मनोभावे भूमिका बजावत आहे.कमी शिकलेल्या आहेत त्या त्यांना फारस कळतं नाही असं म्हणून टाकणाऱ्या!समाजाला दिशादर्शक म्हणून उभ्या राहणाऱ्या सेविकांच्या कामाचं कौतुक करावं तितकं कमीच! मोठ मोठ्या विद्यापीठाच्या पदव्या मिळवून मोठेपणा मिरवणाऱ्या समाज घटकालाही ज्या गोष्टी माहिती नाही त्या गोष्टी सांगून पोषण साक्षरता करणाऱ्या अंगणवाडी ताईस समाजसुधारक म्हटले तरी वावगे ठरणार नाही!गरोदर पणात मातेची काळजी कशी घ्यावी?कोणत्या प्रकारचा आहार खावा?बालकाच्या आयुष्यातील पाहिले १०००दिवस असे अनेक विषय समजावून सांगून समाज प्रबोधन करणाऱ्या ताईंना मानाचा मुजरा

      1. शहादा तालुक्यातील तांबोळा या गावांमध्ये त्या बालकावर केलेले उपचार याची सविस्तर माहिती नाही त्याला दूध पचत नव्हते मग त्याच्या पोषणावर बारीक लक्ष ठेवून अंगणवाडीत आईने नेमकं काय केले त्याला काय दिले याची माहिती यामध्ये नोंदवली असती तर आणखी मदत झाली असते

Leave a Reply