नऊ लाखाला विकली एक एकर संत्राबाग
विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून अमरावती जिल्हा प्रसिद्ध आहे. जिल्ह्याच्या चारी बाजूंना महत्त्वाची धरणं असल्याने या ठिकाणी पाणीसाठाही तेवढाच मुबलक आहे. त्यामुळे या भागातला शेतकरी हा ‘सधन कास्तकार’ म्हणून ओळखला जातो. तूर, सोयाबीन, ज्वारी , मका, कपाशी, डाळिंब यासोबतच संत्रा पिकाचं अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं.
संत्रा हे विदर्भातलं नगदी पिक मानलं जातं. हमखास पैसा मिळवून देणारी ही संत्र्याची बागायती शेती, अशी एकेकाळी संत्रा पिकाची ओळख होती. पण सध्याचे लहरी हवामान, सततचा पाऊस, रासायनिक खतांचा अतिवापर आणि रोपांची खालावलेली क्षमता यामुळे गेल्या काही वर्षांपासून ऐन बहराच्या मोसमात संत्र्याच्या बागेत मोठ्या प्रमाणात फळगळती होत आहे. यामुळे विदर्भातले कास्तकार बेजार झालेले असून, सगळा खर्च मातीमोल होत आहे.
मात्र अश्या परिस्थितीत सुद्धा नवीन प्रयोग करणारे युवा शेतकरीही या जिल्ह्यात आहेत. यापैकीच एक म्हणजे अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील वणी बेलखोडा येथील युवा शेतकरी शुभम अलोने.या तरूण शेतकऱ्याने संत्रा गळतीवर असा काही रामबाण उपाय़ शोधलाय की, त्यांची बाग उत्तमरित्या बहरून एका एकराच्या संत्रा बागेसाठी त्यांना तब्बल नऊ लाख रूपये मिळालेले आहेत. शुभम यांच्याकडे वीस एकर शेती असून त्यापैकी बारा एकरांवर त्यांनी संत्राबागेची लागवड केलेली आहे.
संततधार पावसामुळे वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांना संत्रा हे फळपीक बळी पडतंय. सतत लागून असलेल्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या बागांवर फवारणीची संधीही मिळाली नाही़. त्यामुळे सद्यस्थितीत संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळती होतांना दिसून येतेय. संत्रा गळतीला अनेक कारणे असली तरी रस शोषण करणारा पतंग, सूक्ष्म अन्न द्रव्यांची कमतरता आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव ही प्रमुख कारण असल्याचे, वाचनातून आणि कृषीतज्ज्ञांशी केलेल्या चर्चेतून लक्षात आल्याचे शुभम अलोनेंनी सांगितले.
संत्रा गळतीवर मार्गदर्शन करताना युवा शेतकरी शुभम अलोने म्हणाले की, “शेतकऱ्यांनी झाडाखाली गळलेली फळं तातडीने उचलून बागेच्या बाहेर फेकून देणे किंवा ती मातीत पुरणे गरजेचे आहे़. सूक्ष्म अन्न द्रव्याची कमतरता असल्यास, त्याची वेळीच फवारणी द्यावी. पाणी पुरेसे नसल्यास संत्राबागेसाठी पाण्याची त्वरित व्यवस्था करण्याची गरज असते. ठिबक असेल तर ठिबकने पाणी द्यावे किंवा झाडाच्या दोन्ही बाजूला दोन दांड फोडून पाणी द्यावे. काही बागेत हिरवी संत्रफळे गळत असल्यास, देठाजवळ तपकिरी चट्टा झालेला असेल तर कार्बेन्डाझिम २०० ग्रॅम २०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाची तीव्रता जास्त वाटल्यास १० दिवसांनी याच औषधाची फवारणी करावी़. संत्रा फळ पिकामध्ये जर रसशोषण करणारा पंतग या किडीमुळे फळगळती होत असेल तर १ लीटर पाणी अधिक १०० ग्रॅम गूळ, तसेच गळलेल्या फळांचा रस अधिक १० मिली़ मॅलाथिऑन याचे विषारी आमिष तयार करून हेक्टरी १० ते १२ डब्बे झाडांवर टांगावेत़. पतंग पकडण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा़ बागेत सभोवतालच्या गुळवेल, वासनवेल उपटून नष्ट कराव्यात. “
असेच उपाय करत शुभम यांनी आपल्या शेतातील संत्रागळती थांबवली असून, दर्जेदार संत्र्याचे पीक घेतलंय. त्यांच्या तब्बल एक एकरातील संत्राबागेला नऊ लाखांचा दर मिळाल्याने, विदर्भातील शेतकऱ्यांकरिता ही उमेद जागृत करणारी गोष्ट आहे. या सोबत धरतीरत्न, निंबोळी खत या सारखी सेंद्रिय खतंही मोठ्या प्रमाणात शुभम अलोने वापरतात, लेखन- जयंत सोनोने, अमरावती

Leave a Reply