पती,मुलगा तर गेला, आता नातवाला वाचवायचं आहे

 

नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबादपासून ११ किलोमीटर अंतरावर पूर्वेला वसलेलं १४०० लोकवस्तीचं नायगाव (ध) गाव. शेती हेच प्रामुख्यानं इथलं उपजीविकेचं साधन. महिलाही शेतात मजुरीवर जातात. गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर तेलंगणा राज्य.


गुण्यागोविंदाने राहणारी लोकं गावातील दारूच्या दुकानामुळे व्यसनाधीन झाली. महिला दिवसभर राबराब राबत पण घरी आल्यावर त्यांच्या कमाईवर पुरुष मंडळी हात मारतात. पैसे दिले नाही की मारझोड. लहानग्यांनाही व्यसन लागलं. १०-१० रुपये जमवून चौथी-पाचवीची मुलंही दारू पिऊ लागली. हे चक्र तीन ते चार वर्षांपासून सुरूच होतं.
गावातील ज्येष्ठ महिला केवळाबाई लालू गडमोड सांगतात, ”जसं लग्न झालं तसं सुख मिळालं नाही. सुनेवरही तीच वेळ आली. वर्षातच पतीसह मुलगाही सोडून गेला. आमचं झालं ते होऊन गेलं, आता नातवाला वाचवायचं.”
गावातील जीवन ज्योती ग्रामसंघाच्या अध्यक्ष सुनीता राजपोड म्हणाल्या, ”उमेदअंतर्गत बचतगट तयार केले. ग्रामसंघाची महिन्याला बैठक होते. व्यवसायासोबतच आरोग्य, शिक्षण, महिलांच्या समस्येवर चर्चा होते. २४ डिसेंबर २०२०ला दारूबंदीचा निर्णय घेतला. बचतगटामुळे महिलांची हिंमत वाढली. गावातील पुरुषांना वाटायचं महिला कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत. आमचा गट फोडण्याचाही प्रयत्न केला. पण आता महिला कोणाचं ऐकत नाही. रोजचे कमावलेले पैसे त्यांच्या अंगी लागत नाहीत, हे त्यांना समजलं.”


महिलांनी दारू दुकानदाराला विनवणी केली. त्यानं प्रतिसाद दिला नाही. महिलांनी दुकानावर ठिय्या मांडला. तालुका दारूबंदी कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी कायद्यानुसार मागणी करण्याचा सल्ला दिला. तब्बल १८० महिलांनी, ज्यांनी कधी गावाची वेसही ओलांडली नव्हती, त्यांनी धर्माबाद तहसीलवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा वळवला. जानेवारी महिन्यात जिल्हाधिका-यांसमोर कैफियत मांडली. जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घ्या, तात्काळ कार्यवाही करू, असं आश्‍वासन दिलं.
फेब्रुवारी महिन्यात सरपंच निवडीवेळी, ‘आधी दारूबंदीचा ठराव घ्या, मग सरपंच निवड अशी भूमिका घेतली. ग्रामपंचायतीसमोर महिलांनी ठिय्या केला.
बऱ्याच संघर्षानंतर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी खडसावल्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी महिलांच्या विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं. पाच मार्चला ग्रामसभा झाली. हात उंचावून मतदान प्रक्रिया झाली. ‘दारू बंद दारू बंद’ घोषणा देत मंडपातील सर्वच ३७४ महिलांनी हात उंचावला. ग्रामसभेत ठराव मंजूर झाला. ”आमच्या मेहनतीला फळ आलं असून आता प्रत्यक्षात दुकान बंद होईल तो दिवस आमच्यासाठी महत्वाचा राहील.”अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या आहेत.
यासंदर्भातल्या पुढल्या कार्यवाहीला सुरुवात झाली असून लवकरच ती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

– शरद काटकर, ता. धर्माबाद जि. नांदेड

Leave a Reply