निसर्गऋण

शून्य कचरा, अर्थात Zero Waste चा विचार करताना

‘कचरा’ हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात नेमके कोणते विचार येतात? घाण? दुर्गंध? की आणखी काही नकारात्मक भावना? तर गेल्या साधारण दोन महिन्यांपासून मी मात्र एक संकल्प केला आहे. आणि नवीन वर्षाच्या बहुतेक जणांच्या संकल्पांसारखे ह्याचे स्वरूप नसून खऱ्या अर्थाने तो पाळला जातोय! हा संकल्प म्हणजे ‘माझ्या घरातील कचरा हा म्युन्सिपालिटीच्या गाडीत समाविष्ट होणार नाही!’
साहजिकच, तुमची पहिली प्रतिक्रिया असेल की हे कसं शक्य आहे? पण तुमच्यापैकी काहींनी ह्याबद्दल काहीतरी ऐकलं ही असेल. एकूणच गेल्या काही वर्षात कचऱ्यापासून खत बनवण्याबद्दल थोडी जागृती झाली आहे हे नाकारताही येणार नाही. असे प्रयोग करणारी काही लोकं तुम्हाला परिचितही असतील. परंतु ह्या संकल्पनेला व्यापक स्वरूप कसं द्यायचं व त्याचा आजच्या परिस्थितीशी कसा संबंध जोडायचा हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. अर्थात, त्याची चळवळही झाली पाहिजे व पुढे एक धोरणात्मक विचारही केला गेला पाहिजे. हे समजून घेण्यासाठी हा लेखप्रपंच!
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वर्ष २००६. मी कॉलेजमध्ये असताना आमच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने दोन दिवसांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यात अनेक शास्त्रज्ञ आले व त्यांनी अनेक विषयांसंबंधित आम्हाला मार्गदर्शन केले. पण दुसऱ्या दिवसाच्या शेवटी ज्या एका व्यक्तीचे व्याख्यान माझ्या ऐकण्यात आले त्यांच्यामुळेच मी हा आजचा लेख लिहितो आहे. ते होते भाभा अणु संशोधन केंद्रात तेव्हा रुजू असलेले शास्त्रज्ञ डॉ शरद काळे. आणि ते व्याख्यान होतं त्यांनी विकसित केलेल्या ‘निसर्गऋण’ ह्या तंत्रज्ञानावर!
निसर्गऋण – खरं तर ह्या नावाद्वारेच सगळी संकल्पना आपल्यासमोर मांडली जाते. आपण निसर्गाकडून अनेक गोष्टी घेत असतो आणि निसर्ग काहीही न बोलता आपल्याला त्या देत असतो. हे ऋण फेडणं म्हणजे हे तंत्रज्ञान. डॉ शरद काळे यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलं. त्याचा प्रसार, त्याची मांडणी व योग्य शब्दात त्याचे महत्त्वही ते पटवून देतात. ते एका ‘मिशन’वर आहेत. ‘कचरामुक्त वसुंधरा’ हे ते मिशन!
कचऱ्यापासून खत तयार करणे. शिवाय अधिक व्यापक पातळीवर इंधन अथवा गॅस तयार करणे हे त्यांनी आम्हाला तेव्हा सांगितलं.
शिवाय ते सर्वांसाठी उपलब्धही आहेत. ह्याची प्रचिती त्यांच्या व्याख्यानानंतर काही दिवसांनी मला आली. प्रभावित होऊन मी त्यांना ईमेल केलं आणि आपल्याबरोबर प्रकल्पपातळीवर काम करायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली. आणि दोन दिवसात सरांनी त्याला होकार कळवला व पुढील काही दिवसात मी आणि काही मित्र भाभा अणु संशोधन केंद्राच्या परिसरात दाखल झालो! एक तर, एवढ्या मोठ्या संस्थेबद्दल जिच्याबद्दल केवळ ऐकलं होतं तिथे जाण्याची उत्सुकता! आणि दुसरं म्हणजे आम्ही जे ऐकलं व पाहिलं ते क्षणभर विश्वास न बसण्यासारखंच होतं!
आम्ही पाहिलं की भाभा अणु संशोधन केंद्राचं कॅन्टीनही संपूर्णपणे एलपीजी गॅस सिलेंडर विरहित कार्य करीत आहे. कारण तिथं तयार होणाऱ्या कचऱ्यापासून जो बायोगॅस तयार होतो त्यावरच तिथलं जेवण तयार होते. हे तेव्हाच काय, तर आजही पाहून भारावल्यासारखंच होईल! आम्ही हा प्रकल्प छोट्या पातळीवर आमच्या कॉलेजच्या प्रयोगशाळेत करायचा असं ठरवलं. सरांकडून योग्य मार्गदर्शन घेऊन आम्ही ते पार पाडलं. मी रोज घरातील फळं, भाज्यांची सालं, देठं ग्राइंडरमधून बारीक करून कॉलेजला घेऊन जात असे. आमच्या प्रयोगशाळेत ‘निसर्गऋण’ प्रकल्पाची जी छोटी प्रतिकृती तयार केली होती त्यात तो समाविष्ट करून त्यावर योग्य ती प्रक्रिया करीत असे. आमचा प्रयोग यशस्वी झाला आणि आमच्या वर्गाने काही दिवसांनी बायोगॅसची निर्मिती अनुभवली! हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर काही आठवड्यांनी मला सरांकडून एका कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ह्या संस्थेने हा ‘निसर्गऋण’ प्रकल्प उभारला होता व त्यांच्याही कॅन्टीनमध्ये आता एलपीजी गॅस सिलेंडरची आवश्यकता नसणार होती. सरांनी माझ्यासारख्या विद्यार्थ्याला केवळ प्रयोगापुरती मदत केली नव्हती तर त्यांनी मला एका मोठ्या प्रकल्पाची ओळख करून दिली होती. पुढेही ते मला विज्ञानासंबंधित ईमेल पाठवत राहिले आणि त्यांची सकारात्मकता माझ्यात झिरपत राहिली. आज सर भाभा अणु संशोधन केंद्रातून निवृत्त झाले आहेत. परंतु नव्या माध्यमांद्वारे ते आजच्या शाळेतल्या व कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. त्यांना विज्ञानाचे महत्त्व पटवून देत असतात व ‘कचरामुक्त वसुंधरा’ ह्या आपल्या स्वप्नात सहभागी करून घेत असतात.आणि आज ह्या संकल्पनेने अनेक ठिकाणी आपला ठसा उमटवला आहे. घरोघरी, मोठ्या सोसायट्यांमध्ये व महानगरपालिका, नगरपालिका ह्यांच्या धोरणांमध्ये देखील! आणि तरीही आपल्या सर्वांना खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण हे जाणून घ्यायच्या आधी मी नेमक्या कोणत्या कचऱ्याबद्दल बोलतो आहे हे आधी स्पष्ट करतो. मी जैविक विघटनशील कचरा, अर्थात biodegradable waste बद्दल बोलतो आहे ज्यात प्रामुख्याने आपल्या स्वंयपाकघरातील कचऱ्याचा म्हणजेच फळं, भाज्या, त्यांची टरफले, चहापावडर इत्यादींचा समावेश असतो.
‘निसर्गऋण’ पद्धतीने बायोगॅसची निर्मिती सातत्याने होत राहण्यासाठी रोज मोठ्या प्रमाणावर जैविक विघटनशील कचरा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे हा प्रकल्प मोठी हॉटेल, कंपन्या, मोठ्या संस्था इत्यादी ठिकाणी राबवला जाऊ शकतो. मग घरी स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची? ह्या प्रश्नाचे उत्तर मला मागच्यावर्षी नव्याने मिळाले.
कॉलेजमधील प्रकल्पानंतर माझा काळे सरांशी संपर्क तुटला आणि तो तब्बल चौदा वर्षांनी, म्हणजेच मागच्यावर्षी, पुन्हा प्रस्थापित झाला. मागच्यावेळेस जसा ‘बायोगॅस’ प्रकल्प भाभा अणु संशोधन केंद्रात प्रत्यक्ष बघायला मिळाला होता तसाच सेंद्रिय खत निर्माण करणारा छोटासा प्रकल्प सरांच्या खारघरच्या घरी बघितला. “माझ्या घरातून एकही ग्राम कचरा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या गाडीत जात नाही”, असं त्यांनी सांगितलं तेव्हा पुन्हा तसंच भारावून गेलो. आणि काही दिवसातच मी देखील त्याचे अनुकरण करायचा निर्णय घेतला.
ह्या चौदा वर्षात इंटरनेट मोठ्या प्रमाणात बदलले. साहजिकच, सरांचे अनेक व्हिडियो आज यु-ट्यूबवर उपलब्ध आहेत. आमिर खानसोबत ह्या संकल्पनेविषयी त्यांनी ‘सत्यमेव जयते’ ह्या कार्यक्रमात चर्चा केली आहे व तो व्हिडियो देखील बराच गाजला आहे. आपण सर्व ते पाहून अधिक माहिती मिळवू शकता.
घरात तयार होणाऱ्या जैविक कचऱ्यापासून खत कसे तयार करायचे?
 ‘कचरा’ हा शब्द ऐकला की आपल्या मनात केवळ नकारात्मक भावना निर्माण होतात. पण जर याच कचऱ्याकडे आपण ‘संसाधन’ म्हणून पाहिलं तर आपली दृष्टी बदलेल? माझ्या मनात हा विचार भाभा अणु संशोधन केंद्राचे माजी शास्त्रज्ञ डॉ शरद काळे ह्यांचा त्या व्याख्यानामुळे निर्माण झाला. स्वयंपाकघर, बाजारपेठा आणि कत्तलखाने इथल्या जैविक विघटनशील कचऱ्याची पूर्णपणे विल्हेवाट लावून त्याच्यापासून बायोगॅस आणि सेंद्रिय खत तयार करणारे हे तंत्रज्ञान म्हणजे ‘निसर्गऋण.’ The word waste is not a part of nature’s dictionary हे त्यांचे वाक्य मला त्यामुळेच लक्षात राहिले.
मागच्या वर्षी सरांना पुन्हा भेटल्यानंतर मी याच सिद्धांताची अंमलबजावणी करायचं ठरवलं आणि माझ्या लक्षात आलं की जशा भाज्या आणि फळं महत्वाची तशीच त्यांची टरफलंही महत्वाची! जर भाज्या आणि फळं हा निसर्गाचा भाग आहेत तर त्यांची टरफलं ही निसर्गाचाच भाग झाली. मग आपण फळांचा आस्वाद घेणार पण त्यांची टरफलं मात्र टाकून देऊन, सडवत ठेवणार? सगळंच जर महत्त्वाचं आहे, निसर्गाचाच भाग आहे तर मग ‘कचरा’ ह्या शब्दाला काय अर्थ राहिला? म्हणून तर सुरुवातीला प्रश्न विचारला, या कचऱ्याकडे आपण ‘संसाधन’ म्हणून पाहिलं तर?
आज मी घरी स्वयंपाकघरातील जैवविघटनशील कचऱ्यापासून खत कसं तयार करतो याबद्दल थोडी माहिती देणार आहे. तसं म्हटलं तर, याबद्दल आपल्यापैकी बऱ्याचजणांनी ऐकलं-वाचलं असेल. परंतु डॉ. काळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली ही पद्धत सोपी आणि कार्यक्षम तर आहेच, पण त्याद्वारे खतनिर्मिती ही २४ ते ३६ तासात होऊ शकते. तर ही खतनिर्मितीची कृती येथे मांडत आहे:
पूर्वतयारी:
एक मोठी बादली (साधारण १/२ किलो ते १ किलो कचऱ्यासाठी)
सेंद्रिय खत (आधी तयार केलेलं खत किंवा घरी नव्यानं तयार केलेलं. हे कसं तयार करायचं याची प्रक्रिया पुढे दिली आहे).
नारळाच्या शेंड्या/ करवंट्या.
घरी बारीक केलेला स्वयंपाकघरातील कचरा.
सुरुवातीला बादलीच्या खालच्या बाजूला छोटी छिद्र तयार करणे.
बादलीत नारळाच्या शेंड्या/करवंट्या ठेवून ही छिद्र झाकणे.
साधारण २ किलो सेंद्रीय खत (पाव बादली) भरणे (हे सुरुवातीचं खत आहे. हे कसं तयार करायचं याची प्रक्रिया पुढे दिली आहे).
ह्या बादलीत तुमचे खत तयार होणार आहे.
कचऱ्यावर प्रक्रिया करणे:
स्वयंपाकघरातील सर्व कचरा बारीक करा. बारीक करण्यासाठी मिक्सर-ग्राइंडरचा वापर करा.मिक्सर-ग्राइंडर नसल्यास कचरा सुरीने बारीक करा. कचऱ्याचे मोठे तुकडे असले तर प्रक्रियेला वेळ लागतो. बारीक कचरा म्हणजे लवकर खत. पण या कचऱ्यात कुठे पाणी नसावे. तो आधी थोडा सुकवावा. नाहीतर दुसऱ्या दिवशी खतात गोळे तयार होतील.
बारीक केलेला कचरा खतात एकजीव करणे:
तुम्ही आधी तयार केलेलं खत हे बादलीत ठेवलेलं असेल. बारीक केलेला कचरा या खतात टाका आणि एकजीव करा. एकजीव झालेल्या या मिश्रणाचं २४ ते ३६ तासात खतात रूपांतर झालेलं असेल.
सुरुवातीचं सेंद्रिय खत तयार करण्याची प्रक्रिया:
२ किलो सेंद्रिय खत/शेण खत घेऊन येणे.
त्यात साधारण २५०-३०० मिलिलिटर घरी तयार केलेलं ताक घालून त्याला एकजीव करणं.
एक दिवस थांबणे.
(हे खत म्हणजे तुमची सुरुवातीची सामग्री. दुसऱ्या दिवसापासून यात बारीक केलेला कचरा टाकून त्याला एकजीव करायचं आहे).
हा प्रकल्प सुरू होऊन आता जवळजवळ दीड महिना झाला आहे. मी आमच्या स्वयंपाकघरातील कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीमार्फत डम्पिंग ग्राउंडपर्यंत पाठवणं जवळजळ थांबवलं आहे. अधिक प्रयत्न करून हे प्रमाण कायमस्वरुपी ०% पर्यंत आणायचं आहे.
हा प्रक्रिया तुम्हीदेखील सुरू करू शकता. सुरुवातीची थोडीफार तयारी सोडल्यास नंतर आपल्याला रोज साधारण अर्धा ते पाऊण तासाचा वेळ राखीव ठेवून हे काम सातत्यानं पुढे करत राहावं लागेल. हा वेळ म्हणजे घरचा कचरा बारीक करणं आणि नंतर तो एकजीव करणं. पुढचं कार्य सिद्धीस नेण्यास स्वतः निसर्ग आणि त्यातील जीवजंतू समर्थ आहेच!
मात्र, इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. खरं तर ही धोक्याची सूचना आहे. आपल्या घरातील कचऱ्याचं खत बनतंय ही गोष्ट लक्षात आल्यावर अनेकांकडून उष्ट-खरकटं टाकून देण्याची सवय लागू शकते. पण असं करणं म्हणजे या पूर्ण प्रक्रियेला न्याय देणं होत नाही. जेवण टाकून देणं हा अपराध आहे आणि खतात रूपांतर होण्याची सोय जरी असली तरीही हा मार्ग बरोबर नाही. शिवाय उष्ट-खरकटं किंवा शिल्लक जेवण खतासाठी वापरलंत तर त्यात किडे होण्याची शक्यता आहे आणि त्यातून दुर्गंध येणं ही संभवतं. म्हणूनच, तुम्हाला हवा तेवढाच स्वयंपाक करा. घरी एखादी पार्टी किंवा कार्यक्रम आयोजित केलात तरीही हे भान ठेवा. आणि जी भाज्यांची टरफलं, फळांची सालं आणि देठं शिल्लक राहतील त्याचंच खतात रूपांतर करा.
हाच निसर्गाचे ऋण फेडण्याचा सर्वात योग्य मार्ग असेल.
डम्पिंग ग्राउंडची वाढती समस्या आणि आपली भूमिका
रस्त्याच्या एका बाजूला हौसिंग सोसायटीचा कचरा घेऊन जाणारी महानगरपालिकेची ‘घंटागाडी’ उभी असताना आपल्या नाकावर हात ठेवून तिच्यातून येणाऱ्या दुर्गंधीचा निषेध करत आपण सर्वच जात असतो. अगदी पंधरा मिनिटं आधी आपल्याच घरातील कचरा त्या गाडीत समाविष्ट झाला असला तरीही! आपण ह्या कचऱ्याचे आणि त्यातून येणाऱ्या दुर्गंधीचे भागीदार असलो तरीही आपल्या घरातून तो एकदा बाहेर गेला की त्याची जबाबदारी झटकावीशी वाटते. विचार करा, अशा अनेक ठिकाणांहून या गाड्या कचरा गोळा करतात आणि तो शेवटी ‘डम्पिंग ग्राउंड’ मध्ये टाकला जातो. जर एका घंटागाडीतून येणारा दुर्गंध आपल्याला सहन होत नसेल तर डम्पिंग ग्राउंडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात टाकल्या गेलेल्या कचऱ्याचा दुर्गंध किती असेल?
आता या कचऱ्यासंबंधित काही आकडेवारी मांडूया आणि त्यानंतर त्याच्या गंभीर परिणामांकडे पाहूया.
मुंबई शहराद्वारे रोज जवळजवळ २५०० टन (१ टन म्हणजे १००० किलो) जैविक विघटनशील कचरा तयार होतो. हीच आकडेवारी कमी अधिक फरकाने इतर मोठ्या शहरांबद्दल असल्यास आश्चर्य वाटणार नाही. शिवाय देशात अनेक ठिकाणी छोटी शहरं तयार झाली आहेत आणि त्यांच्या वाढीमुळे, तिथे होणाऱ्या स्थलांतरामुळे, वाढत्या लोकसंख्येमुळे तिकडेही मोठ्या प्रमाणात कचरा आणि त्यातून जैविक विघटनशील कचरा रोज तयार होतो आहे.
पुन्हा एकदा आठवण करून देतो. या आकडेवारीत आपल्या घरातील कचऱ्याचाही वाटा आहे. त्यामुळे आता मी जे लिहिणार आहे त्यातही आपला वाटा आहे हे लक्षात घ्या.
डम्पिंग ग्राउंडमध्ये जमा होणाऱ्या जैविक कचऱ्याच्या सडण्यामुळे तिथे घातक जंतू तयार होतात. त्यांच्या वास्तव्यामुळे साहजिकच तिथली माती आणि तिथल्या हवेत प्रदूषण साचते. परिणामी तिथून जवळ राहणाऱ्या वस्त्यांमध्ये याचा प्रभाव पडतो. रोग पसरण्याचा धोका निर्माण होतो. तसेच इथे काम करणाऱ्या मजुरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. आपण जिथे राहतो तिथल्या दिवसाची सुरुवात दुर्गंधाने झाली किंवा काही दिवसांनी आपल्याला दुर्गंधात राहण्याची सवय झाली तर काय होईल याची कल्पना केलीत तर मी काय म्हणतो आहे याचा अंदाज येईल. शिवाय, या जैविक विघटनशील कचऱ्याच्या सडण्याचे इतरही धोके आहेत. हा कचरा सडत राहिल्यामुळे डम्पिंग ग्राउंडमधून मिथेन आणि कार्बन-डायऑक्साईड हे दोन वायू पर्यावरणात उत्सर्जित होत राहतात. हे दोन वायू ‘कार्बन’चे स्रोत असल्यामुळे संबंधित डम्पिंग ग्राउंडमधून मोठ्या प्रमाणात कार्बन वातावरणात सोडला जातो. असे देशातील कानाकोपऱ्यात रोज होत असल्यामुळे आपल्या देशातून वातावरणात सोडल्या जाणाऱ्या ‘कार्बन’चे प्रमाण किती असेल याची कल्पना करा.
शिवाय, मिथेन आणि कार्बन-डायऑक्साईड हे दोन वायू जागतिक तापमान वाढ, अर्थात ‘ग्लोबल वॉर्मिंग’साठी प्रामुख्यानं कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांच्या सतत उत्सर्जनामुळे जगाचं तापमान आणखी वाढण्याचा फार मोठा धोका आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मिथेन हा ज्वलनशील वायूदेखील आहे. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड परिसरात आग लागण्याचा धोका आहेच. किंबहुना, अशा घटना अधूनमधून घडल्याच्या बातम्या आपल्यापर्यंत पोचत असतातंच! या घटनेमुळे घडणारे प्रदूषण हा वेगळा प्रश्न आहे.
आणि म्हणूनच पुन्हा एकदा आठवण करून देतो. डम्पिंग ग्राउंडमध्ये आपल्या स्वयंपाकघरातील कचराही जात असल्यामुळे या सर्व परिणामांना आपणही कारणीभूत नाही का?
बरं, ही डम्पिंग ग्राउंडची समस्या वाढतच जाणार आहे. विशेषतः महाराष्ट्रात, कारण आपलं राज्य हे झपाट्याने शहरीकरण अनुभवणारे राज्य आहे. आणि शहरीकरणाची प्रक्रिया केवळ आधुनिकीकरण किंवा बाजारपेठीय संस्कृती घेऊन येते असंच नाही. तर, वाढत्या शहरांमुळे वाढणाऱ्या इमारती, कार्यालये आणि एकूण लोकसंख्या ह्यांच्यामुळे कचऱ्याचं प्रमाणही वाढणार आहे. वाढते आहे. तर या कचऱ्याचं व्यवस्थापन हे शहरांसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. जर आपल्या घरातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडपर्यंत गेलाच नाही आणि त्याचं घरच्याघरी व्यवस्थापन झालं तर त्याचा एकत्रित परिणाम नक्कीच सकारात्मक ठरेल. माझ्या संकल्पाचे कारण आणि त्याची अंमलबजावणी ही या समस्यांचा विचार करून होत आहे. आणि हा लेख वाचणाऱ्या सर्वांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही तुमच्या घरातील स्वयंपाकघरातील कचऱ्यावर अशीच प्रक्रिया करा आणि त्याचं खत तयार करून शहरातील डम्पिंग ग्राउंडवरील भार कमी करा.
आता तुम्ही विचार कराल की या लेखमालिकेतील आधीच्या भागात आपण बायोगॅसचा उल्लेख केला होता तो या सर्व प्रपंचात कुठे बसतो? तर, त्याच्याविषयी पुढील भागात थोडी अधिक माहिती लिहिनच. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की कचऱ्याच्या व्यवस्थापनात दोन विभाग केले जाऊ शकतात. एक, बायोगॅसनिर्मिती आणि दुसरी खतनिर्मिती. बायोगॅस निर्मितीसाठी कचऱ्याचं खूप मोठं प्रमाण असल्याची आवश्यकता आहे आणि त्यातही सातत्य असणं गरजेचं आहे. शिवाय जो गॅस तयार होतो त्याचा वापर होण्याचीही सोय करायला हवी. परिणामी, अशी व्यवस्था उभारणं हे प्रशासनाच्या पातळीवरच शक्य आहे. तशी काही उदाहरणं ही गेल्या काही वर्षात समोर आली आहेत. परंतु वैयक्तिक पातळीवर किंवा अगदी मोठ्या सोसायटीतही गॅस तयार करण्याएवढा कचरा तयार होत नाही. अशावेळेस खतनिर्मिती करणं हाच संयुक्तिक पर्याय आहे. अशी खतनिर्मिती करून तुम्ही ते घरच्या झाडांसाठी, इमारतीतील झाडांसाठी वापरू शकता. आणि शिल्लक खत बाहेर विकूही शकता.
ही समस्या सोडवण्यासाठी काही इमारती पुढे आल्या आहेत. अनेक लोकं अशी आहेत जे स्वतः आपल्या घरी खतनिर्मिती करत आहेत. परंतु वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर किंवा एकूणच बदलत्या परिस्थितीनुसार यात सगळीकडे धोरणात्मक बदल करणं आवश्यक आहे. पण एक मात्र नक्कीच, की या एकूण प्रक्रियेचा बदल स्वतःपासून घडायला हवा! त्याची सुरुवात मी केली आहे. आपणही करा!
कचरा व्यवस्थापन – काही आशास्थानं
कचऱ्याच्या व्यवस्थापनातील अपयशामुळे कोणत्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात किंवा होऊ शकतात ह्याबद्दल आपण मागच्या भागात वाचलं. नक्कीच, ही समस्या गंभीर आहे. परंतु ह्या परिस्थितीही काही आशेची किरणं आहेत. हे असे अपवाद आहेत ज्यांनी त्यांच्या परिसरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले आहे व गेली अनेक वर्ष ही प्रक्रिया शाश्वत ठेवली आहे. वाचकांसाठी ही उदाहरणं नक्कीच प्रेरणादायी ठरतील!
मुंबईच्या भाभा अणु संशोधन केंद्राच्या परिसरातून रोज दहा टन कचरा तयार होतो. ह्या कचऱ्यातून रोज दोन टन एवढे खत तयार होते. माथेरान नगरपरिषद रोज ५ टन कचऱ्यापासून बायोगॅस आणि खत तयार करते. असेच उपक्रम पुणे, इचलकरांनी, कराड, चेन्नई, तुतिकोरिन इत्यादी शहरातील नगरपालिका संस्थांशी भागीदारी करून उभारले गेले आहेत व देशभरात अशा प्रकल्पांची एकूण संख्या दोनशे पर्यंत जाते. तसंच कुर्ला, मुंबई इथल्या कामगार नगर येथे ४५४ परिवार रोज त्यांच्या घरातील कचऱ्यापासून जवळजवळ २०० किलो खत बनवतात. आणि अंधेरी, मुंबई इथल्या विजयनगर सोसायटीतील ५१५ परिवार दर महिन्याला जवळजवळ ५००० किलो कचऱ्यापासून ५०० किलो खत तयार करतात. त्यांनी हे खत त्यांच्या इमारतीतील बागांमध्ये वापरायला सुरुवात तर केलीच आहे, पण त्याचबरोबर ते हे खत बाहेर विकतातही!
ह्या यादीतील कामगार नगर, कुर्ला व विजयनगर सोसायटी, अंधेरी येथे प्रत्यक्ष जाऊन तिथले प्रकल्प मी पाहून आलो.
ह्या प्रकल्पाचे नेतृत्व कर्नल अभ्यंकर आणि कमलाकर चव्हाण ह्यांच्याकडे आहे. मी चव्हाण साहेबांबरोबर प्रकल्पाच्या ठिकाणी पोचलो आणि अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध कामाचा प्रत्यय आला. आधी लिहिल्याप्रमाणे, इथे ४५४ परिवार आहेत व ह्या सर्वांमध्ये जागृती करणे, त्यांच्या वर्तणुकीत बदल करणे ही आव्हानं ह्या सोसायटीने पेललेली आढळतात. म्हणूनच गेली जवळजवळ सात वर्ष हा प्रकल्प सुरु आहे. इथे ८ खड्डे – pits – तयार केले आहेत व ‘बॅच’च्या स्वरूपात इथे खतनिर्मिती सुरु असते. संपूर्ण कामगार नगरमधून रोज जवळजवळ २०० किलो कचरा तयार होतो. तो गोळा करायला त्यांच्याकडे इलेक्ट्रिक गाडी देखील आहे (म्हणजे ह्या प्रक्रियेतही प्रदूषण नाही!) व एक ‘पिट’ भरेपर्यंत जवळजवळ दहा दिवस लागतात. पुढे हेच मिश्रण (आधी तयार झालेले खत व त्यात समाविष्ट होत असलेला कचरा ह्यांचे रोज मिश्रण केले जाते) संपूर्णपणे खत होण्यासाठी आणखी साधारण दहा दिवस घेते. तोपर्यंत दुसरा खड्डा भरायला सुरुवात होते. पहिल्या खड्ड्यात एकूण साधारण वीस दिवसांनी खत तयार होते. असेच एकूण आठ pits कार्यरत आहेत. ही प्रक्रिया अधिक कार्यक्षम व्हावी ह्यासाठी सोसायटीने तो बारीक करण्यासाठी एका shredder ही विकत घेतला आहे. रोज कचरा दाखल झाल्यावर त्यातील अविघटनशील पदार्थ बाजूला सारून केवळ जैविक-विघटनशील कचरा हा बारीक केला जातो व त्यामुळे खत बनण्यास गती प्राप्त होते. परिणामी दर महिन्याला जवळजवळ ४०० किलो खत तयार होते.
परंतु हे खत कुठे व कसे वापरले जाते हे देखील महत्वाचे आहे. कामगार नगर सोसायटीने ह्या प्रकल्पाच्या आवारात एक सुंदर बाग तयार केली आहे व तिथे विविध प्रकारची झाडं लावली आहेत. त्यांना नियमितपणाने खत मिळत असल्यामुळे तिथली जमीनही सुपीक आहे व ही झाडं अधिक बहरू शकली आहेत. शिवाय अतिरिक्त खत विकता ही येतं. ह्या प्रकल्पाची आणखी एक विशेष बाब म्हणजे नारळाच्या झावळींपासून खत बनवण्याची प्रक्रिया देखील इथे सुरु झाली आहे. कामगार नगर परिसरात अनेक नारळाची झाडं आहेत व ह्या प्रक्रियेसाठी भाभा अणु संशोधन केंद्राची मदत त्यांना मिळाली. ह्या झावळींना देखील shredder च्या मदतीने बारीक केले जाते व पुढील प्रक्रिया स्वयंपाकघरातील कचऱ्यासारखीच आहे.
आता तर तिथे एका Jogging/walking track ही बांधला गेला आहे व सोसायटीतील लोकांना सकाळी उत्तम वातावरण व नैसर्गिक सानिध्य अनुभवायची संधी मिळते. ह्याच बागेत त्यांनी सौरउर्जेवर चालणारे दिवे ही बसवले आहेत. स्वच्छ ऊर्जा आणि शून्य कचरा ही उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे ‘ग्रीन सोसायटी अभिनव प्रकल्प’ अंतर्गत प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले आहे व त्यासाठी त्यांना पाच लाख रुपयांची रक्कम व पारितोषिक देण्यात आले आहे.
असाच अनुभव मला अंधेरी पूर्व, मुंबई इथल्या विजयनगर सोसायटीला भेट दिली तेव्हा आला. तिथल्या ५१५ सदस्यांनी, म्हणजेच २०००+ लोकसंख्या असलेल्या ह्या समूहाने २०१५ पासून खतनिर्मितीचा प्रकल्प राबविला आहे. तिथे सुकृता पेठे आणिबापट ह्या प्रकल्पाचे नेतृत्व करीत आहेत व आतापर्यंत अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी ह्याचा प्रचार व प्रसारही केला आहे. कामगार नगर सोसायटीसारखाच इथेही डॉ शरद काळे हाच दुवा आहे. किंबहुना, डॉ काळे आणि स्त्री मुक्ती संघटना ह्यांच्या मदतीने प्रकल्पाची सुरुवात इथे झाली व नंतर इथल्याच सदस्यांनी कामगार नगर सोसायटीला मार्गदर्शन केलं आणि तिकडचा प्रकल्प सुरु झाला. इथे पाच ठिकाणी प्रत्येकी दोन खड्डे तयार केले आहेत व एका खड्ड्यात संपूर्णपणे कचरा भरेपर्यंत साधारण एका महिन्याचा अवधी लागतो. ह्या महिनाभरात तो आधी तयार झालेल्या खतात एकजीव केला जातोच. व नंतर हे पूर्ण मिश्रण आणखी महिन्याभरानंतर संपूर्णपणे खताचे रूप धारण करते. तोवर दुसऱ्या खड्ड्यात तीच प्रक्रिया सुरु राहते. अशाप्रकारे एका महिन्यात साधारण ८००० किलो कचऱ्यापासून ८०० किलोपर्यंत खत तयार होते. हे खत तिथल्या बागेत वापरले जाते व अतिरिक्त खत बाहेर विकलेही जाते. इथले सदस्य शेतकऱ्यांच्या संपर्कातही असतात असं बोलताना लक्षात आलं. इथल्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य असे की एनडीटीव्हीच्या ‘बनेगा स्वच्छ इंडिया’ ह्या मालिकेतील चौथ्या सत्रात ह्यांचा समावेश झाला होता. तेव्हा अमिताभ बच्चन ह्यांच्या उपस्थितीत प्रदर्शित झालेला हा कार्यक्रम देशभर अनेकांपर्यंत पोचला. तो आपण इथे पाहू शकतो: https://youtube.com/watch?v=611GXtWCkgo&si=EnSIkaIECMiOmarE
ह्या विषयासंबंधित माहिती घेताना पुण्यातील प्रमोद तांबे आणि अनिता तांबे ह्यांच्याशी संवाद साधता आला. त्यांना पुणे महानगरपालिकेचा त्यांच्या ‘मातीविरहित बाग’ ह्या उपक्रमासाठी ‘स्वच्छता पुरस्कार’ मिळाला आहे. त्यांच्या घरातील कचऱ्यापासून जे खत तयार होतं त्याचा वापर त्यांनी आपल्या बागेसाठी केला आहे व आज १५० हून अधिक वनस्पति त्यांच्या बागेत बहरत आहेत. हा ‘निसर्गऋण’ पद्धतीशी थेट संलग्न नाही, परंतु एक सकारात्मक उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहता येईल.
तसेच दोन आठवड्यांपूर्वी गोव्यात असताना डॉ काळे ह्यांची संकल्पना केवढा मोठा पल्ला गाठू शकते ह्याचा प्रत्यय आला. तिथे साळीगाव इथला प्रचंड मोठ्या पातळीवरील प्रकल्प शेजारील काही गावांच्या कचऱ्याचे विघटन करीत त्याचे केवळ खतातंच नाही, तर बायोगॅस आणि पुढे ह्या गॅसपासून विजेची निर्मिती देखील यशस्वीरित्या करतो आहे.
ही उदाहरणं पाहिली की लक्षात येतं की ह्या सर्व उत्पादनांचा स्रोत एकच आहे. आपल्या घरातील कचरा! अर्थात, एक महत्वाचे संसाधन! आता त्याला सडवत ठेवणे योग्य की त्याच्यावर प्रक्रिया करून निसर्गाचे ऋण फेडणं योग्य, हे तुम्ही ठरवा!
तुम्ही योग्य निर्णय घ्याल ही अपेक्षा!
खताची क्रांती, शून्य कचरा आणि हवामान बदल रोखण्याच्या दिशेने
आजच्या ह्या लेखात पुन्हा एका गोष्टीची आठवण करून देतो, ती म्हणजे आपण स्वयंपाकघरातील जैविक विघटनशील अर्थात biodegradable waste बद्दल बोलत आहोत. शहराच्या पातळीवर विचार केल्यास, जर आपण सर्वानी आपल्या स्वयंपाकघरातील कचऱ्याचा डम्पिंग ग्राउंडपर्यंतचा प्रवास कायमचा थांबवला तर त्याचा खूप मोठा परिणाम साध्य होऊ शकतो. सर्वप्रथम तर डम्पिंग ग्राउंडवर साठणाऱ्या ह्या कचऱ्याचा भार मोठ्या प्रमाणात कमी होईल. जर कचऱ्याचे प्रमाण कमी तर आधी उल्लेख केलेल्या परिणामांची तीव्रता देखील कमी होईल. म्हणजेच प्रदूषण, रोग पसरणे व कार्बन/मिथेन उत्सर्जन ह्याचे प्रमाण देखील कमी होईल. शिवाय प्रत्येक घरी सेंद्रिय खत तयार होईल ही गोष्ट वेगळीच! देशात काही पालिका संस्था अशा आहेत ज्यांनी नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण करायला प्रशिक्षित केलं आहे. त्यामुळे जैविक विघटनशील कचरा वेगळा करणे हे अनेकांना ठाऊक आहे. त्यामुळे इथे लिहिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण केले तर प्रत्येक घर सेंद्रिय खताची निर्मिती करू शकेल. हे खत इमारत परिसरातील बागकाम, घरी कुंडीत वाढणारी रोपं येथे तर वापरले जाऊच शकते. शिवाय ते एकत्रितरित्या महानगरपालिका/नगरपालिकेला विकून शहरातील बागांच्या वाढीसाठीही वापरले जाऊ शकते.
ग्रामीण पातळीवर विचार केला तर हे परिणाम अनेक अंगांनी प्रभावी ठरू शकतील. शेतीवर अवलंबून असलेल्या बहुतांश लोकांना ह्या खताचा उपयोग झाला नाही तरच नवल! काही घरं किंवा गावातील एखाद्या भागातील लोक एकत्र करून आपापल्या शेतासाठी वापरू शकतात. अर्थात, हे वैयक्तिक आणि सामूहिक ह्या दोन्ही पातळीवर लागू होऊ शकतं. आणि स्वतःच्या शेतासाठी वापरून झालेलं अतिरिक्त खत इतर ठिकाणी विकलं जाऊ शकतं. त्यामुळे ह्या प्रकल्पाचे दीर्घकालीन परिणाम एक अतिरिक्त उत्पन्न स्रोत तयार होणे हा देखील आहे. परंतु ह्या व्यतिरिक्त आणखी एक परिणाम तितकाच महत्वाचा आहे. तो असा की ह्या सेंद्रिय खतात कार्बनचे प्रमाण लक्षणीय असते. त्याचबरोबर फॉस्फरस, नायट्रोजन, पोटॅशियम ह्यांचेही चांगले प्रमाण असते. हे खत जेव्हा आपण शेती, बागकाम इत्यादीसाठी मातीत मिसळतो तेव्हा हे सारे घटकही मातीत मिसळून तिला अधिक सुपीक बनवतात. आणि जेव्हा माती सुपीक होईल तेव्हा शेतकरी वर्गाला खतावर, युरियावर अतिरिक्त खर्च करणं थांबवता येईल. शिवाय पीक जास्त येईल ते वेगळंच! आणि खर्च कमी व पीक जास्त ह्याचाच अर्थ अधिक नफा. विशेषतः छोट्या पातळीवर काम करणारे शेतकरी त्यांचे उत्पन्न नक्कीच वाढवू शकतील.
हे साध्य करण्यासाठी कदाचित गावातील काही घरांना एकत्र येऊन नियोजनबद्ध काम करावे लागेल. प्रत्येक घरात साधारण किती कचरा निर्माण होतो व सर्वांचा मिळून त्याचे प्रमाण किती आहे ह्याचा प्राथमिक अंदाज लक्षात आला की पुढचं नियोजन सोपं होईल. लगेच मोठ्या प्रमाणात खत तयार होईल हा समज बाजूला सारून ही प्रक्रिया शाश्वत होण्यासाठी काही दिवस थांबावे लागेल.
‘अमूल’मुळे आपण दुधाची क्रांती झालेली पाहिली. प्रत्येक व्यक्ती आपल्या घरातील अतिरिक्त दूध सहकार पातळीवर येऊन विकून त्याचे पैसे कमावतो व हे सर्व दूध नंतर ‘अमूल’च्या कारखान्यात येऊन त्याची विविध उत्पादने तयार होतात असे ह्या क्रांतीचे स्वरूप आहे. अशाचप्रकारे जर गावात सर्वांनी मिळून एक खतनिर्मितीचे केंद्र तयार केले तर त्यावर गावातील शेती सुरळीत राहण्यास मदत तर होईल, पण अतिरिक्त खत विकताही येईल.
शून्य कचरा आणि जागतिक तापमान वाढ थांबवण्यास आपला प्रयत्न:
ह्या उदाहरणांमुळे ‘शून्य कचरा’ ही आदर्शवादी कल्पना न राहता तिला वास्तववादी स्वरूप दिले जाऊ शकते ह्याची खात्री पटते. आपण पाहिलेली महानगरपालिका, संस्था ह्यांची उदाहरण तसेच हौसिंग सोसायटी ह्यांनी सध्या केलेल्या परिणामांमुळे लक्षात येतं की हे नक्कीच शक्य आहे! शिवाय आपल्या ह्या छोट्या प्रयत्नांमुळे आज जगात थैमान घातलेल्या ‘जागतिक तापमान बदल’ अर्थात Global Warming चा प्रश्न सोडवण्यासाठी मदत मिळू शकते. जर आपल्या घरातील जैव विघटनशील कचरा हा डम्पिंग ग्राउंडमध्ये न सडता त्याचे खतात रूपांतर होत असेल किंवा त्याचे बायोगॅसमध्ये रूपांतर होत असेल तर आपल्याकडून वातावरणात कार्बन उत्सर्जन न होण्याचे मोठे कार्य घडेल. नाहीतर हा कार्बन मिथेन व कार्बन-डायऑक्साईडच्या रूपाने वातावरणात पसरेल व जागतिक तापमानात वाढ होण्यास कारणीभूत ठरेल. जगातील सर्व देश हे वातावरणात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आपली ही छोटी पावलं हे ध्येय गाठण्यासाठी नक्कीच मदत करतील.
सारांश:
सेंद्रिय खत तयार करायची ही पद्धत अगदी सोपी असली तरीही त्यात काही आव्हानं जरूर आहेत. अगदी मूलभूत आव्हान म्हणजे आपला स्वभाव! ‘हे माझे काम नाही’ असा बहुतेकवेळेस कचरा ह्या विषयासंबंधित आपला सूर असतो. तो बदलणं अतिशय गरजेचं आहे. ‘कचरा’ ह्या शब्दाभोवती नकारात्मकता निर्माण झाल्यामुळेही असे घडते. म्हणूनच डॉ काळे ह्यांनी सांगितल्याप्रमाणे कचऱ्याकडे ‘संसाधन’ म्हणून पाहणे महत्वाचे आहे. दुसरे आव्हान म्हणजे ह्या प्रकल्पामुळे घरी दुर्गंधी साठेल व किडे तयार होतील ही भीती. पण ह्यातले काहीही होत नाही. जर अतिशय बारीक केलेला कचरा बादलीतील आधीच्या खताशी व्यवस्थितरित्या एकजीव केला तर प्रक्रियेला वेग धरतो व कोणत्याही प्रकारची दुर्गंधी किंवा किडे तयार होत नाही. शिवाय आपण हे विसरतो की जर आपल्या कचऱ्यात शिजवलेल्या, तयार पदार्थांचा समावेश नसेल तर दुर्गंधी किंवा किडे होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही!
आणि म्हणूनच, अन्नाची नासाडी टाळा! आपल्याला हवं तेवढंच जेवण बनवा व ते टाकून देऊ नका. जर हे गणित जमलं तर तुमच्या रोजच्या कचऱ्यात केवळ फळांची सालं, भाज्यांची देठं इत्यादी पदार्थांचा समावेश असेल. परिणामी, दुर्गंधी टळेल, किडे तयार होणार नाहीत व खत तयार होण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होईल.
मी महिनाभर ही प्रक्रिया अनुभवतो आहे व त्यामुळे एक वेगळाच आनंद अनुभवतो आहे. आपल्याकडून अन्नाचा नाश होत नाही ह्याचा आनंद व तो करू नये ह्याची नव्याने झालेली जाणीव. शिवाय आपल्याकडून काहीतरी सकारात्मक घडते आहे ह्याचाही आनंद वाटतो आहे. शिवाय निसर्गाशी एकनिष्ठ राहण्याची संधी मिळाली आहे ती वेगळीच! माझ्या घरातून डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा जात नाही व जागतिक तापमानात वाढ होऊ नये म्हणून माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न होतो आहे ह्याचे समाधान आहे.
अर्थात, हे आपण सर्वांनी केलं तर त्याचे परिणाम अधिक वेगाने समोर येतील आणि डॉ काळे ह्यांच्या शब्दात सांगायचे तर, “भारत दोन दिवसात स्वच्छ होऊन जाईल.”
-आशय गुणे

Leave a Reply