उधारीवर कांद्याचं बी देणारे तुकाराम आणि प्रामाणिकपणे उधारी चुकती करणारे शेतकरी
सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर गावचे तुकाराम शिंदे. वय ४४. शिक्षण १० वी. तुकाराम यांना शेतीची प्रचंड आवड. पण कसण्यासाठी त्यांच्याकडे जमीन नव्हती. शेती हवी या अट्टहासाने इतरांच्या शेतात राबराब राबून त्यांनी स्वत:च्या पैशाने आठ एकर जमीन घेतली. आजूबाजूचे शेतकरी कांद्याचे बीज उत्पादन करायचे. ते पाहून त्यांनीही कांद्याचे बीज उत्पादन घेण्यास सुरुवात केली. २००९ पासून उत्तम दर्जाचे कांद्याचे बी ते तयार करत आहे.
या दरम्यान लक्षात आलं, बहुसंख्य शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक. शेती कसण्यासाठी बऱ्याचदा सावकारांवर अवलंबून राहावे लागते. यातून शेतकऱ्यांवरच्या कर्जाचा डोंगर वाढत जातो. मग तो शेती करण्याच्या मानसिक स्थितीत राहत नाही. अशा कठीण काळात त्याला आधाराची गरज असते. भारतीय शेती आणि शेतकरी जगावे, त्यांच्या हिताचा कुठेतरी विचार व्हावा, असं तुकाराम यांना जाणवू लागलं.
त्यांनी शेतकर्यांना उधारीवर कांद्याचे बीज देण्यास सुरुवात केली. सावळेश्वर गावाच्या आजूबाजूच्या साबळेवाडी, पोपळी, अर्जुनसोंड, पाकणी, चिंचोली, बीबी दारफळ, विरवडे या गावातील शेतकऱ्यांना 8 ते 9 महिन्याच्या उधारीच्या वायद्यावर बी तुकाराम देतात.
विशेष म्हणजे हे बी बाजारभावापेक्षा ते कमी किमतीत देतात. उधारीवर कांद्याचे बी मिळाल्याने शेतकरी बीजावरचा खर्च खते, खुरपणी यावर करू शकतो. उत्तम दर्जाचे कांदा बीज आणि तेही उधारीवर मिळत असल्याने दरवर्षी अनेक शेतकरी त्यांच्याकडे बीज घेण्यासाठी येतात. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून उधारीवरती बीज घेऊन आपली शेती टिकवली आणि जगवली आहे.
”या वर्षी अर्धा एकरात 350 किलो उन्हाळी कांद्याच्या बिया तयार झाल्या होत्या.” तुकाराम सांगतात. ”७ ते ८ महिन्यांनी कांदा विकून झाल्यानंतर शेतकरी उधारीचे पैसे प्रामाणिकपणे आणून देतात. शेतकऱ्यांचा फायदा होतो,हे महत्त्वाचं.”
विरवडेचे शेतकरी प्रदीप पाटील सांगत होते, ”दुकानात कांद्याचे बी घ्यायला गेलो तर दुकानदार एक रुपयाही कमी करत नाही. शिंदे पैशासाठी वर्षभर थांबतात. एकदा शिंदे यांच्याकडून ५ किलो कांद्याचे बी उधारीवर आणून अडीच एकर कांदा केला होता. त्यावेळी माझ्या शेतात 500 पिशवी कांद्याचे उत्पादन झाले. कांदा विकून मला 5 लाख रुपये मिळाले. यावर्षी ही 5 एकर कांदा लावणार आहे. त्यासाठी शिंदे यांचाकडून उधारीवर बी घेणार आहे.”
-विनोद चव्हाण, ता. मोहोळ, जि. सोलापूर

Leave a Reply