आईच्या कष्टाला मुलीच्या यशाची झालर
ऑनलाइन शिक्षण आर्थिक परिस्थितीवर अवलंबून. ग्रामीण भागातील बरेचसे पालक शेती ,मजुरी-रोजंदारी करणारे. दिवसभर काम करून येईल त्यात प्रपंच धकवायचा मग मुलांना शिक्षणासाठी अँड्रॉइड फोन कुठून घेणार.पण शिकण्याची जिद्द, परिस्थितीची जाणीव असेल तर काहीही अशक्य नाही, हे दाखवून दिले आहे सुनयना रवींद्र देशमुखने.
सुनयना,नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या चिखलओहोळ या गावातली. इथल्या कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख विद्यालयाची दहावीतील ती विद्यार्थिनी.
वडील अर्धांगवायूच्या झटक्यामुळे आजारी. त्यामुळे कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी एकट्या आईवरच. शेतमजुरी करून त्या कुटुंब चालवतात. आर्थिक परिस्थिती बेताचीच. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी सुनयनाकडे अँन्ड्रॉईड फोन नव्हता की तो घेण्याइतपत पैसेही नव्हते. पण सुनयनाकडे परिस्थितीची जाण व शिकण्याची जिद्द . त्यामुळे तिने मार्ग शोधला. मैत्रिणीकडे जाऊन ती ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहू लागली. घर शाळेपासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले. घरकाम,शेतीचे कामे व अभ्यास यांचा ताळमेळ साधत तिने कसून अभ्यास केला. यंदा बोर्डाच्या परीक्षेत ८७.४० टक्के मिळवून ती शाळेत तिसरी आली .
सुनयनाला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. सनदी अधिकारी होऊन देशसेवा करण्याची तिची इच्छा आहे.
-प्राची उन्मेष, ता. मालेगाव, जि. नाशिक

Leave a Reply