ऑनलाइन गप्पांतून मुलं झाली बोलकी…
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कारवाडी जिल्हा परिषदेची शाळा. इथं संतोष मारूतीराव राऊत सहशिक्षक म्हणून काम करतात. कोविड साथीमुळे ऑनलाईन शाळा सुरू झाली आणि त्या शिक्षणातल्या अडचणी शिक्षकांनाही लक्षात येऊ लागल्या. सर सांगतात, “मुलं अशा शाळेकडे गांभीर्याने पाहत नाहीत हे लक्षात आलं. शिवाय विद्यार्थ्यांचा मित्र-मैत्रिणींशी संवाद नव्हता. ऑनलाईन गेमिंग वाढलं असल्याचंही लक्षात येत होतं. या सगळ्यावर उपाय काय याचा विचार होता. त्यामुळे ‘मुलांशी गप्पा’ हा उपक्रम सुरू केला. यातून आता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांशी बोलणं सुरू आहे.”
मागच्या वर्षीच्या जुलैमध्ये सरांनी मुलांशी गप्पा उपक्रम सुरू केला. राज्यातील जवळपास 10 जिल्ह्यातील विद्यार्थी आता या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. आता विद्यार्थीच सकाळी ७.३० वाजता स्वत:च मिटिंग आयोजित करतात. गप्पा मारत हळूहळू त्यांना अभ्यासाकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो. कंटाळा आला की विद्यार्थी नकाशात विविध देश, राज्य, जिल्हे शोधतात, बुद्धीबळ खेळतात. एखाद्या विषयावर एक पान लिहून उर्वरित मुलांना ते लिहिण्यास सांगितलं जातं. दररोज सायंकाळी मुलांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची (डायट) लिंक पाठवली जाते. ती लिंक १५ दिवस चालते. पुणे, नाशिक येथील शिक्षकही यातून जोडले गेले आहेत. तेही गीत गायन, एखादं अॅप कसं तयार करायचं याची माहिती मुलांना देतात. दर रविवारी ‘पाहुणे आपल्या भेटीला’ या उपक्रमातून गृह मंत्रालयाचे कक्षाधिकारी, वैमानिक, सैनिक, लेखक, दिग्दर्शक, चित्रपट निर्माते, कलाकार, व्यावसायिक यांच्या भेटी आणि मुलाखती विद्यार्थ्यांसमवेत घेतल्या आहेत.
यात त्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांना मनमोकळं बोलण्यासाठी संधी दिली जाते. विशेष म्हणजे आता मोठे विद्यार्थी लहानग्यांना मार्गदर्शन करतात. गेल्या ३७४ दिवसांपासून हा कार्यक्रम अविरत सुरू आहे.
– शरद काटकर, नांदेड

Leave a Reply