शाळेची माती पुन्हा हिरवीगार..
रत्नागिरी जिल्हा मुख्यालयापासून साधारण १५ किमी अंतरावरची पानवल घवाळीवाडी जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा. २ वर्षे घरात राहिल्यानंतर शाळा सुरू झाली. ऐन थंडीत शाळा सुरू झाल्यामुळे मुली विशेष आनंदात होत्या. त्या कामाला लागल्या आणि १५-२० दिवसात शाळेच्या मातीत हिरव्यागार भाज्या उगवल्या.
या शाळेचा सेंद्रिय शेतीचा उपक्रम आहे. सहावी- सातवीच्या मुलींचा. मुली स्वतः खुरपणी, बियाणे लावणे, पाणी घालणे ही सर्व कामं करतात. हा खरं तर बारामाही उपक्रम. पण कोरोना काळात शाळा बंद होत्या त्यामुळे काही काळ यात खंड पडला. मात्र आता पुन्हा नव्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वांगी, कोथिंबीर, आलं, दोडका, पडवळ, भोपळा, भुईमुग, घेवडा, पालक, लाल-हिरवी पालेभाजी, नवलकोल, पालक, आळू, कारले आणि अनेक काही भाज्या आलटून पालटून घेतल्या जातात.
या भाज्या शालेय पोषण आहारात वापरल्या जातात. सेंद्रिय खतनिर्मितीतून हे पीक घेतलं जातं. शाळेतील पदवीधर शिक्षक प्रदीप कॄष्णराव मोरे यांनी सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं उपक्रम सुरू केला. यासाठी मुख्याध्यापिका मुळ्ये मॅडमचं मार्गदर्शन.
मोरे सर सांगतात,”विद्यार्थ्यांना लहानपणापासून अन्नाचं महत्त्व कळावं, त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव या वयात व्हावी हासुद्दा हेतू आहे. तसंच यातल्या अर्ध्या भाज्यांची विक्री केली जाते. यातून मेहनत केल्यावर त्याचं फळही निश्चितच मिळतं, हा संदेश आपोआपच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो.”
-प्रतिनिधी, रत्नागिरी

Leave a Reply