द्राक्षे, केळी, कोबी, टोमॅटो,वांगी, उन्हाळी शेंगा,कोथिंबीर , हिरव्या मिरच्या असं विविध पिकांचं नंदनवन सोलापूरजवळच्या कुमठे गावात दिसत आहे. ही सेंद्रिय शेती भतगुणकी दाम्पत्याची.
शेती हा व्यवसाय फायद्याचा नाहीच असा एक सर्वसाधारण समज. परंपरागत शेतीचा व्यवसाय नसेल तर सहसा कुणी या व्यवसायात उतरण्याचा धोका पत्करत नाही. पण भतगुणकी दाम्पत्यानं हा धोका पत्करला.
संगीता आणि काशीनाथ भतगणुकी सोलापूर शहरात स्पर्धा मार्गदर्शन केंद्र चालवायचे. भावी अधिकारी घडवण्यासाठी १२ वर्ष त्यांनी काम केलं. त्यानंतर मात्र सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाची ओढ स्वस्थ बसू देईना. कुमठे गावात आठ एकरवर करार पध्दतीची शेती त्यांनी सुरू केली. ही जमीन शेतीसाठी योग्य नव्हती. भतगणुकी यांनी ३ वर्ष जमिनीवर मेहनत घेतली. गीर गाईचं गोमूत्र,शेणखत, जीवामृत वापरलं. आता याच जमिनीवर ते धान्य, तेलबिया, फळंफुलं, भाज्या अशी हर प्रकारची ४५ पिकं घेतात. उडीद , तूर, भुईमूग यातूनच तीन महिन्यात दोन लाखांचं उत्पन्न त्यांनी मिळवलं. हरभरा,गहू ज्वारीही यंदा त्यांनी घेतली आहे.
माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भतगुणकी यांनी जुळे सोलापूर परिसरात ड्रिम अॅग्री मार्ट उभारला याखेरीज १५० शेतकऱ्यांचा हत्तरसंग इथं बसव संगम शेतकरी गट आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांनी घरपोच माल पोहोचवला. ज्वारी बाजारात विकण्याऐवजी त्याच्या कडक भाकऱ्या करून ते बाजारात विकतात.
नियोजनबद्ध शेती केली तर त्यातूनही भरपूर उत्पन्न घेता येतं, हे भतगणुकी दाम्पत्यानं दाखवून दिलं आहे.
-अमोल सीताफळे, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर