फुलकोबी, ब्रोकोली, टोमॅटो, पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू, चवळी, पुदिना, आलं, कांदा, लसूण, लिंबू, आवळा, काकडी, बीट, करवंद, भेंडी, गवार, वांगी, भरिताची वांगी, मटकी, मुळा, कडीपत्ता, सीताफळ, मोसंबी, चिकू, बदाम, गवती चहा, तुळस, बेल, गुलाब, चाफा, मोगरा, सायली, जास्वंद, स्वस्तिक असं बरंच काही इथे पाहायला मिळतं.
इथे म्हणजे अकोल्यातल्या एका शासकीय निवासस्थानात. सचिन कदम आणि स्नेहल चौधरी कदम हे जोडपं इथे राहतं.
क्षितीज संस्थेच्या संस्थापिका स्नेहल चौधरी कदम या मूळच्या वाशिम जिल्ह्यातल्या. तर सचिन कदम मूळचे सोलापूर जिल्ह्यातले. सचिन, अकोला शहरात पोलीस उपाधीक्षक या पदावर आहेत. २०१९ मध्ये अकोला शहरात बदली झाल्यावर त्यांना शासकीय निवासस्थान मिळालं. त्याच्या परिसरात ६-७ गुंठे जागा पडीक होती. स्नेहल यांची आई पुष्पा चौधरी यांना बागकामाची आवड. त्यांच्यापासून प्रेरणा घेत दोघांनी बाग फुलवण्याचं ठरवलं. तेही सेंद्रिय पद्धतीनं. परसबागेत ५४ प्रकारची फळं-फुलझाडं.
स्नेहल सांगतात, ”या जागेवर आधीच्या अधिकाऱ्यांनी लावलेली पण बरीच झाडे होती. त्यांची जपणूक करण्यापासून सुरुवात केली. आधी सर्व परिसर स्वच्छ केला. झाडांना आळे करून कुंपण केलं. वेळेत पाणीही दिलं. नंतर आम्ही सेंद्रिय शेतीला लागणारी बेसिक तयारी केली. जसे की खोदकाम, माती मोकळी करणं, दगड वेचणं, शेणखताचा थर टाकणं. दोघेही आवर्जून प्रत्येक झाड तपासतो. अधून-मधून तज्ज्ञांचा सल्ला घेतो. परसबागेसाठी लागणारे बियाणे विकत न आणता घरी जे काही उपलब्ध होते तेच वापरतो.”
बागेत लाकडावर पेंटिंगसुद्धा करण्यात आली आहेत. पक्ष्यांसाठी अन्न-पाणी तसेच काही कृत्रिम घरटी ठेवण्यात आली. हिरव्यागार परिसरामुळे इथे विविध प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट असतो. कधीकधी पहाटेच्या वेळेस मोराचेदेखील दर्शन घडते.
स्नेहल सांगतात, ”आम्ही दोघेही आमच्या कामात भरपूर व्यस्त असतो. पण छंद जोपासण्यासाठी आवर्जून वेळ देतो. झाडे लावताना, वाढताना पाहण्याचा आनंद आणि समाधान खूप वेगळे असते. घरचा, ताजा रसायनमुक्त भाजीपाला, फळं मिळत असल्यानं बाजारातून आणण्याचे कष्ट आणि खर्च दोन्हीही वाचतात. मुख्य म्हणजे आरोग्य उत्तम राहते. परसबागेतला भाजीपाला, फळे शहरातल्या मूकबधिर विद्यालयाला पाठवला जातो. त्याचं समाधान वेगळंच आहे.”
परसबागेतली तुळशीची रोपे घरी येणाऱ्या पाहुण्यांना भेट दिली जातात. तसेच बाग पाहायला येणार्या लोकांना परसबागेचे महत्त्वही कदम पटवून देतात.
-नंदिनी सीताफळे
Related