उस्मानाबादकरांची सायकल स्वारी, रायगडाच्या दरबारी
त्यांनी ठरवलं, प्रयत्न सुरू केले. दररोज सकाळी ५० ते ७० किलोमीटर सायकलिंगचा सराव सुरू झाला. कधी कोरेानाची लाट तर कधी कामाचा व्याप. तरीही, प्रयत्नांची पराकाष्ठा सुरूच होती. शेवटी निश्चय आणि स्वप्नपूर्तीसाठी सारं बळ एकवटून त्यांनी किल्ले रायगडाच्या दिशेने सायकल स्वारी सुरू केली. उस्मानाबादपासून सुमारे ३८० किलोमीटरचं अंतर. घाट आणि वळण कापत ते १७ तरुण छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्मृतीस्थळी पोहोचले.
खरंतर सायकलरून साधारण ४०० किलोमीटर अंतर कापणं, २५ वर्षांपूर्वी कुतुहलाचं नव्हतं. आता मात्र दुचाकी, चारचाकी, अशा सुविधांचा वापर वाढला आणि त्याच वेगानं शारीरिक समस्यांची नांदी सुरू झाली. उस्मानाबाद तसा ग्रामीण भाग असला तरी इथंही सायकल वापराचा विसर पडत चाललेला. काही तरुणांनी एकत्र येत शहरी भागात रूजत असलेली मॅरेथॉनची संकल्पना पुढे आणली. दोन-तीन वर्षे हाफ मॅरेथॉनचे आयोजन करणाऱ्या मंडळींनीच पुढे सायकल वापराचा नवा संदेश उस्मानाबादकरांना दिला. व्यवसाय, नोकरी, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या तरुणांनी सरावातून सायकल चालविण्याचे दररोज नवे उच्चांक केले. त्यांनी सायकलवरून रायगडपर्यंत म्हणजे सुमारे ३८० किलोमीटर जाण्याचा निर्धार केला आणि सुरू झाली तयारी. ८ जुलै रोजी पहाटे १७ जणांनी आपापल्या सायकलवरून रायगडाच्या दिशेने कूच केले. प्रवासात लागणाऱ्या गावांमध्ये सायकल वापराबद्दल जागृती करत तरूणांची फौज पुढे सरकत होती. चार दिवसांच्या मुक्कामानंतर रायगडावर पोहोचलेल्या तरुणांनी शिवरायांच्या पुतळ्याचं, पवित्र स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्ती झाली.
खरंतर, हा प्रवास इथंच संपत नाही. त्यांना सायकल वापराचे शरिरासाठी असलेले फायदे, इंधन, प्रदूषण, अशा व्यापक अर्थाने समाजात संदेश पोहोचवायचा होता. म्हणूनच सायकलवरून चार दिवसांचा प्रवास करून रायगडावर आलेल्या या तरुणांचं खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनीही खास कौतुक केलं. कुणी फॅशन म्हणून, कुणी आवड म्हणून तर कुणी व्यायाम म्हणून सायकलकडे पाहतोय. रायगड वारीच्या टीममध्ये अमोल माने, चित्रसेन राजेनिंबाळकर, अभिजीत पाटील, रोहन पाटील, प्रदीप खामकर, चंदन भडंगे, गिरिष अष्टगी, इंद्रजीत पाटील, गणेश एकंडे (निलंगा), दीपक वळसे (अहमदपूर), नितीन तानवडे, रवि शितोळे, संजय चव्हाण, पुरुषोत्तम रुकमे, रणजीत रणदिवे, आनंद देशमुख, सूरज कदम यांचा सहभाग होता.
सायकल प्रवासाच्या अनुभवाविषयी सूरज कदम म्हणाले, “रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलो त्यावेळी डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते. आपल्या आयुष्यातली एक स्वप्नपूर्ती झाल्याचं समाधान प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये दिसत होतं. प्रचंड धुक्यामध्ये झाकून गेलेला तो रायगडाचा महाकाय डोंगर. त्याकडे पाहताच प्रत्येकाच्या ओठी एकच घोषणा येत होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय..चारशे किलोमीटरचा सायकल प्रवास करून दुसऱ्या दिवशी रायगडावरती आम्ही सर्व जण पायी गेलो आणि त्या मेघडंबरीमध्ये विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं त्यानंतर समाधीचं दर्शन घेतलं आणि भरून पावलो.”
– चंद्रसेन देशमुख, उस्मानाबाद

Leave a Reply