मेहनत मुलांची, ओझरखेडला वाट सापडली प्लॅस्टिकमुक्तीची
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड. जिल्हा मुख्यालयापासून ३० किमीवर. साधारण ३५१ घरांचं हे गाव. इथं जिल्हा परिषदेच्या १ली ते ७ वीची शाळा आहे. शाळेच्या परिसरात किंबहुना संपूर्ण गावातच प्लास्टिकचा कुठल्याही प्रकारचा कचरा दिसत नाही. इथल्या मुलांनी, शाळेनं आणि ग्रामस्थांनी प्लास्टिक कचऱ्यापासून स्टूल आणि कट्टा बांधण्याचं कौशल्य विकसित केलं आहे.
प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारं प्रदूषण, त्यातून डासांची उत्पत्ती, आजार, धोक्यात येणारे आरोग्य याची माहिती शिक्षक मुलांना देत . प्लास्टिक कचरा जाळला तर वायूप्रदूषण, पाण्यात फेकला तर जलप्रदूषण आणि खोल खड्डयात पूरला तर विघटन होत नसल्यानं जमिनीत घातक द्रव्य पसरतात. अशा या प्लॅस्टिकच्या घनकचऱ्याचं रूपांतर धनकचऱ्यात करण्याची किमया मुलांनी गेल्या तीन वर्षात साधली.
शाळेतील उपक्रमशील शिक्षक विश्वास पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी काय करता येईल याबाबत बोलतं केलं. या चर्चेतूनच गाव प्लास्टिक कचरामुक्त करण्याचा निश्चय केला.
सहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम शालेय आवारात असलेला प्लास्टिक कचरा, विविध खाद्यपदार्थांचे रॅपर्स, जमा करण्यास सुरुवात केली. रोज जमा केलेल्या कचऱ्याचे वजन करू लागले. तो टाकाऊ पाण्याच्या बाटल्यांमध्ये भरून संकलन करू लागले. हळूहळू घराजवळील, शाळेच्या रस्त्यावरील प्लास्टिक कचरा, पाण्याच्या टाकाऊ बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स, कॅरी बॅग्ज, पॅकिंग पेपर, जमा केली.
गावात जनजागृती फेरी काढून प्लास्टिकमुक्त गाव संकल्पना गावकऱ्यांमध्ये बिंबवण्यास सुरुवात केली. कुटुंबांच्या भेटी घेऊन प्लास्टिकचा कमीतकमी वापर , प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या, प्लास्टिक कचरा रस्त्यावर किंवा कचराकुंडीत न टाकता एका पिशवीमध्ये जमा करून शाळेत अथवा ग्रामपंचायतीमधील संकलन केंद्रात जमा करणे, आपले गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ओला-सुका कचरा रस्त्यावर न टाकता गावातील कचराकुंडीत टाकण्यास सांगितलं. जनजागृती फेरीत हजारो ग्रॅम प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. सुरुवातीपासून जमा केलेला एकूण प्लास्टिक कचरा एक लिटरच्या टाकाऊ पाण्याच्या १२६ बाटल्यांमध्ये भरून संकलित केला. त्याचं वजन जवळपास १०० किलो होते. या प्लास्टिक कचरायुक्त बाटल्यांचा बांधकामासाठी उपयोग करून दहा फूट लांब, सव्वा फूट रुंद आणि सव्वादोन फूट उंचीची भिंत तयार केली. हा चिमुकल्यांचा वाचनकट्टा. त्याचं नाव ‘डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम वाचन कट्टा’. वाचनकट्टा तयार करण्यासाठी शिक्षकांची आणि गावकऱ्यांची मदत घेतली. सरपंच गंगाधर निखाडे यांनी वाळू, दत्तात्रय गांगोडे यांनी सिमेंट, शाळेतील तुकाराम राऊत आणि प्रकाश भोये या शिक्षकांनी कडप्पे दिले आणि विलास बागुल यांनी कट्टयाचं योग्य बांधकाम करून दिलं.
या वाचन कट्टयाला प्लास्टिक प्रदूषणावर जनजागृती करणारे मिलिंद पगारे यांनी भेट दिली, विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्वनिर्मित शैक्षणिक साहित्याचे ३ संच भेट दिले. विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लास्टिकपासून टिकाऊ ओटा तयार केलाच पण त्याच बाटल्यांच्या मदतीनं शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यानी घरीही घरगुती साहित्यातून बसण्यासाठी स्टूल तयार केली.
— भाग्यश्री मुळे ,ता. दिंडोरी,जि. नाशिक

Leave a Reply